उत्तर – भक्ती म्हणजे अत्यंत प्रेमाने केलेले परमेश्वराचे स्मरण, दर्शन, गुणगायन, निःस्वार्थ सेवा आणि सत्य, प्रेम व आनंद ह्या परमेश्वरी तत्त्वांना आपल्या जीवनात आणण्यासाठी केलेले सर्व परिश्रम.
भज् – सेवायाम् । ’भज्’ धातुचा अर्थच मुळी ’प्रेमपूर्वक सेवा’ असा आहे.
मी माझ्या परमेश्वराची अत्यंत श्रद्धेने केलेली सेवा म्हणजेच भक्ती.
ह्याचाच अर्थ, भक्ती म्हणजे परमेश्वरावरील प्रेम आणि परमेश्वराच्याच, असंख्य वाईट प्रारब्धामुळे दु:खी असलेल्या लेकरांची सेवा.
परमेश्वराचे प्रेम मिळवण्याचा मार्ग म्हणजेच भक्ती .
भक्ती ही भाव हे हृदय असणारी, नित्य वाढत असणारी, अंतरंगी प्रेमशक्ती आणि सस्नेह सेवा आहे.
धर्मपालन, स्वकर्तव्यपालन आणि ह्या गोष्टी करत असताना सातत्याने राखलेली आणि दृढ होत जाणारी स्वयंभगवानाच्या अस्तित्वाची जाणीव म्हणजेच परिपूर्ण भक्ती.
’भाव’ म्हणजे अंतःकरणात उमटलेली भावना.

उत्तर – ज्याने आपल्या भूतकाळातील मिळविलेल्या ज्ञानानुसार, वर्तमानकाळात विवेक धारण करून भविष्यकाळातील चिंता आणि निश्चित कर्मफलाची अपेक्षा न करता कर्मसातत्य राखले तोच खरा अर्जुन, तोच खरा जय आणि तोच खरा शिष्य, तोच खरा भक्त.

उत्तर – जेव्हा आस्तिक्यबुद्धी जीवात्म्याच्या मूळ स्थानाची माहिती करून घेते व त्या प्रयत्नात सभोवतालच्या विश्वाचा अभ्यास करते, तेव्हा ह्या परमात्म्याच्या सत्य, प्रेम व आनंद ह्या तीन मूळ गुणांची ओळख पटते, विश्वातील प्रत्येक क्रियेत वा प्रतिक्रियेत ह्या त्रिसूत्रीचा अनुभव येऊ लागतो.
हाच ह्या सर्व जगताचा एकमेव कर्ता व करविता हा दृढ निश्चयय होतो. तीच ती श्रद्धा.
सामान्य मनुष्यसुद्धा ‘चिंतन’, ‘मनन’, ‘शोध’ इत्यादि मोठमोठे शब्द माहीत नसतानादेखील स्वत:च्या व्यावहारिक अनुभवातून व दैनंदिन घडामोडीतून निर्माण झालेल्या जाणीवेतून ‘श्रद्धा’ शिकतो, केवळ कुणी मनावर बिंबविले, वारंवार ठासून सांगितले म्हणून श्रद्धा उत्पन्न होत नाही.
मात्र ह्या जन्मात सहजतेने श्रद्धाभाव निर्माण होणे, हा माझ्या पूर्वजन्मातील श्रद्धेचा अपरिहार्य परिणाम असतो.

उत्तर – आपल्या जीवनात येणारी ९९% सुखदु:खे ही थोडक्याच काळात नाहीशी होतात किंवा त्यांचे रूप तरी बदलते.
हा थोडा काळ नीट समजून घेणे आणि त्या थोड्या काळात स्वत:ची फसवणूक न होऊ देणे म्हणजेच सबुरी.
ही सबुरीच माझ्या मनातील अनावश्यक भीती, क्रोध व मोह दूर करू शकते.
‘सबुरी’ म्हणजे नुसते वाट बघणे नव्हे,
तर प्रश्न सोडविण्यासाठी परिश्रम करीत राहून, माझा लाडका भगवंत माझ्यासाठी माझा घात न होऊ देता उचित फळ देणारच, हा विश्वास कायम असणे.
जगात सर्व सोंगे आणता येतील, अगदी श्रीमंतीचे सुद्धा, शौर्याचे सुद्धा, श्रद्धेचे सुध्दा; पण सबुरीचे सोंग मात्र कुणालाही कधीच आणता येणार नाही आणि तिथेच खोट्या श्रद्धेचे व खोट्या भक्तीचे भांडे फुटते.

उत्तर – दास्य भक्ती म्हणजे याचना, लाचारी, परतंत्रता, परावलंबित्व व दुबळेपणा नव्हे, तर दास्य भक्ती म्हणजे ‘माझा स्वामी जेवढा समर्थ तसाच मीही होणार’, ह्या इच्छेने त्याच्या पायाशी राहून विनम्रपणाने त्याच्या सर्व नियमांनी स्वतःला बांधून घेणे होय.
परमात्म्याचे दास्यत्व म्हणजे परमेश्वराचे प्रेम, निर्भयता व पावित्र्य ह्या त्रिवेणी संगमाचे दास्यत्व स्वीकारणे.
दास्यभक्ती म्हणजे संपूर्ण शरणागती. अगदी भगवान श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे,
सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज ।
अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः ॥
भगवंत म्हणतात, ‘‘हे मानवा, तू सर्व गुणधर्म सोडून फक्त मला शरण ये. मी तुला पूर्ण पापमुक्त करून सर्वोच्च स्थान देईन.’’
प्रत्येक कर्म करताना परमेश्वराचा प्रथम विचार करणे, ही दास्यभक्तीची पहिली अट आहे.
प्रत्येक कर्म परमेश्वरासाठीच करणे, ही दास्यभक्तीची दुसरी अट आहे.
परमेश्वराने माझ्या इच्छा पुरवाव्यात हा विचार सोडून देऊन परमेश्वर माझ्या जीवनात उचित तेच घडविणार हा दृढनिश्च य असणे, ही दास्यभक्तीची तिसरी अट.
माझ्या सेवेचे, भक्तीचे फळ मी मागणार नाही. तो देईल त्यातच मी आनंदी राहून त्याची अधिकाधिक सेवा कशी करता येईल ह्यासाठीच स्वतःचे जीवन वाहून घेणे, ही दास्यभक्तीची चौथी अट.
माझे ‘जर’ ‘तर’ आणि माझ्या अटी संपल्या की ‘सुख येवो की दुःख, पण माझ्याकडून तुझे कार्य साधून घे’, ही तीव्र व सच्ची इच्छा ही दास्यभक्तीची पाचवी अट.
भगवंताच्या सेवेत व प्रेमातच अधिकाधिक आनंद मिळू लागतो व मग जीवन प्रापंचिक व पारमार्थिकदृष्ट्या खरेखुरे संपन्न होऊ लागते. ही प्रापंचिक संपन्नता मला दास्यत्वापासून दूर नेणार नाही, तसेच पारमार्थिक उन्नती अहंकार वाढविणार नाही ह्याची काळजी घेणे, ही दास्यभक्तीची सहावी अट.
हनुमंताचे आचरण हाच एकमेव आदर्शमार्ग व भरताचे आचरण हेच एकमेव होकायंत्र मानून जीवनप्रवास करणे, म्हणजेच दास्यभक्तीची सातवी व सर्वात महत्त्वाची अट.

उत्तर – ज्यामधून सदा सर्वदा फक्त पावित्र्य आणि आनंदच उत्पन्न होतो ते सत्य.
ज्यामधून मानवाला प्रचंड सुख मिळू शकेल, परंतु पावित्र्य उत्पन्न होणार नाही ते असत्य.
ज्यामधून माणसाला पावित्र्याची प्राप्ती होईल व तात्कालीन सुखही मिळेल, परंतु इतर जनांसाठी ते दु:खदायक व परमेश्वराला आनंद देणारे नसेल तर तेही असत्यच.
उदा. एका व्यक्तीने नेहमी ‘सत्य’ बोलण्याची शपथ घेतली आहे व ती व्यक्ती आपल्या घराच्या अंगणात बसली आहे. तेवढ्यात समोरून एक भयभीत तरूणी धावत आली व त्यास म्हणाली, ‘‘मला वाचवा. माझ्यावर बलात्कार करण्यासाठी काही गुंड माझ्यामागून धावत येत आहेत.’’ त्यावर त्या व्यक्तीने तिला आपल्या घरात लपण्यास सांगितले. पाठोपाठ ते गुंड तिथपर्यंत येऊन पोहोचले व त्यांनी त्या व्यक्तीस विचारले, ‘‘काय रे, इथे पळत आलेली मुलगी कुठे आहे?’’ ह्यावर त्या व्यक्तीने काय उत्तर द्यायचे? सत्य बोलण्याची शपथ घेतली आहे म्हणून ‘वास्तव’ सांगून टाकायचे का? ‘‘होय, ती माझ्या घरात लपली आहे.’’ अर्थातच ह्या शब्दांबरोबर लपलेला अर्थ असा निघेल, ‘‘या, ही बघा, इथे आहे आणि तिच्यावर बलात्कार करा.’’ असे घडल्यास बोलणे व वागणे ‘वास्तवाला’ धरून असेल, ‘सत्याला’ नाही. कारण ह्या बोलण्यामुळे ना पावित्र्य उत्पन्न होणार ना आनंद; ना त्या व्यक्तीच्या जीवनात, ना त्या तरूणीच्या जीवनात, ना त्या गुंडांच्या जीवनात.

उत्तर – नमस्कार करणे म्हणजे नुसते हात जोडणे नाही तर मन चुकीच्या दिशेकडून उचित दिशेला वळवणे. मात्र मन तर अतिशय चंचल आणि अत्यंत विशालपणे पसरलेले असते. त्याचा शोध घेणे अतिशयच कठीण.
‘मन:’ च्या विरुद्ध ‘नम:’ हा शब्द आहे. ‘मन’ आणि ‘नम’ ह्या दोन शब्दांमध्ये उभा असतो, तो ‘नाम’ हा शब्द. मनाला उचित दिशा देणारा उत्प्रेरक (catalyst) म्हणजे ‘नाम’ तर अनुचित दिशा देणारा उत्प्रेरक (catalyst) म्हणजे ‘मान’ (अहंकार)
माझ्या जीवनाची ‘धारा’ (मन) मला उलट करून धारेची ‘राधा’ बनवायला हवी.
आणि ‘राधा’ म्हणजे काय? शुद्ध, निर्व्याज, एकनिष्ठ भक्ती.
‘राधा’ म्हणजे ‘ल्हादिनी’ …..’आल्हादिनी’ शक्ती. जीवन आल्हाददायक बनवणारी परमेश्वराची ‘प्रेमशक्ती’.

उत्तर – प्रारब्ध म्हणजेच मन आणि हे मन बदलणे म्हणजे मी माझे प्रारब्ध बदलणे आणि ही बदलण्याची क्रिया म्हणजे अंधाराचे रूपांतर प्रकाशात करण्याची क्रिया, माझ्या मनाच्या दुबळेपणाचेच रुपांतर माझ्या मनाच्या सामर्थ्यात करण्याची क्रिया; हाच एकमेव खराखुरा चमत्कार.

उत्तर – माझी परमेश्वरावरील भक्ती ज्या प्रमाणात माझ्या अंतर्मनाचा ताबा घेते, त्याच प्रमाणात माझ्या अंतर्मनात दडलेली अनेक भये नाहीशी होत राहतात.
हेच ते भक्तीचे फल.

उत्तर – सन्मार्गाने व्यवहार करत राहणे व असा व्यवहार करता करता अंतर्मन हळूहळू परमेश्वरी मनाच्या प्रवेशासाठी मोकळे करत जाणे म्हणजेच अध्यात्म; व जीवनात अध्यात्म हे अंतिम ध्येय साकार करण्यासाठी देहोपयोगी क्रिया सन्मार्गाने चालविणे हाच व्यवहार.
सत्य, प्रेम व आनंद हीच एकमेव अध्यात्माची त्रिसूत्री आहे तर भक्ती, सेवा आणि संस्कारांचे शुद्धीकरण हीच केवळ अध्यात्माची साधने आहेत. व्यावहारिक जीवन जगताना ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम व वानप्रस्थाश्रम जास्तीत जास्त सन्मार्गाने म्हणजेच धर्माने अर्थ व काम हे पुरुषार्थ मिळवून करणे, हीच आध्यात्मिक जीवनाची पहिली यशस्वी पायरी आहे व अशा प्रकारे प्रपंच करीत असताना सेवा व भक्तीचा अवलंब करून स्वत:चे अधिकाधिक शुद्धीकरण घडवून आणणे, ही अध्यात्माची दुसरी यशस्वी पायरी आहे.
आपल्या जीवनातील प्रत्येक कार्य आपण परमेश्वराकरिता करत आहोत व परमेश्वराला प्रत्येक गोष्ट त्याच क्षणी कळत असते, हे लक्षात ठेवून जगणे म्हणजेच आध्यात्मिक जीवन व हाच मार्ग खरेखुरे समाधान, शांती व नित्यप्रसन्नता देणारा असतो.

उत्तर – प्रत्येक जीवात्म्याचा पुरुषार्थ ह्यातच आहे की, मृत्यूचे भय व मरणाची आगतिकता पूर्णपणे नाहीशी झाली पाहिजे. जीवन सफल करायचे असेल तर मला माझ्या जीवनात तृप्ती, शांती, समाधान आणणे आवश्यक आहे.

उत्तर – प्रत्येक मानवाच्या अंतर्मनात सर्व प्रकारची बीजे असतातच. चांगल्या व वाईट, शुद्ध व अशुद्ध अशा दोन्ही प्रकाराची बीजे एकत्रच नांदत असतात. ह्यातले कुठले बीज कधी उगवेल व वाढू लागेल हे माझ्या प्रारब्धानुसार ठरते,

परंतु उगवलेले कुठले रोप वाढू द्यायचे व कुठले रोप त्याचा समुळ नायनाट होईपर्यंत कापत रहायचे, हे मात्र माझ्या हातात असते. ह्यालाच ’कर्मस्वातंत्र्य’ असे म्हणतात.

उत्तर – काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे षड्‌रिपू म्हणजेच प्रत्येक मानवाचे पूर्णतेचे स्वप्न साकार न होऊ देणारे सहा शत्रू.

क्रोधामुळे मनुष्य सर्व भान हरवून बसतो आणि मग बर्‍याचवेळा ‘केवळ एका रागाच्या आवेशात घडलेल्या चुकीचे प्रायश्‍चित म्हणून संपूर्ण लौकिक आयुष्य बेचिराख होते.’

मला क्रोध कुणामुळे तरी येत असतो असे आपल्याला प्रत्येकाला वाटत असते, नव्हे तसा आपला ठाम विश्वासच असतो. परंतु क्रोध माझ्या मनात राहतो, वाढत जातो व मग त्याला सोयीचे कारण सापडले की उफाळून प्रगट होतो एवढेच. चुकीचे विचार, चुकीचा आहार, विहार व चुकीच्या अपेक्षा ह्या सर्वांचे खतपाणी मिळून मनातील क्रोध बळकट होत जातो.

क्रोध हा सर्वात प्रभावी व क्षणात होत्याचे नव्हते करणारा भस्मासुरच.

अन्यायाची चीड येणे हे जिवंतपणाचे लक्षण आहे. परंतु क्षुल्लक कारणावरून मनातल्या मनात किंवा उघडपणे संतापाने वागणे हे मला स्वत:लाच जास्त घातक असते.मी अतिशय रागावल्यामुळे व राग कमी करण्याचा प्रयत्न न केल्यामुळे शरीरामधील अनेक रासायनिक क्रियांवर त्याचे दुष्परिणाम होतात व ते बराच काळ टिकतात. उच्च रक्तदाब (High Blood Pressure), जठरव्रण (Peptic Ulcer), अम्लपित्त (Acidity), हृदयविकार (Heart Diesease), संधिवात (Arthritis), दमा (Bronchial Asthama) इत्यादि अनेक रोग हे रागाला ‘ओ’ देण्यानेच वाढतात हे आधुनिक वैद्यकशास्त्रही आम्हाला सांगते. क्रोधामुळे महाप्राणाचा मनावर असणारा ताबा क्षीण होतो. अर्थातच माझ्या मनावरील परमेश्वरी अंमल क्रोध सैल करतो. अर्थातच क्रोध माझ्या भक्तिमार्गातील प्रवासाच्याही आड येतो.

उत्तर – रोगांना आमंत्रण देणारा आणि परमेश्वरी कृपेला अडथळा बनणारा हा क्रोध म्हणजे मानवाचा सर्वात मोठा शत्रू. भस्मासुराने ज्याप्रमाणे स्वत:च्याच मस्तकावर हात ठेवून स्वत:लाच जाळले त्याप्रमाणे आपण आपल्या क्रोधाचाच राग मनात धरल्यासच हा क्रोधाचा भस्मासुर नष्ट होईल. परंतु ह्या भस्मासुराला हे करावयास लावणारी ती ‘मोहिनी’ म्हणजे काय? महाविष्णूचा तो मोहिनी अवतार म्हणजेच परमात्म्याची ‘सगुण भक्ती’. परमेश्वराच्या नामरूपाची मोहिनी ज्या प्रमाणात माझ्या अंतरंगात प्रवेश करते, तिच्या एकेका पदन्यासाबरोबर माझ्यातील षड्‌रिपू त्या त्या प्रमाणात नष्ट होतात व तेवढ्याच प्रमाणात परमेश्वराची ऐश्वर्ये माझ्या आयुष्यात प्रवेश करतात.

उत्तर – दत्तगुरु, सहजशिव महादुर्गेश्‍वर व जगदंबा दुर्गा ह्या तिघांनाच व तिघांना मिळून ‘नाथ’ ही संज्ञा आहे. दत्तगुरु म्हणजे निर्गुण अर्थात निरंजननाथ, सहजशिव महादुर्गेश्‍वर म्हणजे आदिनाथ अर्थात सगुणनाथ आणि जगदंबा दुर्गा म्हणजे उदयनाथ अर्थात सकलनाथ. ह्या तिघांनाच ‘नाथ’ अर्थात ‘परमेश्‍वर’ असे म्हटले जाते. ‘नाथ’ नामामध्ये ‘न’ हा निरंजननाथाचा वाचक आहे, ‘आ’ हा सगुणनाथाचा वाचक आहे आणि ‘थ’ हा सकलनाथाचा वाचक आहे.

उत्तर – परब्रह्म परमेश्‍वर दत्तगुरुंच्या ‘एकोऽस्मि बहुस्याम्’ ह्या आद्य स्फुरणातून म्हणजेच इच्छेतून हे विश्‍व उत्पन्न झाले व ह्या त्यांच्या संकल्पाबरोबरच ते परमेश्‍वर स्वत:च ‘श्रीमन्नारायण’ अर्थात् ‘श्रीमहादुर्गेश्‍वर’ झाले व त्यांची इच्छा हीच आदिमाता गायत्री, जगदंबा, चण्डिका झाली.  लीलाधारी परमेश्‍वर स्वतःच्या लीलेतून या विश्‍वाची उत्पत्ती करतो, स्व-लीलेनेच तो या विश्‍वाचे संचालन करतो आणि आपल्या लीलेनेच तो या विश्‍वाचा स्वतःमध्ये लय करतो.

परमेश्‍वर दत्तगुरुंच्या या लीलाशक्तीसच ‘ललिता’ असे म्हणतात. आदिमाता जगदंबा ललिता हीच परमेश्‍वराची आद्यलीला आहे, प्रथमलीला आहे. हीच ह्या परमपिता दत्तगुरुची, नित्यशिवाची नित्यलीला आहे. हीच या महाकामेश्‍वराची आद्य कामना आहे.

ललिता हीच आदिविद्या, शुद्धविद्या, पराशक्ती, चण्डिका, महादुर्गा, श्रीविद्या आहे. परमेश्‍वर ‘श्रीमन्नारायण’ आहे, तर ही परमेश्‍वरी ‘नारायणी’ आहे; परमेश्‍वर ‘महादुर्गेश्‍वर’ आहे, तर ही ‘महादुर्गा’ आहे; परमेश्‍वर ‘महाकामेश्‍वर’ आहे, तर ही ललिता ‘महाकामेश्‍वरी कामकला’ आहे.

उत्तर – प्रजापतिब्रह्मा, महाविष्णू व परमशिव ही तीनही रूपे म्हणजे सहजशिव व जगदंबेचे तीन पुत्रच आहेत व हे तुम्हीही जाणताच.

तसेच ह्या तिघांची रूपे व कार्ये वेगवेगळी असली, तरीदेखील ह्या तिघांचे मूळ रूप ‘ॐकारस्वरूप परमात्मा’ हेच आहे.

प्रत्येक मनुष्याला त्याच्या आधीच्या जन्मांच्या अनुभवांनुसार व कर्मांनुसार पुढील जन्मात आवड, नावड व निवड ह्या तीन गोष्टी प्रत्येक बाबीसाठी आपोआप प्राप्त होतात. त्यामुळेच कुणाला एक दैवत आवडेल, तर दुसर्‍याला दुसरेच; आणि ह्या चण्डिकाकुलाच्या सदस्यांची अनेक रूपे जनमानसात घट्ट आहेत व त्या सर्व रूपांचे प्रतिनिधित्व आणि केंद्रीकरण महाविष्णू व परमशिव आणि लक्ष्मी व पार्वती ह्यांच्यामध्ये होत असते.

कारण ह्या दोघांची केलेली उपासना त्रि-नाथांनाच पोहोचत असते.

महाविष्णूच्या भक्तांची उपासना महाविष्णूचेच रूप घेऊन, परंतु सहस्रबाहू धारण करून नारायण ह्या नामाने सहजशिव स्वीकारतो आणि जगदंबा नारायणी रूपाने स्वीकारते,

तर परमशिवाची उपासना सहजशिव ‘महादेव’ ह्या नामाने व सहस्रहस्त शिवाच्या रूपाने स्वीकारतो आणि जगदंबा ‘शिवा’ व ‘महादेवी’ ह्या नामाने स्वीकारते.

ह्या त्रि-नाथांच्या योजनेमुळे अर्थात ‘नाथसंविध्’मुळे कुठल्याही रूपाला मानणारा भक्त त्रि-नाथांच्या आशीर्वादापासून वंचित राहू शकत नाही.

उत्तर – सच्चिदानंद अर्थात सत्, चित्, आनंद स्वरूप असणार्‍या परमेश्‍वर दत्तगुरु, आदिपिता सहजशिव नारायण व आदिमाता जगदंबा नारायणी ह्या त्रि-नाथांचा  सर्व विश्‍वाला व्यापणारा व भक्तांच्या जीवनात सर्वत्र भरून राहणारा ‘जिवंत आनंद’ म्हणजेच स्वयंभगवान, अर्थात त्रि-नाथांचा आनंद म्हणजेच त्रिविक्रम.

त्रिविक्रम हा त्रि-नाथांमधील परमेश्वरी प्रेमसेतु आहे.

‘त्रिविक्रम’ आणि ‘स्वयंभगवान’ हे दोन शब्द एकरूपच आहेत.

उत्तर – ‘ॐ’ हा एकाक्षरमंत्र ज्याप्रमाणे त्रि-नाथांच्या सामर्थ्यांनी युक्त आहे, तो विश्‍वाच्या प्राकट्याचे मूळ बीज आहे, त्याचप्रमाणे ‘राम’-नाम हे त्रि-नाथांचे एकत्र अस्तित्व धारण करणारा सर्वश्रेष्ठ मंत्र आहे. ह्यामधील ‘रं’ म्हणजे अग्नि अर्थात सहजशिव, ‘आ’ म्हणजे मूळ दैवी प्रकाश अर्थात सच्चिदानंद, ‘आ’नंदबीज आणि ‘म’ हे आदिमातेचे बीज (षोमबीज). ह्यामुळे जरी ‘राम’ ह्या नामाचा महाविष्णूने अभिमान धारण करून रामजन्म होणार असला, तरी ‘राम’नाम मात्र संपूर्ण त्रि-नाथकुलाचे सर्व बीजमंत्र आपल्या उदरात धारण करते.

दत्तगुरुंना आणि म्हणूनच सहजशिवाला व जगदंबेला ‘राम’ हे नाम सर्वाधिक प्रिय आहे. रामनामामध्ये ‘रा’ रूपाने सहजशिवाचे सामर्थ्य अर्थात पितृत्व-सामर्थ्य आणि ‘म’रूपाने जगदंबेचे सामर्थ्य अर्थात मातृत्व-सामर्थ्य प्रत्येकासाठी, प्रत्येक श्रद्धावानासाठी, त्याला आवश्यक त्या प्रमाणात नांदत असते. ह्या रामनामाचे वहन स्वतः हनुमंत करतो आणि ह्या रामनामाचेच शरीर त्रिविक्रम धारण करतो.

उत्तर – नाथसंविध् म्हणजे जगदंबा दुर्गेने पूर्वीच्या जन्मांपेक्षा वेगळी अशी तयार केलेली नवीन जन्मासाठीची विशेष योजना.  नाथसंविध् अर्थात ही जन्मयोजना म्हणजे दत्तगुरु, आदिपिता महादुर्गेश्‍वर व आदिमाता जगदंबा दुर्गा ह्यांच्या इच्छा, प्रेम, करुणा, क्षमा व सामर्थ्यसाह्यता ह्या पंचविशेषांनी घडविलेला संपूर्ण जीवनाचा आराखडा. मानवाने ह्याच आराखड्यानुसार चालावे म्हणूनच तर तो एकच एक भगवान त्रिविक्रम मानवाची श्रद्धा बळकट होण्यासाठी व त्याच्या सद्गुणांचा विकास करण्यासाठी सतत कार्य करीत असतो. मात्र हा आराखडा मानवाच्या कर्मस्वातंत्र्याच्या आड येऊन दिला जात नाही. मानव हा आराखडा स्वीकारण्यास किंवा नाकारण्यास स्वतंत्र असतो. परंतु हा नाथसंविध् आराखडाच मानवासाठी सर्वांत श्रेयस्कर असतो.

उत्तर – ’अंबज्ञता’ म्हणजे आदिमातेविषयी श्रद्धावानाच्या मनात असणारी व कधीही न ढळू शकणारी असीम कृतज्ञता.

उत्तर – सर्व सच्च्या श्रद्धावानांचे पाप म्हणजेच हलाहल विष प्राशन करणे हे त्रिविक्रमाचे प्रमुख कार्य आहे आणि म्हणूनच हा एकमेव असा आहे की ज्याचे चरण पूर्ण विश्‍वासाने धरणार्‍या, पाहणार्‍या व त्यांचे स्मरण करणार्‍या सच्च्या श्रद्धावानाचे प्रत्येक पाप हा फक्त लहानशा चुकांमध्ये परिवर्तित करीत राहतो.

उत्तर – त्रिविक्रमाच्या दर्शनामुळे कुणाही भक्ताला प्रथम प्राप्त होते ती मनःशांती. कुणाला शंभर टक्के मनःशांती मिळेल, कुणाचे मन पन्नास टक्केच शांत होईल. पण त्रिविक्रमाच्या तसबिरीच्याही दर्शनानंतर मन जराही शांत झाले नाही असे कधीच होत नाही आणि होणारही नाही.

उत्तर – जेव्हा जेव्हा श्रद्धावान विरुद्ध श्रद्धाहीन अशी परिस्थिती असते, तेव्हा तेव्हा श्रीत्रिविक्रम हा फक्त श्रद्धावानांनाच सहाय्य करीत असतो.

परंतु जेव्हा श्रद्धाहीनांमध्येच अंतर्गत संघर्ष सुरू होतो, तेव्हा हाच श्रीत्रिविक्रम त्यांच्यामधील जो गट केवळ अज्ञानामुळे श्रद्धाहीन बनलेला आहे, त्याच्या पाठीशी उभा राहतो व आधी त्यांना श्रद्धावान बनवून मग त्यांना विजयी करतो.

अशा प्रकारे श्रीत्रिविक्रम केवळ श्रद्धावानांनाच विजयी करीत असतो. म्हणूनच त्याला ‘श्रद्धावानांचा कैवारी’ म्हटले जाते.

उत्तर – त्रिविक्रम श्रद्धावानांच्या जीवनात सदैव तीन पातळ्यांवर एकाच वेळेस कार्यरत असतो. तरल स्तरावर तो ‘आकाश’ महाभूताच्या माध्यमातून ‘शब्द’ अर्थात ‘विचार’ ह्या मार्गाने कार्यशील राहतो; तर सूक्ष्म स्तरावर हा त्रिविक्रम ‘वायु’ महाभूताच्या माध्यमातून ‘स्पर्श’ अर्थात ‘प्रेरणा’ ह्या मार्गाने कार्यरत असतो; तसेच स्थूल स्तरावर हा त्रिविक्रम ‘अग्नि’ महाभूताच्या माध्यमातून ‘तेज’ अर्थात ‘कार्योत्साह, कार्यशक्ति व कृतिसामर्थ्य’ ह्या मार्गाने कार्य करीत असतो. 

उत्तर – भगवान त्रिविक्रम आपल्या भक्तांना कृतघ्नतेचे पाप लागू नये म्हणून त्यांच्याकडून आभार किंवा भेट स्वीकारत नाही. त्रिविक्रमाला फक्त आभार मानणे नको असते. कारण मग नियमानुसार त्या भक्ताकडे आभाराच्या बदल्यात तेवढे पुण्य येते व श्रद्धावान आभार मानावयास विसरला, तर तेवढे पाप येऊ शकते

आणि असे पाप आपल्या भक्तांकडे जावे हे त्रिविक्रमाला कधीच आवडणार नाही.

म्हणूनच त्रिविक्रमाला जे द्यायचे, अर्पण करावयाचे ते फक्त प्रेमाने व श्रद्धेने करा, नवस पूर्ण करण्यासाठीसुद्धा करा; परंतु आभार (Thanks) म्हणून नाही, तर फक्त प्रेमाने.

श्रद्धावानाने त्रिविक्रमाला प्रेमाने सर्वकाही देत रहावे. फक्त त्याचे आभार न मानता, त्याऐवजी ‘माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे’ असे सांगत रहावे.

कारण प्रेम, श्रद्धा, भक्ती, निष्ठा व विश्‍वास हेच पंचोपचार त्रिविक्रमाला सर्वांत प्रिय आहेत.

उत्तर – मनास कुठल्याही ज्ञानाच्या चिंतनाने शांती प्राप्त होत नाही. शांती व सुख प्राप्त होते ते केवळ आणि केवळ भक्तिभाव चैतन्यात राहण्याने.
भगवंताच्या उपदेशाचे स्मरण करताना जर भगवंताचे चिंतन व नामस्मरण केले नाही, म्हणजेच जर भगवंतवाक्यांचे चिंतन जर भक्तिभाव चैतन्य विरहीत असेल तर उपयोगाला येऊ शकत नाही. भगवंतावरील प्रेमाशिवाय सर्व काही व्यर्थ आहे.

उत्तर – स्वयंभगवान त्रिविक्रमाच्या नाम-मंत्रगजर, त्रिविक्रमाचे रूपसौंदर्य, त्रिविक्रमाच्या लीला आणि त्रिविक्रमाचे मूळ धाम (अर्थात त्रि-नाथांचे अनाकलनीय पवित्र अस्तित्व) ह्यांच्यावर प्रेम करीत राहण्यानेच कुणाही भक्ताला आपोआप स्वयंभगवान त्रिविक्रमाचे प्रेम अनुभवता येते.

उत्तर – या सार्वभौम मंत्रगजराचा प्रथमार्ध म्हणजेच श्रध्दावानांनी त्रिविक्रमाची व त्रि-नाथांना केलेली प्रार्थना आणि ह्या सार्वभौम मंत्रगजराचा द्वितियार्ध म्हणजेच भगवान त्रिविक्रमाकडून श्रद्धावानांसाठी येणारा कृपेचा स्त्रोत अर्थात प्रसाद. हा महामंत्र सार्वभौम आहे. कारण हा एकमेवाद्वितीय असा परिपूर्ण मंत्र आहे. जेथून हा मंत्र सुरू होते तेथेच येऊन थांबतो, म्हणजेच वर्तुळ पूर्ण होते.

उत्तर – स्वयंभगवान त्रिविक्रमाचा मंत्रगजर मानव सुखात असेल तेव्हाही, अडचणीत किंवा दुःखात असेल तेव्हाही, आणि त्याचप्रमाणे सुख व दुःख दोन्ही नसतील अर्थात विशेष काही घडत नसेल तेव्हाही करू शकतो; म्हणजेच कुठल्याही परिस्थितीत करू शकतो.

उत्तर – समुद्र आणि समुद्रातील एक थेंब ह्याच्यामधील नाते म्हणजेच स्वयंभगवान आणि प्रत्येक मानव ह्यांच्यामधील नाते.
रासायनिकदृष्ट्या समुद्राचे जल व त्या जलाचा वेगळा झालेला थेंब ह्यांच्यामध्ये काहीच फरक नाही अर्थात अभेद आहे. परंतु अख्ख्या समुद्राचे सामर्थ्य आणि त्या वेगळ्या पडलेल्या थेंबाचे सामर्थ्य ह्यांच्यामध्ये तुलना होऊ शकत नाही.

उत्तर – ’मी’ भगवंतात आहे, मी भगवंताचा आहे, भगवंत माझ्या हृद्‌यात आहे, भगवंताच्या प्रेमातच मी सुखाने जगू शकतो, हे शाश्वत सत्य जेव्हा मानव विसरतो व भगवंताचा आधार केवळ गरजेपुरताच घेत राहतो, तेव्हा त्या मानवाची स्थिती, समुद्रापासून अलग पडलेल्या एका थेंबासारखी बनते – तो थेंब अर्थात जीवात्मा अर्थात तो मानव यत्किंचित अर्थात अल्प बनतो आणि काही करू न शकता जमिनीत शिरून चिखल बनतो.

समुद्रापासून वेगळा पडलेला थेंब, जेव्हा सूर्याच्या उष्णतेने वाफ होऊन वर आकाशात जातो आणि पर्जन्याचा थेंब बनून परत सागरात येऊन पडतो, तेव्हा त्या थेंबाला संपूर्ण सागराचे सामर्थ्य प्राप्त होते अर्थात त्या थेंबाला अख्ख्या समुद्राचे पाठबळ मिळते. त्याचप्रमाणे मानव जेव्हा ’मी त्या अनंत व अथांग असणार्‍या स्वयंभगवानाचा अंश आहे’ ह्याची जाणीव सदैव बाळगतो, तेव्हा त्याला त्या भगवत्‌समुद्राकडून सर्वकाही पुरविले जाते.

मी भगवंताचा अंश आहे अर्थात भगवंतापासून अलग पडलेलो नाही हे सत्य जीवनात उतरविण्याचा सर्वश्रेष्ठ व अत्यंत सुलभ, सोपा मार्ग म्हणजे भक्तिभाव चैतन्य.

उत्तर – मानवाचे मन जरी भगवत्परायण झाले तरीही जोपर्यंत त्याला शरीराची साथ मिळत नाही, तोपर्यंत मन निश्चल बनू शकत नाही आणि चंचल मनाला सतत भगवत्परायण राहणे जमू शकत नाही. आणि म्हणूनच जेथे जेथे मन चंचल व दुर्बल बनू शकते, तेथे तेथे वरील प्रकारच्या उपासना शरीर व बुद्धीला मनाशी बांधून ठेवतात. पूजनादि सर्व बाह्योपचार म्हणजे मानवाच्या प्राणमय देहातील ऊर्जाकेंद्र समर्थ करण्याचे व शुद्ध करण्याचे विविध मार्ग.
जोपर्यंत देह आहे, तोपर्यंत श्रद्धावानाला भजन, पूजन, अर्चन, हवन, तीर्थयात्रा, व्रते इ. बाह्योपचारांची आवश्यकता आहेच.

उत्तर – भक्तिभाव चैतन्यात राहिल्यामुळे उद्धाराचा मार्ग खुला होतो व थोड्या प्रतीक्षेनंतर भक्त पापमुक्त होतो, म्हणजेच भक्तिभाव चैतन्यात राहिल्यामुळे ’कर्माच्या अटळ सिद्धांताचा’ प्रभाव नष्ट होण्यास मदत होते.
पापाचे ’पाप’पण आणि पुण्याचे ’पुण्य’पण ह्या दोन्ही गोष्टींपासून तो स्वयंभगवान अलिप्त असतो. हा स्वयंभगवान फक्त भक्तिभाव चैतन्यातच लिप्त होतो. स्वयंभगवान श्रीकृष्णांनी भगवद्‌गीतेतील ९व्या अध्यायातील ३०व्या श्लोकात स्पष्टपणे सांगितले आहे – जर कुणी अत्यंत दुराचारी माझे अनन्यभावाने भजन करतो, तर त्याने फार चांगल्या रितीने भक्तीचा निश्चय केलेला आहे म्हणून त्याला पवित्रच मानले पाहिजे.
खरा सद्‍गुरु तो स्वयंभगवान स्वतः एकच एक आहे व शुभात्रेयीने केलेला त्याचा मंत्रगजर अशा सुदुराचार्‍यांना अर्थात जे अत्यंत व सांगोपांग दुराचारी आहेत, ज्यांनी पापांची अंतिम मर्यादा ओलांडली आहे, ज्यांना कुठलेही पाप करायचे शिल्लक ठेवलेले नाही, अशा मूढांनासुध्दा, त्यांनी भक्तिभाव चैतन्यात प्रवेश केल्यास पापहीन करतो.

उत्तर – स्वयंभगवान हाच एकमेव कर्ता आहे. कारण ह्या विश्वातील प्रत्येक गोष्ट कशीही घडत असो, कुणीही आपले कर्मस्वातंत्र्य कसेही वापरात असो, शेवटी सकळ सूत्रे ह्या स्वयंभगवानाच्याच हातात असतात. सर्व सूत्रे हा व्यवस्थित हलवत असतो आणि म्हणूनच ह्याला ’सूत्रात्मा’ असे नाव आहे.

उत्तर – भक्ती करतो तो ’भक्त’ आणि भक्तिभाव चैतन्यात राहतो तो खरा भक्त अर्थात ’श्रद्धावान’.

भक्तिभाव चैतन्य संबंधित प्रश्न येथे विचारा

author avatar
Aniruddha Premsagar
Scroll to top