‘पिपा तुझा दास, बापू तुझी आस’ ही ओळ प्रत्यक्ष जगलेल्या आद्यपिपादादांच्या ‘पिपासा’ या भक्तिरचनांद्वारे आम्हां सर्वांना सद्‍गुरु भक्तिभावचैतन्यात राहण्याविषयी मार्गदर्शन मिळते. भक्तिभावचैतन्यात राहू इच्छिणार्‍या प्रत्येकास सद्‍गुरुचरणी नेऊन स्थिर करणार्‍या पिपीलिकापंथाचे आद्य पांथस्थ आहेत, आद्यपिपा.

भक्तिमार्गावरून चालताना पाय जमिनीवर ठेवून, लघुरूप धारण करून, रूपकात्मक अर्थाने मुंगीसारखे लहान होऊन प्रवास केला पाहिजे आणि सद्‍गुरुभक्तीचे माधुर्य सतत धारण केले पाहिजे असा आद्यपिपांचा विश्वास होता आणि म्हणूनच त्यांनी ज्या मार्गावरून सद्‍गुरुभक्तीचा प्रवास यशस्वीपणे केला, त्यास ‘पिपिलिकापथ' असे म्हटले जाते.

आद्यपिपांना त्यांच्या वडिलांकडून मिळालेला शिरडी साईनाथांच्या भक्तीचा वारसा त्यांनी निष्ठेने जपला आणि पुढे सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांच्या भेटीनंतर त्यांचा भक्तिमार्गावरील प्रवास वेगाने सुरू झाला. ‘बापू भेटला ज्या क्षणी, मन हे जाहले उन्मनी’ असे आद्यपिपा बापूंना भेटताच झालेल्या त्यांच्या भावपूर्ण मन:स्थितीचे वर्णन करताना म्हणतात. आद्यपिपांच्या पत्नी सौ. शुभदा यांची त्यांना त्यांच्या या प्रवासात मोलाची साथ लाभली.

वयाच्या बाराव्या वर्षी म्हणजे १९४५ साली त्यांनी श्रीसाईसच्चरिताचे दर वर्षी कमीत कमी चार सप्ताह करण्याचा संकल्प केला आणि श्रीसाईसच्चरितात सांगितल्याप्रमाणे रामनवमी, गुरुपौर्णिमा, गोकुळाष्टमी व दसरा या दिवशी ते त्यांच्या सप्ताहाची सांगता करत.

सतत साठ वर्षे अव्याहतपणे त्यांचा हा नेम सुरू होता आणि २६ ऑगस्ट २००५ रोजी गोकुळाष्टमीच्या पावन पर्वावर त्यांच्या लौकिक जीवनाध्यायाची सांगता झाली.

त्यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ श्रीक्षेत्र गुरुकुल जुईनगर येथे १९ एप्रिल २००७ रोजी त्यांच्या म्हणजेच सच्च्या साईभक्ताच्या रक्षाकलशाची स्थापना करून समाधि स्मारकाची निर्मिती केली गेली. आद्यपिपांच्या पत्नी सौ. शुभदा, त्यांचे पुत्र सुचितदादा व समीरदादा यांच्या हस्ते समाधि स्मारक स्थानी त्यांच्या रक्षाकलशाची स्थापना सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांच्या उपस्थितीत करण्यात आली.

आद्यपिपांच्या वडिलांना सद्‍गुरु साईनाथांकडून मिळालेली उदी त्यांनी आद्यपिपांकडे दिली होती आणि आद्यपिपांना सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांकडून उदीचा प्रसाद लाभला होता. आद्यपिपांकडील ह्या उदीसही त्यांच्या समाधि स्मारक स्थानी ठेवण्यात आले.

समाधि स्मारकास एकूण सहा पायऱ्या असून त्यांतील प्रत्येक पायरी एकेका पुरुषार्थाचे प्रतिनिधित्व करते. पिपीलिकामार्गावरून प्रवास करून धर्म, अर्थ, काम, मोक्ष, भक्ती आणि मर्यादा ह्या पुरुषार्थांची सिद्धता करण्याचे स्मरण हे समाधि स्मारक करून देते. आद्यपिपांच्या नित्यपठणातील श्रीसाईसच्चरिताची पोथी समाधि स्मारक स्थानी ठेवली असून पाठीमागे सद्‍गुरु श्रीसाईनाथांचे छायाचित्रही आहे.

सन २००७ पासून दर वर्षी आद्यपिपा समाधि स्मारक स्थापना दिन मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. या वेळी समाधिस्थळी पूजन, अभिषेक, आरती आदि विधि संपन्न होतात आणि त्याचबरोबर सुचितदादांच्या आवाजात ध्वनिमुद्रित केलेला श्रीसाईसच्चरिताचा अकरावा अध्यायही लावला जातो. आद्यपिपांच्या संपूर्ण जीवनात जसा भक्तिचा सुगंध पसरला, तसाच भक्तीचा सुगंध माझ्याही जीवनात पसरावा या भावनेने श्रद्धावान समाधीला अत्तर अर्पण करतात. दिवसभर श्रद्धावान मोठ्या प्रेमाने समाधि स्मारक स्थानाचे दर्शन घेतात. साई-साईनिवास-बापू ह्यांचे परस्परांशी असलेले नाते प्रत्येक श्रद्धावान जाणतोच. सद्‍गुरु साईनाथांच्या भक्तीचे अधिष्ठान लाभलेल्या आद्यपिपांना सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांच्या भेटीनंतर अनेक भक्तिरचना स्फुरल्या. त्यांमधील काही भक्तिरचना श्रद्धावानांकडून उत्सवस्थळी गायल्या जातात.

‘नाहू तुझिया प्रेमे अनिरुद्ध प्रेमसागरा’, ‘पिपा सांगतो अनुभवे, फक्त अनिरुद्ध गावे’, ‘बापू कथा-कीर्तने दंग राही’ असे आद्यपिपांनी आम्हाला त्यांच्या भक्तिरचनांमधून सांगितले आहेच. आद्यपिपांचे स्मरण, त्यांच्या भक्तिरचनांचे स्मरण आमची सद्‍गुरुभक्ती दृढ करते.

सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांच्या उपस्थितीत सन २०१३ आणि २०१४ साली झालेल्या सोहळ्यातील क्षणचित्रे

सन २०१३

सन २०१४

या वर्षी आद्यपिपा समाधिस्थानम् स्थापना दिन सोहळा शनिवार दि. २९ एप्रिल २०२३ रोजी श्रीक्षेत्र गुरुकुल जुईनगर येथे सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत साजरा केला जाणार आहे.

सद्‍गुरुंच्या भक्तिभावचैतन्यात राहून आद्यपिपांनी ज्याप्रमाणे ‘मीच ह्याचा हाचि माझा, अनिरुद्ध अवघा, पिपाचा अनिरुद्ध अवघा’ हे सद्‍गुरुभक्तिचे शिखर गाठले, त्याप्रमाणे प्रत्येक जण पिपा होऊन म्हणजेच पिपीलिकापांथस्थ होऊन सद्‍गुरुभक्तिमार्गातील सर्वोच्च ध्येय गाठू शकतो हा विश्वास आद्यपिपा समाधि स्मारक स्थान आम्हाला देत राहते, ही प्रेरणा आम्हाला त्यांच्याकडून मिळत राहते.

author avatar
Aniruddha Premsagar
Scroll to top