"भक्तिभाव चैतन्य"

भक्तिभाव चैतन्य म्हणजे आपण स्वयंभगवान त्रिविक्रमाचे (The Supreme Personality of Godhead) होऊन राहणे व तो माझ्याबरोबर सदैव आहे, ह्याची जाणीव बाळगणे.

अर्थात खरेखुरे भगवत्ज्ञान व खरेखुरे भगवत्भान

सच्चिदानंद अर्थात सत्, चित्, आनंद स्वरूप असणार्‍या परमेश्‍वर दत्तगुरु, आदिपिता सहजशिव नारायण व आदिमाता जगदंबा नारायणी ह्या त्रि-नाथांचा सर्व विश्‍वाला व्यापणारा व भक्तांच्या जीवनात सर्वत्र भरून राहणारा ‘जिवंत आनंद’ म्हणजेच स्वयंभगवान, अर्थात त्रि-नाथांचा आनंद म्हणजेच त्रिविक्रम.

‘त्रिविक्रम’ आणि ‘स्वयंभगवान’ हे दोन शब्द एकरूपच आहेत.

ह्या स्वयंभगवानाच्या, कुठल्याही आपल्याला आवडणार्‍या रूपाशी जोडून घेणे व अधिकाधिक जोडून घेत राहणे म्हणजेच भक्तिभाव चैतन्य.

हे भक्तिभाव चैतन्य व त्याचा मूळ स्रोत दोन्हीही अथांग व अनिरुद्ध अर्थात ज्यांची गती कुणीही जाणू शकत नाही आणि ज्यांची गती कुणीही रोखू शकत नाही असे!

राम, हरि, हर, हरिहर, कृष्ण, शिव, ईश्‍वर, सर्वेश्‍वर किंवा इतर कुठल्याही तुमच्या आवडत्या नामाने तुम्ही त्याला साद घालू शकता.

भक्तिभाव चैतन्यात राहणे म्हणजे काही कडक व कठोर आणि कष्टप्रद नियमांचा मार्ग नव्हे, तर भक्तिभाव चैतन्य हा भगवंताशी शुद्ध व जिवंत नाते कायम राखण्याचा मार्ग आहे - ह्या मार्गामध्ये जे काही करायचे, ते फक्त प्रेमानेच.

कुठलेही नियम करायचे आणि पाळायचे, तेसुद्धा प्रेमानेच.

आपले जीवन जगत असताना अनेक गोष्टी भगवंतासाठी करत राहणे व हातून घडलेली सर्वच्या सर्व कर्मे भगवंताच्या चरणी अर्पण करीत राहणे, हा भक्तिभाव चैतन्याचा एकमेव नियम आहे.

ह्या भक्तिभाव चैतन्यामध्ये स्वयंभगवानाचा मंत्रगजरहा सर्वोच्च मंत्र मानला जातो. कारण हा दत्तभगिनी शुभात्रेयीने केला आहे.

ह्या मंत्रगजरातून भक्तिभाव चैतन्याच्या लहरी उसळत राहतात आणि ज्याला ज्याला म्हणून स्वतःचे जीवन चांगले घडवायचे आहे, त्याला सर्व काही पुरविले जाते.

जो श्रद्धावान ह्या मंत्रगजराच्या १६ माळा दररोज, ह्याप्रमाणे कमीतकमी ३ वर्षे करतो, त्या श्रद्धावानाच्या विशुद्ध चक्राच्या (कंठकूप चक्राच्या) सोळाच्या सोळा पाकळ्या शुद्ध होतात अर्थात त्याचे विशुद्ध चक्र ‘हनुमत्चक्र’ बनते. मग कुठल्याही जन्मात तो सुखाने येतो, आनंदात राहतो आणि आनंदातच विलीन होतो.

१ माळ - १०८ वेळा सदगुरु श्री अनिरुद्ध बापूंच्या आवाजात (वेळ १८.२६मिनिटे)

ज्याला दररोज १६ माळा करणे जमणार नाही, त्याने आपापल्या कुवतीनुसार ‘न मोजता’ हा मंत्रगजर करीत रहावा आणि तो जप ‘त्या’च्या चरणी अर्पण करीत रहावे - अशा श्रद्धावानाचे जीवनही सुंदर होतच राहणार.

स्वयंभगवानाचा स्पर्श ज्याला झाला, ती वस्तू, पदार्थ, व्यक्ती आपोआप पवित्र होते व ह्याला अपवाद नाही.

‘हा स्वयंभगवान प्रेमळ व कृपाळू आहे’ हा ठाम विश्‍वास बाळगूनच जप करा, ह्याच्या प्रतिमेचे पूजन करा, ह्याच्या पादुकांचे अर्चन करा, ह्याच्या चरणांकडे पाहत रहा, ह्याच्या मुखाकडे पाहत ह्याचे सौंदर्य पीत रहा, ह्याच्या मूर्तीला अर्थात अर्चनविग्रहाला ‘जिवंत देव’ जाणून सर्व प्रकारे सेवा करा आणि केवळ ह्याला आवडते म्हणून खर्‍याखुर्‍या गरजू श्रद्धावानांना सहाय्य करा, हेही भक्तिभाव चैतन्यच.

‘हा स्वयंभगवान, देवाधिदेव, त्र्यंबकराज हाच अनंतकोटी ब्रह्मांडांचा व म्हणून माझा पालनकर्ता व तारणहार आहे’ हे दररोज स्वतःच्या मनाला सांगत रहा. कारण मन चंचल असते, त्याला रोज सांगणे आवश्यक आहे.

‘हा स्वयंभगवान देवाधिदेव प्रेमस्वरूप, नित्यतृप्त, सर्वज्ञ, सर्वगामी व सर्वसमर्थ आहे’ हा अनुभव भक्तिभाव चैतन्यातच मिळतो.

स्वयंभगवान त्रिविक्रमावर प्रेम करण्यासारखे दुसरे पावित्र्य नाही.

लाखो सेवा केल्यात, मोठमोठी कार्ये उभारलीत, समाजात लोकप्रिय असणारे सर्व नियम उत्कृष्टपणे पाळलेत, परंतु ह्याच्यावर प्रेम केले नाहीत, ह्याची सेवा केली नाहीत, तर ती सर्व कर्मे त्रासदायकच ठरतात.

भक्तांच्या हाकेला तत्काळ ऐकून, त्या क्षणालाच कार्यरत होणारा समर्थसेतु हा एकच.

हा देवाधिदेव खूप सोपा, साधा, सहज वावरणारा, न मिरवणारा, स्वतःचे मोठेपण इतरांवर न लादणारा, स्वतःच्या उपकारांची आठवण न करून देणारा आणि फक्त न बोलता प्रेम करीत राहणारा आहे

आणि म्हणूनच आपण ह्याच्याशी बोलले पाहिजे - अगदी वारंवार, हवे तेव्हा, हवे तिथे, अगदी ह्याची प्रतिमासुद्धा समोर नसताना, काही कारण नसतानासुद्धा,

मनातल्या मनात बोला - ह्याच्या प्रतिमेसमोर मोठ्याने बोला - एकांतात बोला - पण बोलत रहा. कारण आपल्या भक्तांचे शब्द ऐकणे ह्याला अतिशय आवडते.

ह्या देवाधिदेवाच्या कानांना श्रद्धावानांचे भक्तिपूर्ण बोल हे सर्वोत्तम व सर्वोत्कृष्ट अमृताहूनही मधुर वाटतात.

‘हे देवाधिदेवा! हे स्वयंभगवान! हे माझ्या देवा! माझे तुझ्यावर प्रेम आहे, माझी निष्ठा तुझ्या चरणांशी आहे’ हे उच्चारताना आपोआप श्रद्धावानाच्या जीवनातील अनेक घातक गोष्टी व पापे दूर होत राहतात.

‘स्वयंभगवानाचे प्रेम माझ्यावर आहे की नाही’ हा विचार करणे, हेच सर्वांत मोठे पाप आहे.

संदर्भ : दैनिक प्रत्यक्ष तुलसीपत्र १५७७

भक्तीभाव चैतन्य विस्तृत

author avatar
Aniruddha Premsagar
Scroll to top