परमेश्‍वर दत्तगुरु आणि आदिमाता जगदंबा यांच्या भक्तिभाव चैतन्यात सदैव असणर्‍या सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापुंनी (डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी) इसवीसन १९९६ पासून विष्णुसहस्रनाम, ललितासहस्रनाम, राधासहस्रनाम, रामरक्षा, श्रीसाईसच्चरित अशा अनेक महत्वाच्या विषयांवर प्रवचने देण्यास सुरुवात केली.

जगभरातील असंख्य श्रद्धावानांसाठी बापू सद्गुरुस्थानी आहेत. स्वत: एक आदर्श गृहस्थाश्रमी असणारे बापू प्रपंचात राहून परमार्थ साधता येतो, हे स्वत:च्या आचरणातून शिकवतात.

बापुंच्या विद्यार्थीदशेपासून ते आजपर्यंत बापू आपल्या श्रद्धावान मित्र, आप्त व त्याचबरोबर पीडित आणि उपेक्षितांच्या जीवनातील दुःख, कष्ट व अंधःकार दूर करण्यासाठी, त्यांच्या विकासासाठी अथक प्रयास करतच आहेत आणि हाच त्यांचा जीवनयज्ञ आहे.

बापुंच्या संपर्कात येणार्‍या सर्वच व्यक्तिंना जाणवणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘बापूंचा अनेकविध क्षेत्रांशी असणारा संबंध, त्यांचे त्या क्षेत्रांतील असणारे प्रभुत्व, नैपुण्य व त्या क्षेत्रांतील एक्स्पर्ट्सनाही (तज्ञांनाही) अचंबित करणारे अथांग ज्ञान.

डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी (एम. डी. - मेडिसीन, हृमॅटॉलॉजिस्ट) यांना त्यांच्या वैद्यकिय प्रॅक्टिसच्या काळात अनेकांनी जवळून अनुभवले.

परळगाव, लालबाग, शिवडी यासारख्या गिरणगावातील कष्टकरी व श्रमजीवी वर्गाला तसेच ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाला अत्यल्प किंवा केव्हा केव्हा काहीच फी न घेता बापू ट्रीटमेंट द्यायचे.

अचूक रोगनिदान, परखड मत, प्रसंगी करडेपणा, आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक राहून, किंबहूना व्यवसायापलिकडे सर्व थरातील रुग्णांशी व सहकार्‍यांशी जोडलेले आपुलकीचे नाते सांभाळणार्‍या डॉ. अनिरुद्धांच्या विलक्षण, असामान्य व्यक्तिमत्वाची झलक या सर्वांना पाहायला मिळाली. 

या आहेत बापूंविषयीच्या आठवणी. ज्यांनी ज्यांनी बापूंना त्यांच्या शालेय जीवनापासून ते वैद्यकीय प्रॅक्टिसच्या काळापर्यंत जवळून पाहिले, अनुभवले आणि जाणले अशा बापूंच्या शिक्षक, सह-अध्यायी, मित्र, शेजारी, पेशंट्स आणि त्यांचे कुटुंबीय, ज्यांना बापूंच्या अनोख्या विलक्षण, असामान्य व्यक्तिमत्वाची झलक अनुभवायला मिळाली, साक्षी होण्याची संधी मिळाली, त्यांच्या या आठवणी आहेत. बापूंविषयीच्या त्यांच्या आठवणींचा संग्रह म्हणजेच ‘मी पाहिलेला बापू हे पुस्तक. अधिक वाचा

डॉ. अनिरुद्ध धै. जोशी यांनी दैनिक प्रत्यक्षमध्ये ५ नोव्हेंबर, २००६ रोजी प्रकाशित झालेल्या ’मी अनिरुद्ध आहे’ या अग्रलेखात लिहील होते,

"बाजूचा माणूस आणि परिस्थिती कशाही प्रकारची असो, मी मात्र तसाच असतो.

कारण मी सदैव वर्तमानकाळातच वावरतो आणि वास्तवाचे भान कधी सुटू देत नाही.

भूतकाळाची जाणीव व स्मृति वर्तमानकाळातील अधिकाधिक सभानतेपुरतीच

आणि भविष्यकाळाचा वेध वर्तमानकाळात सावध होण्यापुरताच, ही माझी वृत्ती."

 

याच वृत्तीला अनुसरून डॉ. अनिरुद्धांनी जागतिक घडामोडींचा अभ्यास करून भारतीय समाजाला सावध, सक्षम व सज्ज करण्यासाठी दैनिक प्रत्यक्षमध्ये ’तिसरे महायुद्ध ही अग्रलेखांची मालिका २००६ मध्ये लिहीली जी नंतर मराठी, हिंदीइंग्रजी भाषेत पुस्तकरूपानेही प्रसिद्ध झाली. 

सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या जीवनप्रवासात एक गोष्ट ‘नित्य’, ‘शाश्‍वत’ आहे, ते म्हणजे बापू आणि बापूंचे लाभेवीण प्रेम. या लाभेवीण प्रेमातूनच बापुंनी आपल्या श्रद्धावान मित्रांसाठी ‘स्वस्तिक्षेम तपश्‍चर्या’ केली.

आध्यात्मिक आधार बळकट होण्याकरिता मानवाने नियमितपणे उपासना करत राहणे आवश्यक असते, पण सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मागे लागलेल्या सततच्या विवंचनांमुळे प्रत्येकाकडून त्या उपासना नित्यनियमितपणे होतातच असे नाही.

आपल्या श्रद्धावान मित्रांच्या जीवनातील ही कमतरता जाणून, ती उणीव भरून काढण्यासाठी सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी सन २०११ च्या आश्‍विन नवरात्रीच्या प्रारंभापासून म्हणजेच २८ सप्टेंबर २०११ पासून स्वस्तिक्षेम तपश्‍चर्येस प्रारंभ केला.

सद्गुरु श्रीअनिरुद्धांची ही ‘स्वस्तिक्षेम तपश्‍चर्या’ रात्रंदिवस अव्याहतपणे चालूच होती. ह्या तपश्‍चर्येच्या काळात बापूंचे ‘स्व’चे भान हरपून, ते पूर्णपणे मायचण्डिकेच्या अनुसंधानात होते. सद्गुरु श्रीअनिरुद्धांची तपश्‍चर्या तीन प्रकारे झाली -

१) आदिमाता चण्डिकेच्या ब्रह्मत्रिपुरसुन्दरी स्वरूपाची उपासना, २) बला-अतिबला उपासना आणि ३) सावित्री विद्येची उपासना व ‘श्रीविद्या’ उपासना. बापुंच्या तपश्चर्येसाठी ’श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌’ मध्ये ’विषम-अष्टास्त्रम’  या विशेष यज्ञकुंडस्थलाची व्यवस्था करण्यात आली होती ज्यात बापूंनी विशिष्ट हवनद्रव्ये अर्पण केली.

श्रीहरिगुरुग्राम येथे आपल्या प्रवचनानंतर उपस्थित श्रद्धावानांना नमस्कार करणारे बापू स्वत: सदैव

‘मी श्रद्धावान भक्तांचा सेवक आहे’

याच भूमिकेत असतात.

श्रीमद्पुरुषार्थ ग्रन्थराज प्रथम खण्ड सत्यप्रवेश यात बापुंनी म्हटले आहे -

‘परमेश्‍वरी तत्त्वांवर नितांत प्रेम व अविचल श्रद्धा असणार्‍या प्रत्येकाचा मी दास आहे.’

त्याचप्रमाणे ग्रन्थराजामध्ये बापू म्हणतात -

मी योद्धा आहे आणि ज्यांना ज्यांना म्हणून आपल्या प्रारब्धाशी लढायचे आहे, त्यांना युद्धकला शिकवणे हा माझा छंद आहे.

मी तुमचा मित्र आहे.

 

बापूंचे पंचगुरु

सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी लिहिलेल्या श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराज द्वितीय खंड ‘प्रेमप्रवास’मध्ये त्यांनी त्यांच्या पंचगुरुंचे वर्णन केले आहे, ते थोडक्यात असे आहे.

दत्तगुरु  (परमेश्‍वर) (करविता गुरु)

परमेश्वर म्हणजेच स्वयंसिद्ध व स्वयंप्रकाशी चेतनतत्त्व. श्रद्धावान ह्यालाच ‘दत्तगुरु’ असे म्हणतात.
सद्गुरु श्री अनिरुद्धांच्या पंचगुरुंपैकी प्रथम गुरु म्हणजे ‘दत्तगुरु’; अर्थात सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या आनंदमय कोशाचा स्वामी व त्यांचा करविता गुरु. श्रीसाईसच्चरितातील पुढील ओवीचा संदर्भ देऊन सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी दत्तगुरुंचे महत्त्व स्पष्ट केले आहे.
दत्तासारिखें पूज्य दैवत । असतां सहज मार्गी तिष्ठत ।
अभागी जो दर्शनवर्जित । मी काय पावत तयासी ॥
श्रीसाईनाथांचे हे शब्द म्हणजेच सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या जीवनकार्याची दिशा आणि श्रीगुरुदत्त ह्यांच्या चरणी सद्गुरु श्रीअनिरुद्धांची असणारी अविचल निष्ठा.

गायत्री (आदिमाता) (वात्सल्यगुरु)

‘गायत्री’ हेच त्या महन्मंगल आदिमातेचे प्रथम स्वरूप, आद्यस्वरूप असून, ते सदैव तरल पातळीवरूनच कार्यरत असते. सद्गुरु श्रीअनिरुद्धांची द्वितीय गुरु अर्थात त्यांच्या विज्ञानमय कोशाची स्वामिनी श्रीगायत्रीमाता ही त्यांची वात्सल्यगुरु आहे.

परब्रह्माची ‘आपण परमेश्वर आहोत’ ही जाणीव म्हणजेच परमेश्वरी, आदिमाता. हिलाच वेदांनी ‘गायत्रीमाता’ हे नामाभिधान दिलेले आहे. ह्या गायत्रीस्वरूपाच्या कृपेनेच मनुष्यास कुठलेही ज्ञान व विज्ञान प्राप्त होत असते आणि उपयोगास येत असते.

राम (कर्ता गुरु)

सद्गुरु श्रीअनिरुद्धांचे तृतीय गुरु अर्थात प्रभु श्रीराम हे सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या मनोमय कोशाचे स्वामी व कर्ता गुरु आहेत व रामचरित्र म्हणजेच मर्यादापालनाचे प्रात्यक्षिक.श्रीराम ‘मर्यादापुरुषोत्तम’ नावाने ओळखले जातात

हनुमंत (रक्षक गुरु)

सद्गुरु श्रीअनिरुद्धांचे चतुर्थ गुरु श्रीहनुमंत हे त्यांचे ‘रक्षकगुरु’ अर्थात् अद्वितीय मर्यादारक्षक. सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या प्राणमय कोशाचे स्वामी व त्यांचे रक्षक गुरु श्रीहनुमंत स्वतःला प्रभु रामचंद्रांचा दास म्हणवून घेण्यातच धन्यता मानतात आणि श्रीअनिरुद्ध त्या हनुमंताचा दासानुदास म्हणवून घेण्यातच स्वतःच्या जीवनकार्याची इतिकर्तव्यता मानतात. ‘मर्यादित ते अमर्याद अनंतत्व’, ‘भक्त ते ईश्‍वरत्व’, हा प्रवास करणारे श्रीहनुमंतच एकमेव!

साई समर्थ (दिग्दर्शक गुरु)

सद्गुरु श्री अनिरुद्धांचे पंचम गुरु साईसमर्थ अर्थात सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या अन्नमय कोशाचे स्वामी व त्यांचे दिग्दर्शक गुरु आहेत.
श्रीसाईसच्चरितातील अनेक ओव्यांमधून व्यक्त होणारी श्रीसाईंची विनम्रता, लीनता, शालीनता आणि उच्च निरभिमानता ह्यांचा संदर्भ देऊन सद्गुरु श्रीअनिरुद्ध ‘श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराज’ द्वितीय खंड ‘प्रेमप्रवास’मध्ये (पृष्ठ क्र. ३५७) म्हणतात, ‘माझ्या अन्नमय कोशाचा स्वामी व माझा दिग्दर्शक गुरु हा साईसमर्थ जर हा उच्चार करतो, तर मग मला, ‘मी कोणी श्रेष्ठ आहे’ असे म्हणण्याचा काडीचाही अधिकार नाही असे मी निश्चितपणे मानतो.’