’रामा रामा आत्मारामा त्रिविक्रमा सद्‌गुरुसमर्था

सद्‌गुरुसमर्था त्रिविक्रमा आत्मारामा रामा रामा’

श्रद्धावानांच्या जीवनात भगवंताचे पडणारे पाऊल म्हणजे ‘स्वयंभगवान त्रिविक्रमाचा मंत्रगजर’.

स्वयंभगवान त्रिविक्रमाचे सर्वश्रेष्ठ, सर्वहितकारी, मंगलधाम, सुखधाम म्हणजे त्रिविक्रमाचा मंत्रगजर.

स्वयंभगवानाचा मंत्रगजर हा भक्तिभाव चैतन्याचा प्राण आहे. हा मंत्रगजर अनंत ऐश्वर्यांनी युक्त, असंख्य सामर्थ्यांनी समृद्ध आणि अफाट गतीने अनिरुद्ध आहे आणि या मंत्रगजराचे भजन श्रद्धावानाला, अगदी पाप्यांतील पापी श्रद्धावानालाही निर्दोष करणारे आहे.

ह्या मंत्रगजरातून त्रिविक्रमाचे नाम श्रद्धावानाच्या प्रत्येक पेशी-पेशीत शिरते, प्रत्येक ग्रंथीमध्ये शिरते, प्रत्येक विचारामध्ये शिरते, प्रत्येक भावनेमध्ये शिरते, प्रत्येक अनैच्छिक क्रियेमध्ये (Involuntary Action) सुद्धा शिरते. एवढेच नव्हे, तर त्या श्रद्धावानाच्या काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सर ह्या षड्‌रिपुंमध्येही शिरते. आणि हा मंत्रगजर ह्या षड्‌रिपुंनाच, त्या त्या श्रद्धावानाच्या जीवनात चांगल्या कामासाठी वापरत राहतो.

स्वयंभगवानाचा मंत्रगजर मुखात, मनात, अंतरंगात ठेवून जे जे काही केले जाते, ते कितीही चुकीचे असले, तरीही हळूहळू शुभ, हितकारी आणि मंगल बनत जाते.

भक्तिभाव चैतन्यात’ ह्या मंत्रगजराचे स्थान सर्वोच्च आहे.

भक्तिभाव चैतन्यात त्रिविक्रमाचा मंत्रगजर हे तर सर्वश्रेष्ठ भजन आहे आणि म्हणूनच ह्या भगवत्‌भजनावाचून भक्तिभाव चैतन्य अधिकाधिक बहरू शकत नाही.

ह्या भक्तिभाव चैतन्यामध्ये ‘स्वयंभगवानाचा मंत्रगजर’ हा सर्वोच्च मंत्र मानला जातो कारण हा दत्तभगिनी शुभात्रेयीने केला आहे.

प्रत्येक मानवाच्या इष्टदैवताचे नाम ह्या मंत्रगजरात सामावलेलेच आहे. कारण कुठल्याही दैवताचे नाम हे शेवटी केशवाचे नाम आहे. (‘सर्वदेवनमस्कारः केशवं प्रतिगच्छति’) ‘केशव’ म्हणजे ‘आकृतीच्या पलीकडे असणारा आणि तरीही आकृतीत असणारा’ आणि ‘केशव’ हे मूळ स्वयंभगवान त्रिविक्रमाचेच नाम आहे. तोच राम आहे आणि तोच कृष्ण आहे. तोच शिव आहे आणि तोच विष्णू आहे.

स्वयंभगवानाच्या जिवंत अस्तित्वाची व रसरशीत प्रेमाची जाणीव अखंडपणे मन व बुद्धीत राहणे, हे सामान्य मानवाला जमू शकत नाही. परंतु भक्तिभाव चैतन्याचा हा मंत्रगजर अतिशय प्रेमपूर्वक करीत राहिल्यास, थोडा जपही मोठा बनतो आणि खंडित आठवणही अखंड बनते.

जो श्रद्धावान ह्या मंत्रगजराच्या १६ माळा दररोज, ह्याप्रमाणे कमीत कमी ३ वर्षे करतो, त्या श्रद्धावानाच्या विशुद्ध चक्राच्या (कंठकूप चक्राच्या) सोळाच्या सोळा पाकळ्या शुद्ध होतात अर्थात त्याचे विशुद्ध चक्र ‘हनुमत्-चक्र’ बनते. मग कुठल्याही जन्मात तो सुखाने येतो, आनंदात राहतो आणि आनंदातच विलीन होतो.

ज्याला दररोज १६ माळा करणे जमणार नाही, त्याने आपापल्या कुवतीनुसार ‘न मोजता’ हा मंत्रगजर करीत रहावा आणि तो जप ‘त्या’च्या चरणी अर्पण करीत रहावे - अशा श्रद्धावानाचे जीवनही सुंदर होतच राहणार.

ह्या मंत्रगजरातून भक्तिभाव चैतन्याच्या लहरी उसळत राहतात आणि ज्याला ज्याला म्हणून स्वतःचे जीवन चांगले घडवायचे आहे, त्याला सर्व काही पुरविले जाते.

स्वयंभगवानाचा मंत्रगजर हाच शांती व समाधान मिळविण्याचा एकमेव मंत्र आहे. जो जो जन्माला आला, त्याच्या जीवनात अडचणी, प्रश्‍न, दुःखे व संकटे येतच राहतात. परंतु अशा विपत्तीतून समर्थपणे बाहेर पडण्यासाठीसुद्धा हा मंत्रगजरच सर्वसमर्थ आहे.

author avatar
Aniruddha Premsagar
Scroll to top