अश्‍वत्थ मारुती पूजन

अनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य ‣

मानवाला त्याच्या जीवनात कमीत कमी तीन वेळा येणार्‍या शनीच्या साडेसातीच्या काळामध्ये प्रारब्धभोगांचा प्रभाव कमी होण्यासाठी व ते भोग भोगण्यास लागणारे सामर्थ्य प्राप्त होण्यासाठी श्रीहनुमंताची उपासना अत्यंत फलदायी ठरते असे सांगितले जाते.
बापूंनी ग्रन्थराजात श्रीहनुमन्तास ‘रक्षकगुरु’ म्हणून संबोधले आहे. बापू म्हणतात त्याप्रमाणे

‘प्रत्येक भक्ताची भक्तिमार्गावरील प्रवासाची सुरुवात हनुमंतापासूनच होते.’

अशा या हनुमन्ताच्या अनेक उपासना बापू श्रद्धावानांकडून करून घेतात. यांपैकी प्रतिवर्षी श्रावण मासात साजरा केला जाणारा अत्यन्त महत्त्वाचा उत्सव आहे, अश्‍वत्थ मारुती पूजन.
बापूंच्या मार्गदर्शनानुसार सन 1997 मध्ये या उत्सवाची सुरुवात झाली, जो आजही दर वर्षी श्रावण महिन्याच्या प्रत्येक शनिवारी भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो.

सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी ज्या शिळेतून स्वत: छिन्नी-हातोडीच्या सहाय्याने श्रीहनुमंताची मूर्ती कोरली, त्या मूर्तीचे दर्शन या उत्सवामध्ये सर्व श्रद्धावानांना घेता येते. बापूंनी स्वत: कोरलेल्या या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे पंचमुखहनुमानस्तोत्रामध्ये हनुमंताचे जसे वर्णन केलेले आहे त्या लक्षणांनी युक्त अशी ही हनुमंताची मूर्ती आहे.

अशा या हनुमन्ताच्या मूर्तीच्या पाठीमागील बाजूस अश्‍वत्थ वृक्षाचे प्रतीक म्हणून पिंपळाचे रोप असते. मूर्तीच्या भोवती उसाच्या कांड्यांनी सजावट केली जाते. दर्शन घेताना सर्व श्रद्धावानांना ह्या शिळेस शेंदूरलेपन करू शकतात. हनुमन्ताच्या शिळेसमोर एका ताम्हनामध्ये हनुमंताची छोटी मूर्ती ठेवली जाते. इच्छुक श्रध्दावान या उत्सवात हनुमंताच्या या मूर्तीस अभिषेक करू शकतात. उत्सव काळात संपूर्ण दिवस श्रीपंचमुखहनुमत्-कवच, श्रीसंकटमोचन हनुमानस्तोत्र आणि ‘ॐ श्रीरामदूताय हनुमन्ताय महाप्राणाय महाबलाय नमो नम:’ यांची आवर्तने केली जातात.

बापू सांगतात त्याप्रमाणे ‘हा हनुमंत हे एकमेव असे दैवत आहे, जो आम्हां सर्व श्रध्दावानांचा देवही आहे आणि त्याचबरोबर श्रीरामाचा भक्तही आहे.’ बापूंनी श्रीरामरक्षेच्या प्रवचनांमध्ये ‘श्रीहनुमंताची भक्ती का व कशी करायची’ हेदेखील समजावून सांगितले आहे. बापूंनी ‘श्रीशब्दध्यानयोग’मध्ये सांगितले आहे की हनुमन्त स्वत: प्रत्येक श्रध्दावानाचे बोट धरून श्रद्धावानास भक्तिमार्गावरून चालवितो.

अश्‍वत्थ वृक्ष हा ऊर्ध्व दिशेने (वरच्या दिशेने) मुळे आणि अधोदिशेने (खालील दिशेने) फांद्या असणार्‍या या विश्‍वपसार्‍याचे प्रतीक आहे, जो महाप्राणशक्तीचे या विश्‍वाशी असणारे नाते दर्शवितो. अशा या अश्‍वत्थ वृक्षाखाली विराजमान हनुमन्ताचे पूजन श्रवणभक्तिप्रधान श्रावणमासात केले जाते.

दर वर्षी श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी संस्थेतर्फे गुरुकुल, जुईनगर येथे "श्रीअश्वत्‍थ मारुती पूजन उत्सवाचे" आयोजन केले जाते.
ह्या वर्षी शनिवार दि. १९ व २६ ऑगस्ट तसेच दि. २ व ९ सप्टेंबर रोजी हा उत्सव साजरा केला जाईल.

ह्या उत्सवात श्रद्धावानांना "श्रीपंचकुंभाभिषेक" पूजनविधी मध्ये सहभागी होण्याची सुसंधी प्राप्त असते. ह्या पूजनविधी मध्ये श्रद्धावान गुरुकुल, जुईनगर येथे प्रत्यक्ष हजर राहून, अथवा "श्रद्धावान सेवे"च्या मार्फतही सहभागी होऊ शकतात. श्रद्धावान सेवेच्या मार्फत होणार्‍या पूजनांचा प्रसाद त्या त्या श्रद्धावानाला त्याच्या उपासना केंद्रावर पाठविण्याची सोय केली जाईल.
ह्या पूजनविधीसाठी आगाऊ नोंदणी करण्या हेतू श्रद्धावानांच्या सोयीकरिता ऑनलाइन लिंकही उपलब्ध आहे जी खाली नमूद करीत आहे.

सद्गुरू निवास, गुरुकुल (जुईनगर) पत्ता

Scroll to top