धनत्रयोदशी – श्री धनलक्ष्मी श्रीयंत्र पूजन

अनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य ‣

सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापूंनी दैनिक प्रत्यक्ष मध्ये धनत्रयोदशी संदर्भात अग्रलेख लिहिला होता. ह्या अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे खाली देत आहोत.

धनत्रयोदशी म्हणजे धनाच्या सन्मानाचा व धनलक्ष्मीच्या आणि कुबेराच्या पूजनाचा दिवस. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे व त्या त्या प्रदेशातील रीतिरिवाजांनुसार पूजनात विविधता आढळून येते; परंतु सर्वत्र धनत्रयोदशीला असते मात्र धनाचेच पूजन.
धनत्रयोदशीच्या दिवशी घराघरातून धनाचे म्हणजे संपत्तीचे पूजन होते. नाणी, नोटा आणि सुवर्णादि अलंकार ह्यांच्याबरोबरच मुख्य म्हणजे दीपांचे पूजन होते. ह्यामागील मूळ प्रेरणा अशी आहे की हे लक्ष्मीमाते, तू दिलेल्या ह्या संपत्तीचा मान आम्ही राखू, त्या संपत्तीचा विनियोग आम्ही तुला आवडणाऱ्या कामांसाठी करू. ही संपत्ती अशीच वाढत राहू दे, पण तुझ्या दिव्य प्रकाशाच्या तेजाने संपन्न होऊनच अर्थात पवित्र मार्गाने. धनसंपत्तीबरोबरच दीपपूजन केले जाते, ते ह्याच कारणासाठी की घरात येणाऱ्या संपत्तीला पवित्र लक्ष्मीमातेचे कृपाछत्र असावे आणि लक्ष्मीमातेप्रमाणेच सर्व प्रकारची भौतिक संपत्ती देऊ शकणाऱ्या, पण तृप्ती, शांती आणि भक्ती हिरावून घेणाऱ्या अलक्ष्मीची छायासुद्धा घरावर पडू नये म्हणून. दीप हे लक्ष्मीचे प्रतीक आहे, तर विझवून उपडा ठेवलेला दीप हे अलक्ष्मीचे प्रतीक आहे अर्थातच अशुभाचे प्रतीक आहे.
धनत्रयोदशीच्या दिवशी सर्वांत श्रेष्ठ पूजन हे 'श्रीयंत्रा'चे असते. त्यातही षोडश उपासनांनी व जपांनी सिद्ध केलेल्या महाश्रीयंत्राच्या दर्शनाचे महत्त्व सर्वांत श्रेष्ठ मानले जाते. हे महाश्रीयंत्र आकाराने तर खूप मोठे असतेच परंतु मुख्य म्हणजे ते वर उल्लेखिल्याप्रमाणे षोडश मार्गांनी सिद्ध केलेले असावे लागते व तेही सिद्धस्पर्शानेच. स्वतःकडे स्वतःचे श्रीयंत्र नसले तरीही अशा सिद्ध महाश्रीयंत्राच्या दर्शनाने व त्याच्या साक्षीने केलेल्या श्रीयंत्राच्या पूजनानेसुद्धा मनुष्यास धनाच्या सुरक्षिततेबरोबरच, मुख्य म्हणजे संपत्तीबरोबर अत्यावश्यक असणारे शांती, तृप्ती व भक्तीचे दान सहजपणे प्राप्त होते.
ह्या सिद्ध महाश्रीयंत्राच्या धनत्रयोदशीच्या दिवशी घेतलेल्या दर्शनाने व त्याच्या साक्षीने केलेल्या पूजनामुळे मनुष्यास प्राप्त होणारी सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्ष्मीदीपाचा प्रकाश अर्थात् धोका होण्याआधीच त्या जगन्माऊलीकडून मिळणारी संभाव्य धोक्याची पूर्वसूचना.
धनत्रयोदशीच्या दिवशी केलेल्या महाश्रीयंत्राच्या पूजनामुळे, दर्शनामुळे किंवा तेही शक्य नसल्यास त्याच महाश्रीयंत्राच्या रचनेतून सिद्ध केल्या गेलेल्या त्याच्याच छोट्या प्रतिमेचे कमीत कमी आपल्या घरात पूजन करणेसुद्धा गृहस्थाश्रमी मनुष्यासाठी अनेक प्रकार फायद्याचे ठरते.

माझ्या लाडक्या श्रद्धावान मित्रांनो, धनत्रयोदशीच्या दिवशी धनाची व दीपाची पूजा निश्चितच करा, पण ह्या दत्तात्रेयप्रणित श्रीयंत्रास मात्र कधीच विसरू नका.

 

Scroll to top