दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दुसन्या शनिवारपासून श्रद्धावान आपापल्या घरी सद्गुरु श्री अनिरुद्धांच्या पादुकांचे पूजन करून सच्चिदानंदोत्सव साजरा करतात. दोन दिवस किंवा पाच दिवसपर्यंत सच्चिदानंदोत्सव स्वेच्छेने साजरा केला जातो.
श्रीप्रेमस्वरूपा तव शरणम् । पुरुषार्थरूपा तव शरणम् ।
शरणागतत्रितापहरा । सच्चिदानन्दा तव शरणम् ।।
'आह्निक'मधील अचिन्त्यदानी स्तोत्राचे हे नववे कडवे आम्ही नियमितपणे म्हणतो. मानवाच्या जीवनातून आनन्द हिरावून घेणारे आणि त्याला गांजणारे त्रिताप म्हणजेच आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक ताप. सच्चिदानन्दस्वरूप सद्गुरुतत्त्वच या त्रिविध तापांमधून आम्हाला मुक्त करून आमचे जीवन आनन्दाने भरून टाकते.
तो सच्चिदानन्द त्याचे कार्य करण्यास समर्थ व तत्परच आहे, पण त्याचे हे कार्य आमच्या जीवनात होण्यासाठी आम्हालाच त्याच्यावर प्रेम करायला हवे, त्याच्या ऋणांचे स्मरण करून कृतज्ञ रहायला हवे व सद्गुरुंच्या चरणी संपूर्णपणे शारण्यभाव स्वीकारायला हवा.
आमच्या जीवनात प्रेमभाव, अंबज्ञताभाव आणि शारण्यभाव हे तीन भाव जेवढे अधिक वाढतील, तेवढ्या प्रमाणात आमचा प्रपंच-परमार्थ आनन्दमय होईल आणि ह्यासाठीच श्रद्धावान मार्गशीर्ष महिन्यात 'सच्चिदानंदोत्सव’ साजरा करतात.
स्वतः भगवान श्रीकृष्णाने श्रीमद्भगवद्गीतेत 'मासानां मार्गशीर्षोऽहम् (महिन्यांमध्ये मी मार्गशीर्ष महिना आहे) असे म्हटले आहे. मार्गशीर्ष महिना हा देवयान-मार्गाच्या अंतिम ध्येयापर्यंत प्रवास करू इच्छिणान्या श्रद्धावानांसाठी अत्यंत महत्त्वाचा पर्वकाळ मानला जातो.
या मार्गावरून सच्चिदानन्दाकडे जाण्याचा 'प्रेम-प्रवास' सुकर व्हावा यासाठी श्रद्धावान मार्गशीर्ष महिन्यात सच्चिदानंदोत्सव साजरा करतात.
या मार्गावरील प्रवासात आमचा प्रपंच व परमार्थ एकाच वेळी सुखाचा होण्यासाठी मन, प्राण आणि प्रज्ञा ह्या तिन्ही स्तरांवर उचितत्व कायम राहणे महत्त्वाचे आहे. सच्चिदानंदोत्सवात श्रद्धावान अनिरुद्ध-अथर्वस्तोत्र आणि अनिरुद्ध अष्टोत्तरशत-नामावलि यांसह, उचितत्व साध्य करण्याच्या हेतूने सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या पादुकांचे पूजन करतात.
सच्चिदानंदोत्सव साजरा करणाऱ्या श्रद्धावानांचा भाव हाच असतो की या पूजनातील अथर्वस्तोत्र आमच्यातील चंचलतेचा नाश करु दे आणि अष्टोत्तरशत नामावली आमच्या देहातील १०८ शक्तिकेद्रांना सामर्थ्य पुरवु दे.
सच्चिदानंदोत्सव साजरा करणारे श्रद्धावान सद्गुरुंकडे आशीर्वाद मागतात की
१) आमच्या तीनही स्तरांवरील अशुद्धी, अपवित्रता, अनुचितता दूर व्हावी,
२) आमच्यात प्रेमभाव, अंबज्ञताभाव आणि शारण्यभाव वाढत रहावा,
३) आमच्या मन, प्राण व प्रज्ञा ह्या तीन स्तरांना त्रस्त करणाऱ्या
चंचलता, अवरोध आणि दिशाहीनत्व या तीन असुरांचा नाश होऊन तीनही स्तरांमध्ये उचितता रहावी.
'वामपादेन अचलं दक्षिणेन गतिकारकम्' म्हणजेच वामपादाने अनुचिताला रोखणारे आणि दक्षिणपादाने उचिताला गति देणारे असे ज्यांच्या चरणन्यासाचे वर्णन केले गेले आहे अश्या सद्गुरु श्री अनिरुद्धांच्या पादुकांचे पूजन करून सद्गुरुकृपेने प्रपंच-परमार्थ एकाच वेळेस आनन्दाचा व्हावा, याच श्रद्धेने श्रद्धावान सच्चिदानन्दोत्सव साजरा करतात.