श्री शिवसहपरिवार पूजन

अनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य ‣

सद्गुरु श्री अनिरुध्दांनी गुरुवार दिनांक 20 जून 2019 रोजी प्रवचनातून सर्व श्रध्दावानांना भगवान शिवपरिवाराची (कुटुंबाची) ओळख करून दिली आणि श्री शिवसहपरिवाराच्या पूजनाचे महत्त्वही समजावून सांगितले.
त्यावेळी बापूंनी सांगितले -

श्रावण महिना हा भगवान शिवाची भक्ती करण्याचा महिना आहे. परमात्म्याचं ‘परमशिवरूप’ हे रूप असं आहे की ज्याच्या मूळ रूपातच ज्याचा कुटुंबविस्तार व्यवस्थितपणे झालेला आहे आणि म्हणूनच ‘शिव-पार्वती’ हे भारताच्या प्रत्येक घराघरात, कुटुंबात प्रेमाने पूजले जातात, प्रत्येक परिवाराला ते अत्यंत जवळचे असतात. विवाहसमयीसुद्धा अंतरपाटापाशी येण्याआधी वधू काय करत असते? तर गौरीहर-पूजन करत असते. गौरीचं हरण ज्याने केलं म्हणजे गौरीचं मनं ज्याने जिंकून घेतलं, तो गौरीहर म्हणजे शिव, त्याचं पूजन ती करत असते. का? जसा शिव त्याच्या पत्नीची पूर्णपणे काळजी घेतो, प्रेम करतो तशी काळजी तिच्या पतीने घ्यावी, तिचा पती शिवासारखाच पराक्रमी व्हावा म्हणून ती गौरीहर शिवाचे पूजन करत असते.’

विवाह ही पति-पत्नीच्या सुंदर प्रवासाची सुरुवात असते आणि त्यासाठी गौरीचं, गौरीहर शिवाचं स्मरण, पूजन केलं जातं. प्रत्येक कुटुंबाचा, परिवारातील सदस्यांचा मिळून एकत्र जीवन-प्रवास होत असतो आणि हा प्रवास अधिक सुंदर करणारं करण्यासाठी श्रावण महिना अत्यंत महत्वाचा असतो आणि त्यातही शिवपार्वतीचं त्यांच्या परिवारासह पूजन करणे अत्यंत महत्वाचे असते.
बापुंनी हेदेखील स्पष्ट केले की सन 2011 साली बापुंनी जेव्हा स्वस्तिक्षेम तपश्‍चर्या केली होती, तेव्हा त्या तपश्‍चर्येमधून त्यांनी मोठ्या आईकडे म्हणजे आदिमाता जगदंबेकडे जे काही मागितलं होतं, त्याचाच एक भाग म्हणून सन 2019 पासून श्री शिवसहपरिवार पूजन सुरू झाले आहे.
श्री शिवसहपरिवार पूजन म्हणजे काय याबद्दल बोलताना बापू म्हणाले,

श्री शिवसहपरिवार पूजन म्हणजे शिवाच्या संपूर्ण परिवाराचं पूजन, शिवाचं पूजन त्याच्या संपूर्ण परिवारसह अर्थात् शिवपार्वतीचं त्यांच्या कुटुंबासह केलं जाणारं पूजन.

शिवपार्वतीचं कुटुंब म्हटल्यावर साहजिकच आपल्या डोळ्यांपुढे आपण पाहिलेलं चित्र येतं की कैलास पर्वतावर शिवपार्वती त्यांच्या कार्तिकेय व गणेश या दोन पुत्रांसह बसले आहेत. शिवपार्वतीच्या या दोन पुत्रांबद्दल आपल्याला माहिती असते, पण शिवपार्वतीच्या दोन कन्यांबाबत आपल्याला काहीही ठाऊक नसते.
आणि म्हणूनच शिवपार्वतीच्या परिवाराची माहिती देताना बापुंनी जेव्हा शिव-पार्वतीच्या दोन पुत्रांसह शिव-पार्वतीच्या ‘बालाविशोकसुंदरी’ आणि ‘ज्योतिर्मयी’ या दोन कन्यांचाही उल्लेख केला.
बापुंनी शिवपरिवाराबद्दल सारी माहिती आपल्या पितृवचनातून जशी दिली, तशीच 30 जून 2019 रोजीच्या दैनिक प्रत्यक्षमधील कथामंजिरी अग्रलेखमालिकेतील 11व्या अग्रलेखातही बापुंनी शिवपरिवार माहिती व्यवस्थितपणे दिली.
शिवपरिवारातील एक महत्त्वाचा सदस्य म्हणजे परमशिवाच्या समोरच सदैव शिवआज्ञापालनासाठी, शिवकार्यासाठी सिद्ध असणारा शिववाहन श्रेष्ठ शिवभक्त नंदी.
श्री शिवसहपरिवार पूजनाचे महत्त्व, त्यापासून श्रद्धावानांना होणारा लाभ आणि आजच्या युगात या पूजनाची आवश्यकता याबद्दल सांगताना बापू म्हणाले की संपूर्ण कुटुंबाच्या कल्याणासाठी, मंगल होण्यासाठी, सर्व शुभ होण्यासाठी, सर्व क्लेश निवारण होण्यासाठी हे शिव-सहपरिवार पूजन महत्त्वाचे आहे.
कुटुंब म्हणून जो एकत्रितपणा आहे तो राहण्यासाठी, टिकण्यासाठी, परिवारातील ते प्रेम, ती आप्तता टिकण्यासाठी शिव-सहपरिवार पूजन करणे लाभदायक असणार आहे. आजच्या धावपळीच्या युगात कुटुंबास नीट वेळ देता येत नाही अशी खंत अनेकांच्या मनात असते, तसेच कुटुंबातील सर्वांचे प्रेमबन्ध सदैव दृढ रहावे आणि परिवाराचे कल्याण व्हावे यासाठी काहीतरी करण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात असते आणि यासाठी शिवपरिवार पूजन हा सुन्दर मार्ग सद्गुरु श्री अनिरुद्धांनी आम्हाला दिला आहे.
शिवसहपरिवाराची पितृवचन आणि अग्रलेखातील माहिती येथे संकलित स्वरूपात देत आहे.
शिवपरिवारामध्ये परमशिवाच्या डाव्या बाजूस त्याची अर्धांगिनी असणारी अन्नपूर्णा पार्वती आहे.
शिव-पार्वतीचा पुत्र स्कंद कार्तिकेय शिवाच्या बाजूस बसलेला आहे, तर त्यांचा पुत्र गणपती हा पार्वतीच्या बाजूला बसला आहे.
शिव आणि पार्वती यांच्या मध्ये त्यांच्या दोन कन्या विराजमान आहेत.
पार्वतीच्या बाजूला शिव-पार्वतीची ज्येष्ठ कन्या ‘बालाविशोकसुंदरी’ बसली आहे, तर शिव-पार्वतीची कनिष्ठ कन्या ‘ज्योतिर्मयी’ ही शिवाच्या बाजूला बसलेली आहे.
आपल्याला शिव-पार्वतीच्या दोन पुत्रांच्या जन्माची कथा माहीत असते. आपल्या मनात प्रश्‍न येतो की शिव-पार्वतीच्या या दोन कन्यांचा जन्म कसा झाला?
त्याचेही उत्तर सद्गुरु श्री अनिरुद्धांनी व्यवस्थितपणे दिले आहे.
शिव-पार्वतीची ज्येष्ठ कन्या ‘बालाविशोकसुंदरी’ हिच्या जन्माबद्दल सांगताना ‘कथामंजिरी 11’ मध्ये बापू लिहितात -

‘जेव्हा पार्वतीने ललिताम्बिकेची कन्या ‘बाला त्रिपुरे’स पाहिले तेव्हा पार्वतीच्या मनात, ‘आपल्यालाही अशीच सुंदर व तेजस्वी कन्या असावी’ असा वात्सल्यभाव उत्पन्न झाला व त्या वत्सलतेतून बाला विशोकसुंदरीचा जन्म झालेला होता.

शिव-पार्वतीची कनिष्ठ कन्या ‘ज्योतिर्मयी’ हिचा जन्म कसा झाला याबद्दल बापू लिहितात -

‘एकदा परमशिव दीर्घ समाधितून डोळे उघडत असताना त्याला समोरच उभी असलेली पार्वती दिसली. तिच्या सौंदर्याचे तेज आणि शिवाचे प्रेम एकत्र येऊन, परमशिवाच्या प्रभामंडलातून द्वितीय कन्या ‘ज्योतिर्मयी’चा जन्म झाला.

शिवाच्या या ज्योतिर्मयी नामक कन्येची ‘ज्योति’ आणि ‘ज्योतिष्मती’ अशीही नावे आहेत असेदेखील बापुंनी आपल्या पितृवचनात सांगितले.
बाला विशोकसुंदरीचा वर्ण हा उगवत्या सूर्याचा असतो, तर ज्योतिर्मयीचा वर्ण हा सुवर्णाचा असतो.
त्याचबरोबर बापुंनी हीदेखील माहिती दिली की शिव-पार्वतीच्या या दोन्ही कन्या उत्कृष्ट प्रेमळ कन्याही आहेत आणि उत्कृष्ट कुलवधू अर्थात पतिव्रताही आहेत.
शिवाच्या बालाविशोकसुन्दरी या कन्येच्या नावाशी साधर्म्य असणारे अशोकसुंदरी हे नाव काही पुराणग्रन्थांमध्ये आढळते आणि या नाम-साधर्म्यामुळे या दोन भिन्न व्यक्तिमत्वांच्या बाबतीत गोंधळ होऊ शकतो.
हा गोंधळ मुळात होऊच नये आणि कुणाचा जर काही गोंधळ झालाच असेल, तर तो दूर व्हावा यासाठी बापुंनी समजावून सांगितले की अनेक जण गोंधळ घालतात की पुराणग्रन्थामध्ये हुंडासुर जिला पळवून नेतो असा जिचा उल्लेख येतो, ती ‘अशोकसुंदरी’ ही एक मानवी राजकन्या आहे, ती देवतावर्गातील नाही.
‘अशोकसुंदरी’ आणि ‘विशोकसुंदरी’ या नावांमुळे गोंधळ होऊ शकतो, पण येथे लक्षात घेणे आवश्यक आहे की ती पुराणग्रन्थ-उल्लेखित अशोकसुंदरी ही मानवी स्त्री आहे, तर विशोकसुंदरी अर्थात् बालाविशोकसुंदरी ही शिव-पार्वतीची कन्या आहे.
शिव-पार्वतीच्या या दोन कन्यांच्या कार्याची माहिती बापुंनी आम्हाला सांगितली, ती अशी -
बाला विशोकसुंदरी ही श्रद्धावानांच्या मनातील शोक दूर करते आणि अपत्यांचे विद्यावर्धन करते.
ज्योतिर्मयी ही श्रद्धावानांच्या मनातील गोंधळ व अस्वस्थता दूर करते आणि बालकांचे आरोग्य निकोप राखते.
शिव-पार्वतीच्या या दोन कन्यांचं पूजन नेहमी शिवाबरोबरच, शिव-पार्वती बरोबरच करावं लागतं, त्यांचं वेगळं पूजन होऊ शकत नाही कारण त्या शिव-परिवाराचा हिस्सा म्हणूनच कार्य करत आलेल्या आहेत, अशीही माहिती यासंदर्भात बापुंनी त्यांच्या पितृवचनात दिली आहे.

Scroll to top