‘अंधकार दूर करण्याचा माझा यज्ञ म्हणजेच श्रीमद्पुरुषार्थ’
या शब्दांत सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंनी श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराजाविषयीची भूमिका ग्रन्थराजाच्या प्रत्येक खंडाच्या सुरुवातीसच स्पष्ट केली आहे. सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंनी लिहिलेल्या श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराजाचे तीन खंड प्रकाशित झाले आहेत.
प्रथम खंड - सत्यप्रवेश
‘सत्यप्रवेश’ हा श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराजाचा पहिला खंड असून सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंच्या जीवनकार्याला अनुसरून गृहस्थजीवनामध्ये राहून परमार्थप्राप्ती करण्याचा राजमार्ग हा खंड दिग्दर्शित करतो. भक्ती, पुरुषार्थ ह्यांचा अचूक अर्थ समजावून देऊन अध्यात्मविषयक भय दूर करून विवेकी, आनंदी व समाधानी जीवन घडवण्याविषयीचे मार्गदर्शन करणारा हा खंड आहे.
भगवंताचे प्रत्येकावर प्रेम असतेच, मानवाला फक्त या सत्याची जाणीव ठेवून भगवंताच्या प्रेमास प्रतिसाद देत भगवंताच्या प्रेमराज्यात प्रवेश करायचा असतो, हेच ‘सत्यप्रवेश’ आम्हाला सांगतो.
व्दितीय खंड - प्रेमप्रवास
अवघे विश्व, प्रत्येक जीवात्मा यांचा प्रवास अनन्तकाळापासून सुरूच आहे. विश्व असो की प्रत्येक जीवात्मा हे सर्व ज्याच्यातून उत्पन्न होतात, ज्याच्यात राहतात आणि ज्याच्यात लय पावतात, त्या सत्य-प्रेम-आनन्दाचा मूळ स्रोत असणार्या भगवंताच्या प्रेमाने प्रेरित होऊन भगवंताच्या दिशेने केलेला प्रवासच आनंदी, सुफळ-संपूर्ण होतो.
प्रत्येक भक्त हा प्रवास कसा करू शकतो, हे स्पष्ट करतो सद्गुरु श्री अनिरुद्धलिखित ‘प्रेमप्रवास’ हा खंड. या खंडाच्या ‘पूर्वरंगा’मध्ये परमेश्वराची, परमात्म्याची ओळख करून दिली गेली आहे, तर ‘श्रीरंगा’मध्ये नवविधा निर्धाराच्या सहाय्याने भगवंताचे अखंड सामीप्य कसे प्राप्त करावे याचे स्पष्टीकरण आहे. या खंडातील ‘मधुफलवाटिका’ हा तिसरा विभाग हा श्रीरामाच्या श्रद्धावान वानरसैनिकांचे विश्रामस्थान असून या वाटिकेतील मधुर ओजस्वी मधुफले पुरुषार्थ करण्याचे सामर्थ्य देऊन शान्ती, तृप्ती आणि समाधान देणारी आहेत.
तृतीय खंड - आनंदसाधना
परमेश्वरावर प्रेम करत मर्यादाशील भक्तिमार्गावरून वाटचाल करत असताना निखळ आनंद प्राप्त करून घेण्याचे मार्गदर्शन ‘आनन्दसाधना’ या खंडात केले आहे. भगवंताच्या भक्तने जीवन आनंदमय करण्यासाठी केलेले पुरुषार्थी प्रयास म्हणजे ‘साधना’. प्रेमाने भगवंताच्या जवळ जाण्यासाठीच्या भक्तिसाधनेतील नाम, मन्त्र, स्तोत्र, यज्ञ, पूजन, उपासना, तपश्चर्या ह्या संकल्पनांचा अर्थ या खंडात समजावून सांगितला आहे. त्याचबरोबर ‘पुरुषार्थगंगा’ ह्या विभागामध्ये भगवंतावर प्रेम करून अधिकाधिक पुरुषार्थसंपन्न करणार्या पुरुषार्थगंगेच्या पवित्र तीर्थाचे आचमन श्रद्धावान करतात अर्थात् पुरुषार्थाने समृद्ध करणार्या विचारांचा अंगीकार करतात.
या आचमनातील ‘आचमन १७१’ आम्हाला श्रीमद्पुरुषार्थ ग्रन्थराजाची माहिती आणि महती दोन्ही विशद करून सांगते -
‘प्रवासाला निघताना प्रत्येकजण आपल्या प्रवासाची तयारी करून त्यानुसार तिकीट, धन, तहानभुकेची सोय इत्यादि प्रवासी सामान आपल्याबरोबर घेत असतो व त्यामध्येही आपत्कालासाठी काही तरतूद करून ठेवलेली असते. अशा प्रवाशाचाच प्रवास सफल संपूर्ण होतो.
जीवनाच्या प्रवासातील यशस्वी प्रवाशाची अशी शिदोरी म्हणजे श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराज. ह्या शिदोरीत त्या प्रवाशाला प्रत्येक प्रसंगी उपयोगी पडणारे सर्वकाही असतेच असते.’