सदगुरु श्री अनिरुद्धांनी दैनिक प्रत्यक्षमध्ये "गोवत्सद्वादशी" म्हणजेच वसुबारसवर अग्रलेख लिहिला होता. ह्या अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे खाली देत आहोत.
गोवत्सद्वादशी, लोकभाषेत वसुबारस. सर्वत्र गोवत्स द्वादशीलाच दीपावलीचा पहिला दिवस मानले जायचे. त्या दिवशी सकाळी नेहमीपेक्षा लौकर उठून, स्वतःच्या आंघोळी-पांघोळी आटपून ज्यांच्या गोठ्यात गायी आहेत, त्यांच्याकडे सर्व मंडळी जमायची व दिवाळीचे पहिले अभ्यंगस्नान सवत्स धेनुस म्हणजेच लहान वासरू व त्याच्या गोमातेस घातले जावयाचे.
दीपावलीची सुरुवातही ह्या भारतात गोमातेच्या अभ्यंगस्नानानेच व्हावयाची. गोमातेचे अभ्यंगस्नान झाल्यानंतर घरातील देवांच्या मूर्तींना अभ्यंगस्नान घातले जावयाचे व त्याचे पाणी कलशात ठेवून गंगामाता म्हणून त्या कलशाचे पूजन व्हावयाचे, भारतीयांच्या मनात गोमातेएवढीच ही गंगामाताही सर्वोच्च आदराचे स्थान व पावित्र्याचे प्रतीक बनून राहिली आहे. हे परमात्म्याच्या चरणांचे तीर्थ मग गंगाजल म्हणून संपूर्ण घरभर सिंचन केले जावयाचे. त्यानंतर गायत्री उपासकांच्या घरी गायत्री मंत्राचे कमीत कमी तीन जप व्हावयाचे व ज्यांस गायत्री मंत्र जपता येत नाही, त्यांच्यासाठी मंदिरामंदिरामधून गायत्री मंत्राचे जप आयोजित केले जात व सर्व ग्रामस्थ श्रवणभक्तीसाठी भाविकतेने येत असत.
गो-वत्सद्वादशीच्या दिवशी अशा रितीने स्थूल रूपातील गोमाता, सूक्ष्म रूपातील गंगामाता व तरल स्वरूपातील गायत्रीमाता ह्या तीन मातांचे पूजन घडायचे व पवित्र स्मरणही व्हावयाचेच. त्यानंतरच दिवाळीच्या जल्लोषास सुरुवात व्हावयाची. त्यामुळेच दिवाळीचे स्वरूप केवळ दीपोत्सव, जल्लोष किंवा कार्निवलसारखे ह्या भारतात कधीच नव्हते. ज्या उत्सवाची सुरुवातच मुळी इतक्या पवित्र पद्धतीने व्हायची, तो उत्सव अर्थातच खरोखरच आनंददायी ठरणार यात संशय काय ?
त्यातही ज्यांना सवत्स धेनुचे अभ्यंगस्नान व पूजन करण्यासाठी सवत्स धेनू उपलब्ध नाही. त्यांच्यासाठीही परंपरेने दुसरा मार्ग काढून ठेवलेलाच होता. एका चांगल्या आचरणाच्या गरीब स्त्रीस व तिच्या बारा वर्षांखालील पुत्रास घरी बोलावून त्यांना अभ्यंगस्नान घालणे व अन्न, वस्त्र आणि दक्षिणा देणे हा मार्गही प्रचलित होता. आजच्या धावपळीच्या जगात समजा हेही शक्य नसेल तर कमीतकमी अनाथ महिलांसाठी व गरीब विद्यार्थ्यांसाठी सेवाभावी वृत्तीने कार्य करणार्या संस्थेस देणगी देऊन आपण ही गो-वत्स द्वादशी साजरी करू शकतो.
गाय हा खरोखरच सर्व प्राणियोनीतील अत्यंत पवित्र जीव आहे. ह्यात मला जराही संशय नाही परमात्म्याच्या सृष्टिपालनाच्या नियमांमध्ये मानवाला आधारभूत अशी अनेक पवित्र प्रतीके भगवंताने उत्पन्न केली.
त्यापैकी गोमाता हे एक अत्यंत पवित्र प्रतीक आहे. भगवान श्रीकृष्णाने स्वतः गोपाल म्हणवून घेण्यातच धन्यता मानली व हा गोपालच मग गिरिधारी बनून गोकुळाचे संरक्षण करता झाला व ह्या गो-कुळापासून दूर गेलेल्या द्वारकेस बुडविता झाला. हे आम्हां भारतीयांस कधीही विसरून चालणार नाही.
गो-पालन दुर्लक्षित झाल्यास भारताची एक चतुर्थांश आध्यात्मिक ताकद नाहीशी होईल. गंगामातेस विसरल्यास भारताची अर्धी अध्यात्मिक ताकद नाहीशी होईल व गायत्री मंत्राची अवहेलना झाल्यास भारताची सर्वच ताकद नाहीशी झालेली असेल.
मित्रहो, म्हणूनच एक कळकळीचे आवाहन. स्वतःच्या वैयक्तिक व आध्यात्मिक विकासासाठी तसेच मातृभूमीच्या उद्धारासाठी. गोमाता, गंगामाता (नदी किंवा भगवंताचे चरणतीर्थ) आणि गायत्रीमाता ह्यांचा मार्ग कधीही सोडू नका.