
सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंचा व्यस्त दिनक्रम आणि आपल्या श्रद्धावान मित्रांसाठी अहोरात्र झटण्याचे त्यांचे अव्याहत चालत असलेले परिश्रम पाहिले तर नक्कीच खात्री पटते की ही तर एका तपस्व्याची दिनचर्या आहे. बापूंचे जीवन स्वयमेव तपश्चर्याच आहे.
बापू आम्हां श्रद्धावानांच्या हितासाठी सदैव जागरुकच असतात आणि त्यासाठीच त्यांचे लाभेवीण प्रेमाने आम्हां श्रद्धावानांसाठी सुरू असलेले परिश्रम पाहून आम्हाला त्यांचे जीवन हीच एक तपश्चर्या आहे, हा भाव मनात दाटतो.
स्वस्तिक्षेम तपश्चर्या :
आपल्या श्रद्धावान लेकरांचा आध्यात्मिक आधार बळकट व्हावा, आम्हाला आध्यात्मिक कवच लाभावे यासाठी सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी सन २०११ च्या आश्विन नवरात्रीच्या प्रारंभापासून म्हणजेच २८ सप्टेंबर २०११ पासून स्वस्तिक्षेम तपश्चर्येस प्रारंभ केला. बापूंच्या या तपश्चर्येचे फलस्वरूप म्हणून बापूंनी आम्हाला ‘मातृवात्सल उपनिषद्’ दिले म्हणजेच ‘श्रीस्वस्तिक्षेमविद्या’ दिली आणि त्या विद्येचे प्रात्यक्षिक असणारा स्वस्तिक्षेम संवादही आम्हाला दिला.
सप्तप्रदेशांतील अठरा मंगलस्थानांवरून स्वयंभगवान श्रीत्रिविक्रमासह मणिद्वीपनिवासिनी अष्टादशभुजा जगदंबा ललितेच्या दरबारापर्यंत होणाऱ्या अद्भुत भक्तिमय प्रवासाचे वर्णन मातृवात्सल उपनिषद् मध्ये बापूंनी केले आहे. जगदंबा ललितेचे वात्सल्य, तिची क्षमा आणि तिचे निरपेक्ष प्रेम तर या ग्रन्थातून आम्ही अनुभवतोच आणि त्याचबरोबर जगदंबेचे प्रत्येक शस्त्र श्रद्धावानांच्या जीवनात कसे कार्य करते हेदेखील या ग्रंथाच्या वाचनातून अनुभवता येते.
श्रीललिताम्बिका पूजन :
सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या तपश्चर्येतून आणि संकल्पातून आम्हाला प्राप्त झालेले एक अत्यन्त सुन्दर वरदान म्हणजे श्रीललिताम्बिका पूजन. बापूंच्या स्वस्तिक्षेम तपश्चर्येचे फलित आहे - सर्वांग-ब्रह्मास्त्र आणि सर्वांग-करुणाश्रय. तपश्चर्येतून फलस्वरूप प्राप्त होणाऱ्या या दोन्हीस बापूंनी ‘श्रीअनिरुद्धगुरुक्षेत्रम्’ येथे अर्पण केले.
विश्वात दोन प्रकारच्या शक्ती असतात- जीवनविघातक आणि जीवनसंवर्धक. सर्वांग-ब्रह्मास्त्र हे अनुचिताचा नाश करणारे आहे, तर सर्वांग-करुणाश्रयाचे कार्य आहे विश्वातील जीवनविघातक शक्तींचा नाश करून जीवनसंवर्धक शक्तींची जोपासना करणे.
मुळात बरेचदा मानवाला जीवनविघातक आणि जीवनसंवर्धक या दोन शक्तिंमधील फरक ओळखता येत नाही, त्याची गफलत होते आणि त्याची फसवणूक होते. पण ज्याने सर्वांग-करुणाश्रयाचा आश्रय केला, त्याच्या जीवनात मात्र जीवनविघातक शक्तींचा प्रवेशच होऊ शकत नाही व जीवनसंवर्धक शक्तींची व्यवस्थितपणे जोपासना केली जाते.
सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी आम्हां श्रद्धावानांच्या जीवनात या दोन्ही गोष्टी कार्यकारी रहाव्यात यासाठी त्यांच्या संकल्पानुसार श्रीललिताम्बिका पूजनाचा सर्वांगसुन्दर मार्ग आमच्यासाठी खुला केला.
तुलसीपत्र १४०० मध्ये बापूंनी सांगितले आहे की आदिमातेचे ‘मणिद्वीपनिवासिनी’ हे मूळ रूप अर्थात् ‘सिंहासनस्थ अष्टादशभुजा महिषासुरमर्दिनी’ रूप म्हणजेच ‘ललिताम्बिका’.
श्रीललिताम्बिका पूजनात मणिद्वीपनिवासिनी अष्टादशभुजा जगदंबा ललितेच्या मूर्तीचे पूजन श्रद्धावान करतात. श्रीहरिगुरुग्राम येथे दर गुरुवारी मुख्य मंचावर जशी जगदंबेची मोठी तसबीर असते, तशी तसबीर श्रीललिताम्बिकापूजन कक्षात विराजमान असून त्याचीच प्रतिकृती असणारी छोटी मूर्ती पूजकासमोर असते. त्या मूर्तीचे हरिद्रा, कुंकुम, हरिद्रा-अक्षता, कुंकुम-अक्षता, बिल्वपत्रे, सुगन्धित फुले आदि उपचार अर्पण करून पूजकांकडून पूजन केले जाते.
ललिताम्बिका :
विश्वाच्या उत्पत्तीआधी सर्वत्र एकच परब्रह्मतत्त्व म्हणजेच परमेश्वर दत्तगुरु अस्तित्वात होते. दत्तगुरुंच्या आद्यकामनेच्या स्वरूपात कामकला ललितेचे प्रकटन होताच दोन तत्त्वे अस्तित्वात आली, ‘एक’ ते ‘दोन’ हा आद्य प्रवास झाला.
दत्तगुरुंच्या ‘एकोऽस्मि बहुस्याम्’ ह्या आद्य स्फुरणातून म्हणजेच इच्छेतून हे विश्व उत्पन्न झाले व त्यांच्या या संकल्पाबरोबरच ते परमेश्वर स्वत:च ‘श्रीमन्नारायण’ अर्थात् ‘श्रीमहादुर्गेश्वर’ झाले.
लीलाधारी परमेश्वर स्वतःच्या लीलेतून या विश्वाची उत्पत्ती करतो, स्व-लीलेनेच तो या विश्वाचे संचालन करतो आणि आपल्या लीलेनेच तो या विश्वाचा स्वतःमध्ये
लय करतो.
ही ललिता कामकला असल्याने कलनास सुरुवात झाली म्हणजेच काळाच्या गतीची सुरुवात झाली, काळ अस्तित्वात आला.
‘काळाची गती’ हीसुद्धा कामकला ललितेची कलाच आहे, कारण तिच्यामुळे काळाला अस्तित्व व गती प्राप्त झाली. कालाच्याही पलीकडे असणाऱ्या कामकला ललितेची गती मात्र स्वयंभू, स्वयंपूर्ण आहे कारण ती स्वतःच महाकामेश्वरी आहे.
कामातूनच विश्व उत्पन्न होते, कामामुळेच विश्वाचा कारभार चालतो आणि कामातच विश्वाचा लय होतो. लोकातीत असूनही जगतास आणि सर्व जीवात्म्यांस चालना देणारी, चालवणारी, चालण्यासाठी प्रवृत्त करणारी कामकला ललिताच आहे.
ललिताम्बिका कृपेने कामनापूर्ती :
आमच्या प्रापंचिक कामना असोत की पारमार्थिक कामना असोत म्हणजेच आमच्या स्थावर-जांगम संपत्ती, कौटुंबिक सुख, पुत्र-पौत्रसौख्य आदि कामना असोत की भक्ती करणे, भगवन्ताचे दर्शन होणे, त्याची सेवा करणे, त्याचे अखंड सामीप्य प्राप्त करणे आदि कामना असोत, या सर्व कामना पूर्ण होण्यासाठी ललिताम्बिकेची कृपा असणे आवश्यक आहे.
एवढेच नव्हे, तर कौटुंबिक, आर्थिक, समस्यांचे, अडचणींचे निवारण होण्याच्या कामनाही ललिताम्बिकेच्या कृपेने पूर्ण होतात. शारीरिक, मानसिक आधिव्याधींपासून ते अहंकारापर्यंत जीवनात अनेक प्रकारच्या बाधांना तोंड देत आम्हां सामान्य मानवांना जीवनप्रवास करावा लागतो. या बाधांचे निवारण झाल्याशिवाय जीवनात साफल्य, शान्ती, तृप्ती, समाधान, आनन्द मिळत नाही आणि प्रत्येक मानवाच्या मनात असणारी समस्तबाधानिवारण होण्याची कामनासुद्धा ललिताम्बिकेच्या कृपेनेच पूर्ण होते.
षोडशी कामकला ललिताम्बिका :
ज्याप्रमाणे चंद्राच्या सोळा कला (अमावस्या ते पौर्णिमा) मानल्या जातात, त्याप्रमाणे कामकलेच्या एकूण सोळा (षोडश) कला मानल्या जातात आणि म्हणूनच हिला ‘षोडशी’ असेही म्हटले जाते.
षोडशी कामकलेच्या या सोळा कला म्हणजे या संपूर्ण विश्वाच्या नियामक शक्ती. विश्वातील सर्व नियामक शक्ती ह्या षोडशी कामकलेच्या सोळा कलांपासूनच उत्पन्न झाल्या आणि म्हणूनच विश्वातील सर्व नियमांची, नियामक शक्तींची अधिष्ठात्री षोडशी कामकला ललिताच आहे.
यावरून आमच्या लक्षात येते की मला माझे ध्येय गाठण्यासाठी आवश्यक असणारी प्रत्येक शक्ती ललिताम्बिकेकडूनच प्राप्त होते. तसेच माझ्या कुठल्याही कार्यात बाधा आणणारी, माझ्या जीवनात बाधा आणणारी, मला त्रास देणारी कुठलीही शक्ती कितीही सबल असली, तरी तिच्यापेक्षा अवघ्या विश्वाच्या नियामक शक्तींची स्वामिनी असणाऱ्या ललिताम्बिकेची शक्ती अनन्त आहे.
उदाहरणार्थ मला त्रास देणाऱ्या षड्-रिपु, दुष्प्रारब्ध आदि कुवृत्तिरूपी शक्ती असोत किंवा बाह्य शत्रू, अचानक येणाऱ्या आपत्ती अशा प्रकारच्या शक्ती असोत या सर्व शक्तींचा बीमोड ललिताम्बिकेच्या कृपेने होतो.
‘कुकर्म-कुसंग-कुबुद्धि-कुदृष्टि-विनाशिनी’ या शब्दांत आदिमाता जगदंबा ललिताम्बिकेचे वर्णन केले आहे, हे आम्हाला ठाऊकच आहे. अशा या ललिताम्बिकेची कृपा प्राप्त करून घेण्याचे सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी आम्हां श्रद्धावानांना उपलब्ध करून दिलेले सहजसोपे साधन म्हणजे श्रीललिताम्बिका पूजन.
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी :
तुलसीपत्र १४०५ व १४०६ मध्ये बापू जगदंबा ललितेच्या स्वरूपाबद्दल सविस्तर लिहितात, त्याचा सारांश आहे - ‘विश्वाचा आणि प्रत्येकाचा प्रवास ललितेकडून शक्ती प्राप्त झाल्याशिवाय होऊच शकत नाही. स्थिती, गती आणि प्रगती ह्या सर्वांसाठी ललितेची शक्तीच कारणीभूत ठरते.
परमात्म्याच्या आदेशानुसार ब्रह्मदेव सृष्टिनिर्मिती करण्यासाठी तपश्चर्येस प्रारंभ करतो. तपश्चर्येच्या अवधीतच ब्रह्मदेवास सृजनशक्तीची प्राप्ती होऊ लागते आणि त्याचबरोबर ब्रह्मदेवाच्या मनात विचार येतो की ही शक्ती मला कुठून प्राप्त झाली? या शक्तीचा स्रोत कुठे आहे?
ब्रह्मदेव त्या शक्तीचा स्रोत शोधण्यास निघतो, पण अवघा क्षीरसागर पालथा घालूनही त्याला कशाचाही पत्ता लागत नाही. शेवटी शोधून शोधून थकल्यावर ब्रह्मदेव थांबतो आणि त्या शक्तीस शरण जाण्याची कामना त्याच्या मनात उत्पन्न होते.
‘जिने मला जन्मास घातले, जी मला शक्ती पुरवत आहे, ती माझी माताच असणार’ या विचाराने तिला मातृरूपात भजणारा ब्रह्मदेव मनोमन म्हणतो आणि त्याच्या सादेेस प्रतिसाद म्हणून त्या निर्गुण निराकार कामकला जगदंबेचे प्रथम साकार प्रकटन झाले, ते ‘ललिता’ या रूपात.
ब्रह्मदेवाने त्यानंतर प्रार्थना करतो - ‘माते, याआधी तुझा शोध घेताना मी जेव्हा थकलो आणि तुला शरण आलो, तेव्हा मी जिथे होतो तिथे तू प्रकटलीस. आज तुझा हा बालक मोहग्रस्ततेमुळे तुझ्यापासून दूर आला आहे आणि शक्तिहीन झाल्यामुळे मला पुन्हा तुझ्याकडे येणे शक्य नाही; पण तू मात्र माझ्याकडे येऊ शकतेस, तुला अशक्य असे काहीही नाही. तर अंबे, तूच तुझ्या करुणेचा विस्तार कर आणि जिथे मी आहे तिथे ये.’
बापू म्हणतात की हीच या विश्वातील पहिली प्रार्थना होती, हीच प्रथम भक्ति-साद होती. मोहातून विस्मृती होते, विस्मृतीमुळे शक्तिहीनता येते, शक्तिहीनतेमुळे स्मरण होते, स्मरणामुळे भक्ती होते, भक्तीमुळे श्रद्धा स्थिर होते आणि श्रद्धाच मानवास त्याचे सामर्थ्य पुन्हा प्राप्त करून देते, ऐश्वर्य प्राप्त करून देते. पण त्यासाठी ब्रह्मदेवाप्रमाणे अंबेला ‘अनाथनाथे अंबे करुणा विस्तारीं’ ही साद घालायला हवी. ब्रह्मदेवाने भक्तीने साद घालताच महाकामेश्वरी ललिता तिथे पुन्हा प्रकट झाली.’
ललिताम्बिका पूजनात ‘दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी, अनाथनाथे अंबे करुणा विस्तारीं’ ही आरती करताना श्रद्धावान हीच प्रार्थना जगदंबेच्या चरणी करतात. आमचे सामर्थ्य, ऐश्वर्य प्राप्त करण्यासाठी आमच्यावर ललिताम्बिकेची कृपा असायला हवी, तिने विस्तारलेल्या करुणेच्या प्रान्तात आम्ही असायला हवे. ललिताम्बिका पूजन करणे हे यासाठीच्या साधनांमधील एक महत्त्वपूर्ण
साधन आहे.
भंडासुरहन्त्री ललितम्बिका :
तुलसीपत्र १४०७ पासून भंडासुरवधाचे आख्यान बापूंनी लिहिले आहे. त्यात आम्ही वाचतो की भंडासुराने शिवाकडून वर मिळवला की या विश्वातील जो कुणी माझ्यासमोर युद्ध करण्यास येईल, त्याची अर्धी शक्ती मला मिळावी. शिवाकडून हे वरदान प्राप्त केलेला भंडासुर उन्मत्त व उद्दाम होऊन सर्वत्र उत्पात माजवू लागला.
भंडासुराने मांडलेल्या उच्छादाला कंटाळलेले मानव, ऋषिगण, देवगण त्या वेळी ललिताम्बिकेची तपश्चर्या करणाऱ्या कामदेवाकडे गेले. कामदेव जेव्हा ऋषिगणांना घेऊन मणिद्वीपातील ललितेसमोर उपस्थित झाला, तेव्हा ऋषि त्यांची व्यथा जगदंबा ललितेस सांगतात. त्यावर ललिताम्बिका त्यांची व्यथा दूर करण्यासाठी प्रकट होऊन भंडासुराचा वध करण्याचे आश्वासन देते.
श्रीमाता ललिताम्बिकेचे हे आश्वासन ऐकताच आनंदित झालेल्या मानवांना ललिताम्बिकेला ‘अंबज्ञ’ म्हणण्याचेही भान रहात नाही. आपली अडचण सुटल्याच्या आनंदात ते आदिमाता ललिता चण्डिकेस विसरून जातात. ‘साक्षात् ललिताम्बिका अवतरित होणार आहे, तर त्यासाठी आम्हालाही काही तयारी करायला हवी, आम्हाला आमची भक्ती वाढवायला हवी, तिची काही मदत करायला हवी’ अशा प्रकारचा कोणताही विचार त्यांच्या मनात येत नाही.
येथे आम्हाला अत्यंत महत्त्वाचा बोध प्राप्त होतो की आमच्या जीवनात ललिताम्बिकेचे अवतरण व्हावे, तिची कृपा आम्हावर रहावी यासाठी आम्हाला आमची तयारी करायला हवी. आम्ही काहीही न करता तिने आमच्या अडचणी सोडवाव्या, आमच्या बाधांचे निवारण करावे, आमच्या कामना पुरवाव्या, आमच्यासाठी धावावे अशी अपेक्षा करणे अनुचित आहे.
‘मातृवात्सल्यविन्दानम्’, ‘मातृवात्सल्य उपनिषद्’ यांचे पठण करणे, त्यांतील जगदंबेच्या स्तोत्रमन्त्रांचे पठण करणे, नवरात्रीत अंबज्ञ इष्टिका पूजन करणे यांबरोबरच सद्गुरुंच्या तपश्चर्येतून आणि संकल्पातून आमच्यासाठी साकारलेले श्रीललिताम्बिका पूजन करणे आमच्यासाठी आवश्यक आहे.
ललितासहस्रनाम:
ललितेने भंडासुराचा वध केल्याचे पाहताच सर्व ऋषिगण ‘अंबज्ञ’ म्हणत भंडासुरहन्त्री जगदंबा ललितेचा जयजयकार करतात. ब्रह्मर्षि वसिष्ठ ललिताम्बिकेस वंदन करून म्हणतात, “माते, तुझे स्तवन करण्यासाठी माझ्याकडे स्तुतिपर स्तोत्र नाही; जर काही आहे तर ते आहे ‘ह्रीम्’ हे बीज आणि ‘ललिता’ हे नाव. तेव्हा माते, तूच आम्हाला असे काही सामर्थ्यसंपन्न स्तोत्र दे, ज्याचे स्मरण करण्याने, ज्याचे अध्ययन करण्याने, ज्यात अवगाहन करण्याने सामान्यांतील सामान्य मानवसुद्धा तुझ्याकडून सहजपणे सामर्थ्य प्राप्त करून तुझी अधिकाधिक भक्ती करू शकेल; तुझ्या पुत्रांशी एकनिष्ठ राहू शकेल.”
हे ऐकल्यावर ललिताम्बिकेच्या स्मितहास्यातून जे शब्द उत्पन्न झाले, ते शब्द होते - ‘श्रीललितासहस्रनाम’. हे ललितासहस्रनाम प्रत्यक्ष ललिताम्बिकेच्या हास्यकलेतून प्रकट झाले.
ललिताम्बिका पूजनात ललितासहस्रनामाचे पठण सुरू असताना श्रद्धावान ललिताम्बिकेस बिल्वपत्रे आणि सुगन्धित पुष्पे अर्पण करतात. श्रीसूक्तामध्ये जगदंबेस प्रिय असणाऱ्या बिल्ववृक्षाचा उल्लेख आला आहे. अशा या जगदंबेस प्रिय असणाऱ्या बिल्ववृक्षाची पाने म्हणजेच बिल्वपत्रे ललिताम्बिका पूजनात श्रद्धावान अर्पण करतात.
कुंकुमार्चन :
ललिताम्बिकेच्या पूजनात श्रद्धावान ललिताम्बिकेचे कुंकुमार्चनही करतात म्हणजेच ललिताम्बिकेच्या चरणी कुंकुम अर्पण करतात. कुलाचारांमध्ये आपल्या कुलदेवतेचे कुंकुमार्चन करणे यास अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
आपल्या कुलदेवतेचे कुलाचार व्यवस्थितपणे व्हावेत अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण काही जणांना ‘त्यांची कुलदेवता कोण’ हे ठाऊक नसते, तर काही जणांना आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या मूळ गावी जाऊन सर्व कुलाचार पाळणे इच्छा असूनही शक्य होत नाही. अनेक जणांना ‘आपल्याकडून कुलाचार पालनामध्ये काही चूक तर होत नाही ना’ अशी भीती सतावत असते.
कुलेश्वरी ललिताम्बिका :
ललितासहस्रनामात ललिताम्बिकेचे एक नाम ‘कुलेश्वरी’ असे आहे. ललिताम्बिका ही सर्वांची कुलदेवता आहे, सर्व देवता तिच्यातूनच उत्पन्न झाल्या आहेत. तुलसीपत्र १३३२ मध्ये बापू लिहितात - ‘भगवान श्रीत्रिविक्रमाने शृंगीप्रकाश व भृंगीप्रकाश ह्यांना आपल्या कवेत घेऊन सांगितले, “प्रत्येक श्रद्धावानाला आदिमातेच्या, तिच्या नऊ अवतारांच्या, त्या दशमहाविद्यांच्या व सप्तमातृकांच्या अनेक गुणांची व कार्यांची आपल्या जीवनात साक्ष पटत जाते व ज्या मानवाला ज्या कार्यरूपाची ओळख पटली, ती त्याची ‘कुलदेवता’ बनते आणि म्हणूनच असंख्य कुलदेवता आहेत, तसेच नित्यशिवाच्या अनेक रूपांची ओळख पटत राहते व ते ते कार्यस्वरूप त्या त्या मानवाचा ‘कुलदेव’ बनतो.
व्यक्ती तितक्या प्रकृती. त्याचप्रमाणे व्यक्ती तितक्या ह्या आदिमातेच्या विभूती; आणि म्हणूनच प्रत्येकाची कुलदेवता व कुलदेव हे मूलतः आदिमाता महिषासुरमर्दिनी व आदिपिता महादुर्गेश्वरच असतात, ह्यात काहीच संशय नाही. व हे जो जाणतो तोच पूर्ण श्रद्धावान.”
तुलसीपत्र १३३३ मध्ये बापू सांगतात - ‘भगवान श्रीत्रिविक्रमाच्या मुखातून निघालेल्या ज्ञानामृतामुळे सर्व ऋषिगण आनंदित होऊन नाचू लागले. तेथील प्रत्येक ऋषिकुमारसुद्धा आनंदाने बेभान होऊन नृत्य करू लागला.
ते सर्व ऋषि जल्लोष करता करता त्यांच्या मनात आठवत होते, ‘आतापर्यंत कितीवेळा आपल्याला सामान्यजनांनी प्रश्न केले - ‘आमची कुलदेवता ही की ती? आमच्या कुलदेवतेचे व कुलदेवाचे एकमेकांशी नाते काय? कुलदैवत बदलता येते काय? स्त्रिया विचारीत की आम्ही आमच्या माहेरच्या कुलदेवतेस भजू शकतो काय? कुणी विचारीत की कुलदेव किंवा कुलदेवता बदलता येते काय? कुणी म्हणत की आम्हांस आमची कुलदेवताच ठाऊक नाही. मग आम्ही आता काय करावे?’
आणि आपल्याकडे यांतील एकाही प्रश्नाचे उत्तर नव्हते. आजच आम्हालासुद्धा कळले की खरी गोष्ट काय आहे;
की मणिद्वीपनिवासिनी महिषासुरमर्दिनी अष्टादशभुजा सप्तचक्रस्वामिनी जगदंबा हीच सर्व मानवांची मूळ व आद्य कुलदेवता; आणि हिचेच कारणरूप असणारा अर्थात हिचेच अभिन्न रूप असणारा त्रिगुणातीत महादुर्गेश्वर हाच प्रत्येक मानवाचा मूळ व आद्य कुलदेव आहे.’
नवरात्रीतील ललिताम्बिका पूजन महत्त्व :
तुलसीपत्र १३९५ मध्ये म्हटल्याप्रमाणे ‘ललिताम्बिका सर्व श्रद्धावानांची प्रत्यक्ष पितामहीच आहे’, असे स्वत: स्वयंभगवान श्रीत्रिविक्रमाने सांगितले आहे.
त्या प्रसंगाचे वर्णन करताना बापू लिहितात - ‘सर्वच्या सर्व नऊ नवदुर्गा, दशमहाविद्या, सप्तमातृका, ६४ कोटी चामुण्डा तेथे उपस्थित झाल्या व मग त्या सर्वजणी क्रमाक्रमाने आदिमाता महिषासुरमर्दिनीच्या रोमारोमात शिरल्या व त्याबरोबर मणिद्वीपनिवासिनी आदिमातेच्या तिसऱ्या डोळ्यातून एकाचवेळी प्रखर व सौम्य असणारे असे अपूर्व तेज सर्वत्र पसरू लागले आणि त्याबरोबर आदिमातेच्या मूळ रूपाच्या जागी तिचे ‘ललिताम्बिका’ स्वरूप दिसू लागले.
ललिताम्बिकेने प्रकट होताच सर्वांना अभयवचन दिले, “ज्याला नवरात्रीतील इतर दिवशी नवरात्रिपूजन जमते आणि ज्याला नवरात्रीतील इतर दिवशी नवरात्रिपूजन जमत नाही, अशा सर्वांसाठीच ललितापंचमीच्या दिवशी माझ्या ‘महिषासुरमर्दिनी’ स्वरूपाचे माझ्या लाडक्या पुत्रासह केलेले पूजन संपूर्ण नवरात्रीचे फल ज्याच्या त्याच्या भावानुसार देऊ शकते.’
नवरात्रीत ललिताम्बिका पूजन करण्याचे महत्त्व या विवेचनावरून आमच्या लक्षात येते. ललितापंचमीस, नवरात्रीतील अन्य दिवशी हे ललिताम्बिका पूजन करणे श्रेयस्करच आहे, पण जर काही कारणवश त्या कालावधीत हे पूजन करणे शक्य झाले नाही, तर अन्य दिवशीसुद्धा हे पूजन अवश्य करावे, ललिताम्बिका पूजनात सकल मातृशक्तींचे म्हणजेच नवदुर्गा, दशमहाविद्या, सप्तमातृका, ६४ कोटी चामुण्डा, कुलदेवता या सर्वांचे पूजन होत असते.
रक्षणकर्ती ललितम्बिका :
तुलसीपत्र १३५० मध्ये बापूंनी सांगितल्याप्रमाणे श्रीयंत्र व्यूहरचनेची प्रमुख सेनापती माता शिवगंगागौरी ‘दंडनाथा’ स्वरूपात असून सर्व ‘देवी’स्वरूपे, ‘भक्तमाता’ स्वरूपे (पार्वती, सरस्वती, लक्ष्मी), दशमहाविद्या आणि विविध ‘कुलदेवता’ रूपे आदिमाता जगदंबेच्या सैन्यातील विविध कार्यांच्या आपापल्या सामर्थ्यानुसार श्रेष्ठ वा कनिष्ठ अधिकारी
आहेत.
या सर्व सैन्याची सम्राज्ञी असणाऱ्या आदिमातेच्या स्वरूपास ‘ललिताम्बिका’ असे नाम आहे आणि हिचे हे सर्व सैन्य सदैव श्रद्धावानाच्या रक्षणासाठी तत्पर असते. उचित वेळेस ह्या सैन्यातील उचित शक्तीस ‘देवता’ म्हणून श्रद्धावानाच्या सहाय्यासाठी पाठविले जाते.
आता प्रश्न असा उपस्थित होऊ शकतो की एखादा मानव श्रद्धावान आहे; परंतु त्यास श्रीयंत्राची माहिती नाही व ओळखही नाही. मग त्याचे काय?
अशा श्रद्धावानासाठी आदिमातेच्या ‘अष्टादशभुजा’स्वरूपाचे दर्शन व पूजन हेच ‘श्रीयंत्रपूजन’ धरले जाते व योग्य वेळी त्यालाही श्रीयंत्र प्राप्त होतेच.”
श्रीललिताम्बिकायै नम :
वरील अभ्यासावरून आमच्या लक्षात येते की ललिताम्बिका आणि तिचे सैन्य श्रद्धावानांच्या संरक्षणासाठी तत्पर आणि समर्थ आहे. ललिताम्बिकेच्या सैन्यापुढे कुठलीही आसुरी वृत्ती, वाईट ताकद कस्पटासमान आहे. ललिताम्बिका श्रद्धावानास इहलोकातील सौख्य प्रदान करून, त्याच्या जीवनातील, प्रगतीतील सर्व प्रकारच्या बाधा दूर करून, उचित कामना पूर्ण करून, त्याच वेळेस त्याचा आध्यात्मिक विकासही साधून देण्यास समर्थ आहे. अशा या ललिताम्बिकेचे पूजन करण्याची संधी सद्गुरुकृपेने आम्हाला उपलब्ध झाली आहे.
सर्व प्रकारच्या अपवित्रतेचा, अशुभाचा नाश करणारे, जीवनातील सर्व प्रकारच्या बाधांचे निवारण करणारे, सर्व प्रकारच्या मंगल कामना पूर्ण करणारे, मणिद्वीपनिवासिनी अष्टादशभुजा जगदंबेची छत्रछाया प्राप्त करून देणारे असे हे श्रीललिताम्बिका पूजन आहे अशी श्रद्धावानांची धारणा आहे.
तुलसीपत्र १३८७ मध्ये बापू लिहितात त्यावरून आम्हाला ज्ञात होते की ‘प्रत्येकाला स्वतःतील अंतर्गत आसुरी वृत्तीशी युद्ध करावेच लागते आणि कुठलेही युद्ध ललिताम्बिकेच्या कृपेशिवाय विजयी ठरूच शकत नाही.
ललिताम्बिका’ हे स्वरूप युद्धकर्त्रे म्हणजे युद्ध करणारेही आहे आणि शान्तिकर्त्रे म्हणजे शान्ती करणारेही आहे.
आमच्या जीवनात आमच्या दुष्प्रारब्धाविरुद्धचे युद्ध आम्हाला जिंकायचे असेल आणि जीवनात शान्ती, तृप्ती, समाधान, आनन्द यांची प्राप्ती करायची असेल, तर आम्हाला ललिताम्बिकेच्या कृपाछत्रछायेत रहायलाच हवे.