अनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य ‣

परमपूज्य सद्‍गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी ४ सप्टेंबर २०१२ रोजी अधिक भाद्रपद मासातील अंगारक संकष्ट चतुर्थीस श्रीमूलार्क-गणेशाची श्रीअनिरुध्द गुरुक्षेत्रम्‌येथे स्थापना केली.

श्रीमूलार्क गणेश हे गणेशाचे अत्यंत सिद्ध, दिव्य व स्वयंभू असे स्वरूप मानले जाते. ह्यास मांदार-गणेश अथवा श्री श्वेतार्क-गणेश असेही म्हटले जाते. अशा या श्रीमूलार्क-गणेशाच्या सिद्धतेसाठी, स्थापनेसाठी आवश्‍यक असलेले सर्व शास्त्रोक्त विधी सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांच्या मार्गदर्शनानुसार संपन्न झाल्यावरच श्रीमूलार्क-गणेशाची श्रीअनिरुध्द गुरुक्षेत्रम्‌येथे स्थापना केली गेली.

‘मी पाहिलेला बापू’ या पुस्तकात या संदर्भातील माहिती देताना पुरोहित श्री. अतुल महाजन लिहितात - ‘गुरूक्षेत्रम्‌मध्ये मांदार गणेशाची जी स्थापना झाली, त्या गणपतीच्या प्रतिष्ठापनेची पूर्ण जबाबदारी बापूंनी माझ्यावर आणि पाठक गुरूंजीवर दिली होती. कशा पद्धतीचा मांदार गणेश असतो, काय असतो, कसा असतो याबद्दल सगळी ऐकीव माहिती होती. २१ वर्ष पूर्ण झालेल्या रुईच्या झाडामधून उत्पन्न होणारा गणपती म्हणजे मांदार गणेश. हा गणपती स्वयंसिद्ध असतो. ती मूर्ती जमिनीतून बाहेर कशी काढायची? याबाबतीत काहीच माहिती नव्हती. बापूंशी चर्चा करून व्यवस्थित ते शोधण्यात आले. २०१२ च्या पौष महिन्यातील संकष्टी चतुर्थीला चंद्रोदयानंतर गुरुवारच्या दिवशी ती मूर्ती जमिनीतून काढण्यात आली. त्यानंतर सतत अकरा महिने वेगवेगळ्या प्रकारचे अनुष्ठान करून अष्टगंधामध्ये ठेवून, तेलामध्ये, तुपामध्ये ठेवून ती मूर्ती स्थापनेसाठी सिद्ध करण्यात आली.’

०७ एप्रिल २०१६ रोजीच्या प्रवचनात मूलाधार चक्राचे महत्त्व स्पष्ट करताना बापूंनी सांगितले की प्रत्येकाच्या मूलाधार चक्राचा स्वामी श्रीगणपती आहे. आहार, विहार,

आचार आणि विचार ही चार दले असणार्‍या मूलाधार चक्राच्या कार्यातील अडथळे मूलार्कगणेशाच्या कृपेमुळे दूर होतात. विघ्नहर्त्या मूलार्कगणेशाच्या भक्तीने प्रपंच-परमार्थातील अन्य विघ्नेही दूर होतात आणि त्यामुळे श्रद्धावानाच्या प्रापंचिक-पारमार्थिक प्रगतीचा मार्ग सुकर होतो.

दैनिक ‘प्रत्यक्ष’च्या तुलसीपत्र अग्रलेखात सद्‍गुरु श्रीअनिरुद्ध लिहितात - ‘मूलार्कगणेशाच्या मंत्रपठणामुळे मानवाची प्रज्ञा अर्थात भगवंताने दिलेली बुद्धी, मानवाच्या मानवी बुद्धीवर व मानवी मनावर ताबा मिळविते आणि श्रद्धावानाची सर्व संकटांतून व चुकांतून मुक्तता करते.’

सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांनी दिलेल्या ‘ॐ गं गणपते श्रीमूलार्कगणपते वरवरद श्रीआधारगणेशाय नमः सर्वविघ्नान्‌नाशय सर्वसिद्धिं कुरु कुरु स्वाहा।’ या मूलार्कगणेशाच्या मन्त्राचे पठण बापूंच्या आज्ञेनुसार ५ सप्टेंबर २०१२ पासून श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम् मध्ये केले जात आहे.

श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम् मध्ये येऊन श्रीमूलार्कगणेशाचे दर्शन घेऊन त्याची कृपा सर्व परिवारावार रहावी, सर्व विघ्नांचे निरसन व्हावे, मनावर बुद्धीचा अंकुश रहावा, आहार-विहार-आचार-विचार उत्तम रहावे, अपत्यांचा शैक्षणिक विकास व्हावा इत्यादि प्रार्थना श्रद्धावान मनोभावे करतात.

मूलार्कगणेशाच्या सान्निध्यात केलेली उपासना, प्रार्थना, उचित इच्छा निश्चितच फलद्रूप होतात अशी धारणा आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Scroll to top