‘अध्यात्म’
हा शब्द ऐकल्यावर बरेचदा सर्वसामान्य मानवाची स्थिती ‘साधासुधा जीव अध्यात्म कळेना, घाबरून राही दूर दूर’ अशी होते.
सामान्य मानवाच्या मनातील अध्यात्मविषयक भय दूर करून, भक्तीबद्दलचे गैरसमज दूर करून,
‘भगवंताच्या भक्तिभाव चैतन्यात राहून प्रत्येक जण भगवंताचे सामीप्य प्राप्त करू शकतो’
हा विश्वास दृढ करण्याचे आणि सहजसोप्या शब्दांत भक्तिविषयक मार्गदर्शन करण्याचे कार्य सद्गुरु श्रीअनिरुद्ध (बापू) आपल्या वाणीने, लेखणीने, आचरणाने करत आहेत.
श्रीमद्पुरुषार्थ ग्रन्थराज प्रथम खण्ड अनुसार
‘आत्यंतिक निवृत्तिवाद आणि ऐहिक स्वार्थाशी निगडित प्रवृत्तिवाद
या दोन्ही एकांतिक गोष्टींनी व्यक्तिजीवनात व समाजात असमतोल तयार होतो;
भक्तीच्या सहाय्याने निष्काम कर्मयोग शिकविणारा मार्गच मानवधर्माला परमेश्वरी ऐश्वर्य प्राप्त करून देतो.
आध्यात्मिक जीवन
आपल्या जीवनातील प्रत्येक कार्य आपण परमेश्वराकरिता करत आहोत व परमेश्वराला प्रत्येक गोष्ट त्याच क्षणी कळत असते,
हे लक्षात ठेवून जगणे म्हणजेच आध्यात्मिक जीवन; व हाच मार्ग खरेखुरे समाधान, शांती व नित्यप्रसन्नता देणारा असतो.’
(श्रीमद्पुरुषार्थ ग्रन्थराज प्रथम खण्ड सत्यप्रवेश चरण 1)
अध्यात्म म्हणजे काय हे स्पष्ट करताना सद्गुरु श्रीअनिरुद्ध (बापू) म्हणतात -
‘सन्मार्गाने व्यवहार करत राहणे व असा व्यवहार करता करता अंतर्मन हळूहळू परमेश्वरी मनाच्या प्रवेशासाठी मोकळे करत जाणे म्हणजेच अध्यात्म; व जीवनात अध्यात्म हे अंतिम ध्येय साकार करण्यासाठी देहोपयोगी क्रिया सन्मार्गाने चालविणे हाच व्यवहार.
सत्य, प्रेम व आनंद हीच एकमेव अध्यात्माची त्रिसूत्री आहे
तर भक्ती, सेवा आणि संस्कारांचे शुद्धीकरण हीच केवळ अध्यात्माची साधने आहेत.
व्यावहारिक जीवन जगताना ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम व वानप्रस्थाश्रम जास्तीत जास्त सन्मार्गाने म्हणजेच धर्माने अर्थ व काम हे पुरुषार्थ मिळवून करणे,
हीच आध्यात्मिक जीवनाची पहिली यशस्वी पायरी आहे
व अशा प्रकारे प्रपंच करीत असताना सेवा व भक्तीचा अवलंब करून स्वत:चे अधिकाधिक शुद्धीकरण घडवून आणणे,
ही अध्यात्माची दुसरी यशस्वी पायरी आहे.’
अध्यात्म आणि वास्तव या दोन्हीचे भान राखणे आवश्यक आहे, याबाबत बापू म्हणतात -
‘जे अध्यात्म व्यवहारात येत नाही म्हणजेच ज्या अध्यात्माला वास्तवाचे भान नाही, ते अध्यात्म व्यर्थच.
तसेच ज्या व्यवहारात अध्यात्माचे भान सुटते, परमेश्वराची विस्मृती होते तो व्यवहार नुसता व्यर्थच नव्हे तर दु:खदायकच ठरणार.’
अध्यात्मदर्शन - भक्तिभाव चैतन्य (Devotion Sentience) म्हणजे खरेखुरे ’अध्यात्मदर्शन’ अर्थात देवाधिदेवाला, ह्या विश्वाच्या नियंत्याला मानवी सुखाच्या अधिष्ठानाला अर्थात स्वयंभगवानाला आणि त्याच्या लीलांना जाणणे, ओळखणे आणि त्यांना आपल्या जीवनात आणणे.
दैनिक प्रत्यक्षमधील आपल्या पहिल्या अग्रलेखात डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी लिहीतात -
जीवनाचा सर्वांगीण विकास घडवून आणून शांती व तृप्तीचा आनंद लुटण्यासाठी प्रत्येकाला आवश्यकता असते ती ‘उद्धरेत् आत्मना आत्मानम्’ ह्या महावाक्याचा अर्थ नीट समजून घेऊन त्यानुसार आचरण करण्याची.
अगदी सरळ साध्या भाषेत, माझा उद्धार फक्त मीच करू शकतो. मग तो सामान्य प्रापंचिक जीवनातील विकासाचा मार्ग असो किंवा पूर्ण ‘मी’पणा विरघळून टाकून परमेश्वराशी एकरूप होण्याचा मोक्षप्राप्तीचा मार्ग असो, परिश्रम मलाच करायचे असतात.
मात्र ह्या वाटचालीत सत्य म्हणजे काय व प्रेम म्हणजे काय ह्याची नीट ओळख असावी लागते.
ज्यातून पावित्र्य उत्पन्न होते वा राखले जाते, तेच सत्य.
परंतु जीवनाच्या प्रवासात ‘प्रेम’ नसेल तर सत्य लंगडे पडते. प्रेम म्हणजे ‘लाभेविण प्रीति’. असे प्रेम, ही ह्या जगातील सर्वात मोठी ताकद आहे. प्रेमाच्या ताकदीपुढे कुठलीही संहारक व विघातक त्रासदायी शक्ती नेहमीच हरते. माझा प्रपंच, माझा गृहस्थाश्रम म्हणजे असे प्रेम करण्यास शिकण्याची सर्वात मोठी व अगदी सोपी कार्यशाळा आहे.
स्वत:च्या जीवनात बाकीच्या कुबड्या टाकून देऊन खरेखुरे स्वावलंबी बनायचे असेल तर सत्य व प्रेमाची कास धरून परमेश्वर हाच एकमेव खराखुरा माझा आधार आहे हा दृढविश्वास अंगी बाणवावा लागतो.
सत्य व प्रेमाच्या शिवाय केलेली सर्व कर्मकांड, विधी व भक्तीची नाटके म्हणजे असेच तकलादू पांगुळगाडे आहेत. त्यांचा उपयोग आम्हाला अधिकाधिक अपंग बनविण्यासाठीच होतो, तर सत्य व प्रेमाच्या मार्गावरून केलेली भक्ती आम्हाला पूर्ण स्वावलंबी व म्हणूनच यशस्वी बनवते.