भक्तिभाव चैतन्य (Devotion Sentience) म्हणजे खरेखुरे ‘अध्यात्मदर्शन’ अर्थात देवाधिदेवाला, ह्या विश्वाच्या नियंत्याला, मानवी सुखाच्या अधिष्ठानाला अर्थात स्वयंभगवान त्रिविक्रमाला आणि त्याच्या लीलांना जाणणे, ओळखणे आणि त्यांना आपल्या जीवनात आणणे.
स्वयंभगवान त्रिविक्रम म्हणजेच भक्तिभाव चैतन्याचे सगुण, साकार चिरंतन स्वरूप.
‘त्रिविक्रम माझा देवाधिदेव आणि मी त्याच्या चरणांचा दास’ अशी अवस्था मनात आणून भक्त जे जे काही करत राहतो, ते ते सर्व म्हणजेच ‘भक्तिभाव चैतन्य’.
अर्थात स्वयंभगवान त्रिविक्रमाची, ‘माझा इष्टदेव, माझा देवाधिदेव, माझा जन्मनायक’ ह्या दृढनिश्चयाने केलेली, केली जाणारी नवविधा भक्तींमधील कुठलीही एक किंवा दोन किंवा तीन किंवा चार किंवा सर्वच्या सर्व भक्ती.
स्वयंभगवानाची आदिमाता व दत्तगुरुंवरील भक्ती हीच मूळ भक्ती असल्यामुळे, प्रत्येक भक्ताची कुठल्याही दैवताची भक्ती शेवटी भक्तिभाव चैतन्यालाच येऊन मिळते.
‘भक्तिभाव चैतन्य’ म्हणजे स्वयंभगवानाचे प्रेम.
अर्थात भक्तिभाव चैतन्य आणि स्वयंभगवान ह्यांच्यामध्ये भेदच नाही; आणि हेच ‘भक्तिभाव चैतन्याचे’ महत्त्वाचे रहस्य आहे.
भक्तिभाव चैतन्य म्हणजेच स्वयंभगवान आणि भक्तिभाव चैतन्यात राहणे म्हणजे त्या भगवंताच्या विशाल स्वरूपातच राहणे; आणि ते तर आपोआप घडतच असते, कारण हे सर्व विश्व व त्यांतील अणुरेणूंमध्येसुद्धा ‘तो’ स्वयंभगवान आधीच प्रवेश करून राहिलेला आहे आणि म्हणूनच त्याला ‘महाविष्णू’ म्हणतात. (‘विश्’ ह्या संस्कृत धातुचा अर्थ ‘प्रवेश करणे’ असा आहे.)
‘हा स्वयंभगवान ‘आकाश’रूपाने सर्वत्र आहे. माझ्या आतही आहे आणि बाहेरही आहे’ ही भावना जपणे म्हणजेच भक्तिभाव चैतन्य.
स्वयंभगवान त्रिविक्रम माझ्यावर जेवढे प्रेम करतो, त्याच्या एक दशांशही प्रेम, माझ्या असंख्य जन्मांतील सर्व आप्तांनी मिळून दिलेले नसते, हे जाणून ‘त्या’च्यावर भरपूर प्रेम करत राहणे म्हणजेच भक्तिभाव चैतन्य.
ज्ञानचिंतनाने, मोठमोठ्या अभ्यास करण्याने त्रिविक्रमाला कोणी जाणू शकत नाही. ह्याला जाणणे फक्त ह्याच्यावर व ह्याच्या चरणांवर प्रेम करण्यानेच साधू शकते; आणि ह्याच्यावर वाढते प्रेम करीत राहणे म्हणजेच भक्तिभाव चैतन्य.
त्रिविक्रमाचे नाम, रूप आणि गुण ह्यांवर पूर्णपणे मोहित होणे आणि त्याचेच वारंवार स्मरण होत राहणे म्हणजेच ‘त्रिविक्रम भक्तिभाव चैतन्य’.
मुखात त्रिविक्रमाचा मंत्रगजर, अंतःकरणात सद्गुरु त्रिविक्रमाविषयी वाढते प्रेम आणि सतत त्याच्या चरणांची ओढ अर्थात त्याच्या सेवेची ओढ, ह्यालाच ‘त्रिविक्रम भक्तिभाव चैतन्य’ असे म्हणतात.
स्वयंभगवानाचे जे रूप आपल्याला आवडते, ते सर्वांत खरे.
स्वयंभगवान त्रिविक्रमा’चे आपल्याला आवडणारे स्वरूप, नाम आणि लीला आपल्या हृदयात ठेवायच्या आणि ह्याच्यावर निःस्सीम प्रेम करायचे. मात्र त्यासाठी, ‘त्या’च्यामागून, त्याच्या मार्गावरूनच चालत रहावे लागते.
आणि ह्यालाच म्हणतात ‘भक्तिभाव चैतन्याचे गुप्त सूत्र’ - चरैवेति, चरैवेति! भजैवेति, भजैवेति! - ‘त्या’च्यामागून पुढे पुढे चालत राहणे आणि भक्ती करीत राहणे.
आणि वेदांचाच आदेश आहे - ‘चरैवेति, चरैवेति’। - ‘चर एव इति’।
‘भक्तिभाव चैतन्य’ म्हणजे भगवंताला अर्थात स्वयंभगवानाला आपल्या जीवनात आणणारा व आपल्या हृदयसिंहासनावर त्याची प्राणप्रतिष्ठा करण्याचा सर्वश्रेष्ठ राजमार्ग होय.
भक्तिभाव चैतन्य हे केवळ एकाच जन्माचे नव्हे, तर पुढील सर्व जन्म आनंदाने भरून टाकणारे सर्वोच्च तत्त्वज्ञान आहे, सर्वोत्कृष्ट पवित्र आचरण आहे आणि योगमार्ग, ज्ञानमार्ग आणि कर्ममार्ग ह्या तीनही अतिशय कठीण असणार्या मार्गांना अत्यंत सोपे करून श्रद्धावानांच्या जीवनात भगवंताचे अधिष्ठान स्थापन करणारा भाव आहे, ‘सच्चिदानंद धर्म’ अर्थात सच्चिदानंद जीवनमार्ग आहे.
‘मी भगवंताचा अंश आहे अर्थात भगवंतापासून अलग पडलेलो नाही’ हे सत्य जीवनात उतरविण्याचा सर्वश्रेष्ठ व अत्यंत सुलभ, सोपा मार्ग म्हणजे भक्तिभाव चैतन्य.
आणि म्हणूनच सर्व मानवांसाठी स्वयंभगवानाच्या लीला हेच ज्ञान, भगवंताशी भक्तिभाव चैतन्याच्या मंत्रगजराने जोडून घेणे हाच योग आणि आपली सर्व बरीवाईट कर्मे त्या स्वयंभगवानाच्या चरणी अर्पण करीत, त्याच्यावर प्रेम करीत राहणे हेच कर्म, ह्या तीन सूत्रांनी समृद्ध असलेले ‘भक्तिभाव चैतन्य’ हेच म्हणून सर्व वृत्तीच्या मानवांसाठी, सर्व स्वभावाच्या व्यक्तींसाठी निश्चितपणे जीवन सुखी करणारा अद्वितीय मार्ग आहे.
आणि म्हणूनच ‘आपल्या जीवनात कुठल्याही व्यक्तीपेक्षा, ध्येयापेक्षा, वस्तूपेक्षा, पदार्थापेक्षा आणि सुखापेक्षाही ह्या स्वयंभगवानावर अधिक प्रेम करणे’ हेच सर्व समीकरणे सोडविणारे एकमेव चैतन्यसूत्र आहे.
स्वयंभगवान त्रिविक्रम फक्त भक्तिभाव चैतन्यातच लिप्त होतो. पापाचे ‘पाप’पण आणि पुण्याचे ‘पुण्य’पण ह्या दोन्ही गोष्टींपासून तो स्वयंभगवान अलिप्त असतो. भक्तिभाव चैतन्यात राहणार्यास उद्धाराचा मार्ग खुला करून दिला जातो व थोड्या प्रतीक्षेनंतर स्वतः स्वयंभगवान त्यांना पापमुक्त करतो व अशा प्रकारे ‘कर्माच्या अटळ सिद्धांता’चा प्रभाव कमी केला जातो, नष्ट केला जातो. सुदुराचारी अर्थात जे अत्यंत व सांगोपांग दुराचारी आहेत, ज्यांनी पापांची अंतिम मर्यादा ओलांडली आहे, ज्यांनी कुठलेही पाप करायचे शिल्लक ठेवलेले नाही, अशा मूढांनासुद्धा, त्यांनी भक्तिभाव चैतन्यात प्रवेश केल्यास, स्वयंभगवान त्यांना पापहीन करतो.
जो श्रद्धावान जास्तीतजास्त, त्रिविक्रम भक्तिभाव चैतन्यात राहतो, त्याचीच पापे जाळली जातात.
भक्तिभाव चैतन्यामुळे प्रपंचही सुखाचा होतो, विविध विघ्ने दूर होतात, अनेक संधी व यशे जवळ येतात. भक्तिभाव चैतन्य हेच सर्वश्रेष्ठ तप आहे आणि ह्यानेच ‘तो’ श्रद्धावानांना वश होतो.
जेव्हा भक्ताच्या मनात दास्य, सख्य व शरणागती ह्या भावनांचा अधूनमधून का होईना, पण उच्चार होऊ लागतो, तेव्हा तेव्हा स्वयंभगवान स्वतः त्या भक्तिमार्गियाला वेगाने पुढे नेतो आणि त्याची अल्प-स्वल्प सेवा दशगुणे करून स्वीकारीत राहतो आणि अत्यंत हळुवार हाताने भक्तिमार्गियाला श्रद्धावान बनवून अर्थात स्वतःचा सखा बनवून ‘भक्तिभाव चैतन्यात’ आणून सोडतो.
श्रद्धावान बनण्यासाठी गरज असते फक्त एकच गोष्ट जाणण्याची - खरेखुरे १०८% प्रेम फक्त ह्या एकाकडूनच मिळू शकते व हा स्वयंभगवान तसे प्रेम करण्यास सदैव आतुर असतो
आणि एकदा का हे जाणले की मग भक्त श्रद्धावान बनतो व भक्तिभाव चैतन्यात अर्थात आनंदसरोवरात राहू लागतो.
भक्तिभाव चैतन्यात ‘स्वयंभगवान कर्ता आहे आणि मी त्याचा दास आहे’ ही घट्ट भावना असते. भक्तिभाव चैतन्यामध्ये आपण स्वयंभगवानाचे दास म्हणून राहतो आणि त्याचवेळेस अफाट सामर्थ्य व अनिरुद्ध गती असणारा तो स्वयंभगवान आपला दास व प्रिय सखा बनून राहतो
नवविधा भक्ती ह्या जरी वेगवेगळ्या दिसल्या वा वाटल्या, तरी ह्या नऊही जणींचे मूळ स्वरूप ‘दासोत्तर सख्य’ अर्थात ‘दास बनून सखा बनणे’ हेच आहे.
ज्याच्याकडे भक्तिभाव चैतन्य आहे, त्याच्या हृदयातच हा हृदयस्थ राहतो.
जन्मात बाकी सर्वकाही मिळाले परंतु भक्तिभाव चैतन्य मिळाले नाही, तर जे मिळाले त्याचा आनंद उपभोगता येत नाही आणि भक्तिभाव चैतन्य मिळाले असेल, तर न मिळालेल्या गोष्टीसुद्धा सुखदायी ठरतात.
केवळ स्वयंभगवान त्रिविक्रमाचे भक्तिभाव चैतन्य हेच एकमेव शाश्वत सत्य आहे - ज्याच्यामध्ये तुमचा सर्व भार उचलण्याचे सामर्थ्य आहे.
श्रद्धावानांच्या जीवनात भगवंताचे पडणारे पाऊल म्हणजे ‘स्वयंभगवानाचा मंत्रगजर’.
‘स्वतःच्या जीवनशेतीचा मी फक्त शेतकरी आहे आणि हा स्वयंभगवानच मालक आहे’ हे मनावर नीट बिंबवून मंत्रगजराच्या माळा करीत राहणे म्हणजेच भक्तिभाव चैतन्य.
भक्तिभाव चैतन्यात आपल्याला फक्त जास्तीत जास्त मंत्रगजर करीत राहायचे असते आणि ‘त्या’चे प्रेम स्वीकारायचे असते.
भक्तिभाव चैतन्यात प्रवेश केलेल्या श्रद्धावानासाठी स्वयंभगवान श्रीत्रिविक्रम, त्याचा मंत्रगजर त्याच्या कलियुगातील रूपाचे ध्यान, त्या रूपावरील प्रेम, त्या रूपाची सगुण भक्ती व सेवा आणि चण्डिकाकुलातील ज्याला आवडेल, प्रिय वाटेल त्या इष्टदेवतेची भक्ती, पूजन हे सर्वच्यासर्व एकरूपच आहे.
प्रत्येक मानवासाठी, आपले जीवन प्रारब्धाच्या निबीड जंगलातून सुखरूप बाहेर काढण्यासाठी एकाच गोष्टीची आवश्यकता असते आणि ती गोष्ट म्हणजे सद्गुरु भक्तिभाव चैतन्य (Sadguru Devotion Sentience).
येथे ‘सद्गुरु’ म्हणजे नित्यसद्गुरु अर्थात् स्वयंभगवान त्रिविक्रम आणि भक्तिभाव चैतन्य म्हणजे जमेल तसे, जमेल तितके, जास्तीतजास्त प्रमाणात त्याच्या नामस्मरणात, अनुभवसंकीर्तनात, लीलाश्रवणात, भजन-अभंग श्रवणात, चरित्रपठणात, पूजनात, सेवेत, त्याच्या ध्यानात राहणे अर्थात त्याच्याशी सतत जोडलेले (Connected) आणि त्याच्या सतत संपर्कात (Communication) राहणे आणि तेसुद्धा कसे? - तर चैतन्य म्हणजे जिवंतपणे, रसरशीतपणे कारण त्याची भक्तीच मानवाला खर्या अर्थाने जिवंत ठेवते, त्याचे जीवन रसरशीत बनवते कारण सर्व विश्वाची व विश्वातीत असणारी ‘आद्य जीवनीय शक्ती’ अर्थात जगदंबा त्याच्या हृदयात राहते.
रामनाम, पंचाक्षरी शिवमंत्र (ॐ नमः शिवाय) आणि श्रीगुरुचरणी संपूर्ण शरणागती ह्या तीन गोष्टी भक्तिभाव चैतन्याच्या गंगेवरील काशी, प्रयाग व हरिद्वार आहेत
आणि भक्तिभाव चैतन्याची गंगा, यमुना व सरस्वती ह्यांचा संगम होऊन बनणारी ‘त्रिवेणी’ अर्थात ‘चैतन्यगंगा’ म्हणजेच आदिमाता जगदंबा अर्थात परांबा.
संपूर्ण भगवद्गीता आणि संपूर्ण रामायण, म्हणजे भक्तिभाव चैतन्याचे अर्थात स्वयंभगवानाचे ग्रंथस्वरूप आहे.
हे ‘त्रिविक्रम भक्तिभाव चैतन्य’ हा प्रत्येक श्रद्धावानाने भरभरून लुटून न्यावा असा कधीही न संपणारा अक्षय्य खजिना आहे आणि हा खजिना मनसोक्तपणे लुटण्याची अनुज्ञा, परवानगी, मुभा त्रिविक्रमानेच देऊनही ठेवलेली आहे.
त्रिविक्रम भक्तिभाव चैतन्याची खरी गुरुकिल्ली ‘संपूर्ण दास्यत्व’ ही आहे आणि त्या किल्लीने उघडणारे द्वार सख्यत्वाचे आहे.