उत्तर – रोगांना आमंत्रण देणारा आणि परमेश्वरी कृपेला अडथळा बनणारा हा क्रोध म्हणजे मानवाचा सर्वात मोठा शत्रू. भस्मासुराने ज्याप्रमाणे स्वत:च्याच मस्तकावर हात ठेवून स्वत:लाच जाळले त्याप्रमाणे आपण आपल्या क्रोधाचाच राग मनात धरल्यासच हा क्रोधाचा भस्मासुर नष्ट होईल. परंतु ह्या भस्मासुराला हे करावयास लावणारी ती ‘मोहिनी’ म्हणजे काय? महाविष्णूचा तो मोहिनी अवतार म्हणजेच परमात्म्याची ‘सगुण भक्ती’. परमेश्वराच्या नामरूपाची मोहिनी ज्या प्रमाणात माझ्या अंतरंगात प्रवेश करते, तिच्या एकेका पदन्यासाबरोबर माझ्यातील षड्रिपू त्या त्या प्रमाणात नष्ट होतात व तेवढ्याच प्रमाणात परमेश्वराची ऐश्वर्ये माझ्या आयुष्यात प्रवेश करतात.