‘श्रद्धावान हा शब्द भगवान श्रीकृष्णाने स्वतः गीतेमध्ये पहिल्यांदा चतुर्थ अध्यायात आणि नंतर ६व्या व १८व्या अध्यायात, म्हणजेच तीन वेळा उच्चारला आहे आणि म्हणूनच
‘भक्ती करतो तो भक्त आणि भक्तिभाव चैतन्यात राहतो तो खरा भक्त अर्थात श्रद्धावान’,
हे विसरू नका.
श्रद्धावान् लभते ज्ञानं तत्पर: संयतेन्द्रिय:।
ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति॥
- श्रीमद्भगवद्गीता ४/३९
अर्थ - भगवंताशी एकनिष्ठ असून भक्तीत तत्पर असणारा, भक्तीद्वारे इन्द्रियांना संयमित ठेवणारा श्रद्धावान ज्ञान प्राप्त करतो. ज्ञान प्राप्त करून तो तत्काळ भगवत्-प्राप्तिरूपी श्रेष्ठ शान्ति मिळवतो.
योगिनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना।
श्रद्धावान् भजते यो मां स मे युक्ततमो मत:॥
- श्रीमद्भगवद्गीता ६/४७
अर्थ - कर्ममार्ग, ज्ञानमार्ग, योगमार्ग आदि मार्गांवरील सर्व साधकांमध्ये जो श्रद्धावान स्वत:च्या अन्तरात्म्याने माझी अनन्यभक्ती करतो, तो सर्वश्रेष्ठ आहे असे मी मानतो कारण तो माझ्याशी अखंड आणि संपूर्ण जुळलेला असतो.
श्रद्धावान् अनसूयश्च शृणुयादपि यो नर:।
सोऽपि मुक्त: शुभान् लोकान् प्राप्नुयात् पुण्यकर्मणाम् ॥
- श्रीमद्भगवद्गीता १८/७१
अर्थ - कुणाबद्दलही असूया न बाळगणारा जो श्रद्धावान मानव या श्रीमद्भगवद्गीतेस श्रवण करेल, तोसुद्धा सर्व पाशांपासून मुक्त होऊन पुण्यकर्मे करणार्यांच्या शुभ लोकांस जाईल.’
सर्वसामान्य मानव, भक्त, श्रद्धावान व सच्चा श्रद्धावान या भक्तिमार्गाच्या प्रवासातील विविध टप्पे
सर्वसामान्य मानव
भक्ति उपभोगांसाठी करायची आणि भगवंताला उपाशी ठेवायचे आणि वेळ पडताच विसरूनही जायचे व गरज पडल्यास आठवायचे.
भक्त
भक्ति करतो तो भक्त. भक्तिमार्गामध्ये भक्त फक्त आपल्याकडे असेल तेवढ्या व असेल तशा श्रद्धेतून सुरुवात करतो. जमेल तशी आपल्या इष्टदैवताची भक्ती करत राहतो आणि मुख्य म्हणजे सदैव भगवंताशी कृतज्ञ राहतो आणि ‘हे भगवंता, तूच माझ्या जीवनाचा सूत्रधार आहेस’ असे भगवंताला वारंवार सांगत भजन, पूजन, अर्चन, पठण, ग्रंथपारायण, मंत्रजप, नामजप करीत राहतो.
भक्तिमार्गामध्ये, तो भक्त, ‘मी अल्प आहे, मी साधासुधा आहे; परंतु माझा भगवंत अनंत आहे आणि अपरंपार सामर्थ्याने युक्त आहे व माझा भगवंत प्रेमाला भुलतो’ ही जाणीव मनात अधिकाधिक घट्ट करीत जीवनातील प्रत्येक गोष्टीला सामोरा जातो.
अशा भक्ताला एकच ध्येय असते - ‘मला माझ्या भगवंताचा दास व सखा बनायचे आहे आणि त्याची भरपूर सेवा करायची आहे व त्याला शरण जाऊन रहायचे आहे.’
श्रद्धावान
- जेव्हा भक्ताच्या मनात दास्य, सख्य व शरणागती ह्या भावनांचा अधूनमधून का होईना, पण उच्चार होऊ लागतो, तेव्हा तेव्हा स्वयंभगवान स्वतः त्या भक्तिमार्गियाला वेगाने पुढे नेतो आणि त्याची अल्प-स्वल्प सेवा दशगुणे करून स्वीकारीत राहतो आणि अत्यंत हळुवार हाताने भक्तिमार्गियाला श्रद्धावान बनवून अर्थात स्वतःचा सखा बनवून भक्तिभाव चैतन्यात आणून सोडतो. भक्तिभाव चैतन्यात राहतो तो खरा भक्त अर्थात श्रद्धावान.
भक्तिमार्गामध्ये स्वयंभगवान, श्रद्धावानाच्या जीवनात आदिमाता जगदंबेच्या आदेशानुसार कुठेही आणि कधीही हस्तक्षेप करत राहतो.’
सच्चा श्रद्धावान
जो श्रद्धावान स्वयंभगवानाची त्याच्याशी सदैव संलग्न असणारी शक्ती
अर्थात दैवी प्रकृती अर्थात स्वयंभगवानाची प्रेमशक्ती
हीचा आश्रय करतो, स्वयंभगवानाच्या चरणांवर शरणागत होतो,
स्वयंभगवानाच्या चेहर्यावरील स्मिताने प्रसन्न होतो
आणि स्वयंभगवानाच्या नजरेतील प्रेम स्वीकारतो तोच सच्चा श्रद्धावान;