३२) ’मी’ स्वयंभगवानाचा अंश आहे अर्थात माझा जीवात्मा त्या स्वयंभगवानाचाच एक अंश आहे आणि ’स्वयंभगवान’ अंशी आहे असे मानण्याने काय घडते?

उत्तर – ’मी’ भगवंतात आहे, मी भगवंताचा आहे, भगवंत माझ्या हृद्‌यात आहे, भगवंताच्या प्रेमातच मी सुखाने जगू शकतो, हे शाश्वत सत्य जेव्हा मानव विसरतो व भगवंताचा आधार केवळ गरजेपुरताच घेत राहतो, तेव्हा त्या मानवाची स्थिती, समुद्रापासून अलग पडलेल्या एका थेंबासारखी बनते – तो थेंब अर्थात जीवात्मा अर्थात तो मानव यत्किंचित अर्थात अल्प बनतो आणि काही करू न शकता जमिनीत शिरून चिखल बनतो.

समुद्रापासून वेगळा पडलेला थेंब, जेव्हा सूर्याच्या उष्णतेने वाफ होऊन वर आकाशात जातो आणि पर्जन्याचा थेंब बनून परत सागरात येऊन पडतो, तेव्हा त्या थेंबाला संपूर्ण सागराचे सामर्थ्य प्राप्त होते अर्थात त्या थेंबाला अख्ख्या समुद्राचे पाठबळ मिळते. त्याचप्रमाणे मानव जेव्हा ’मी त्या अनंत व अथांग असणार्‍या स्वयंभगवानाचा अंश आहे’ ह्याची जाणीव सदैव बाळगतो, तेव्हा त्याला त्या भगवत्‌समुद्राकडून सर्वकाही पुरविले जाते.

मी भगवंताचा अंश आहे अर्थात भगवंतापासून अलग पडलेलो नाही हे सत्य जीवनात उतरविण्याचा सर्वश्रेष्ठ व अत्यंत सुलभ, सोपा मार्ग म्हणजे भक्तिभाव चैतन्य.

Scroll to top