उत्तर – ‘ॐ’ हा एकाक्षरमंत्र ज्याप्रमाणे त्रि-नाथांच्या सामर्थ्यांनी युक्त आहे, तो विश्वाच्या प्राकट्याचे मूळ बीज आहे, त्याचप्रमाणे ‘राम’-नाम हे त्रि-नाथांचे एकत्र अस्तित्व धारण करणारा सर्वश्रेष्ठ मंत्र आहे. ह्यामधील ‘रं’ म्हणजे अग्नि अर्थात सहजशिव, ‘आ’ म्हणजे मूळ दैवी प्रकाश अर्थात सच्चिदानंद, ‘आ’नंदबीज आणि ‘म’ हे आदिमातेचे बीज (षोमबीज). ह्यामुळे जरी ‘राम’ ह्या नामाचा महाविष्णूने अभिमान धारण करून रामजन्म होणार असला, तरी ‘राम’नाम मात्र संपूर्ण त्रि-नाथकुलाचे सर्व बीजमंत्र आपल्या उदरात धारण करते.
दत्तगुरुंना आणि म्हणूनच सहजशिवाला व जगदंबेला ‘राम’ हे नाम सर्वाधिक प्रिय आहे. रामनामामध्ये ‘रा’ रूपाने सहजशिवाचे सामर्थ्य अर्थात पितृत्व-सामर्थ्य आणि ‘म’रूपाने जगदंबेचे सामर्थ्य अर्थात मातृत्व-सामर्थ्य प्रत्येकासाठी, प्रत्येक श्रद्धावानासाठी, त्याला आवश्यक त्या प्रमाणात नांदत असते. ह्या रामनामाचे वहन स्वतः हनुमंत करतो आणि ह्या रामनामाचेच शरीर त्रिविक्रम धारण करतो.