उत्तर – परब्रह्म परमेश्वर दत्तगुरुंच्या ‘एकोऽस्मि बहुस्याम्’ ह्या आद्य स्फुरणातून म्हणजेच इच्छेतून हे विश्व उत्पन्न झाले व ह्या त्यांच्या संकल्पाबरोबरच ते परमेश्वर स्वत:च ‘श्रीमन्नारायण’ अर्थात् ‘श्रीमहादुर्गेश्वर’ झाले व त्यांची इच्छा हीच आदिमाता गायत्री, जगदंबा, चण्डिका झाली. लीलाधारी परमेश्वर स्वतःच्या लीलेतून या विश्वाची उत्पत्ती करतो, स्व-लीलेनेच तो या विश्वाचे संचालन करतो आणि आपल्या लीलेनेच तो या विश्वाचा स्वतःमध्ये लय करतो.
परमेश्वर दत्तगुरुंच्या या लीलाशक्तीसच ‘ललिता’ असे म्हणतात. आदिमाता जगदंबा ललिता हीच परमेश्वराची आद्यलीला आहे, प्रथमलीला आहे. हीच ह्या परमपिता दत्तगुरुची, नित्यशिवाची नित्यलीला आहे. हीच या महाकामेश्वराची आद्य कामना आहे.
ललिता हीच आदिविद्या, शुद्धविद्या, पराशक्ती, चण्डिका, महादुर्गा, श्रीविद्या आहे. परमेश्वर ‘श्रीमन्नारायण’ आहे, तर ही परमेश्वरी ‘नारायणी’ आहे; परमेश्वर ‘महादुर्गेश्वर’ आहे, तर ही ‘महादुर्गा’ आहे; परमेश्वर ‘महाकामेश्वर’ आहे, तर ही ललिता ‘महाकामेश्वरी कामकला’ आहे.