सदगुरु श्री अनिरुद्ध पितृवचन

( गुरुवार, दिनांक २५ जुलै २०१९)

हरि ॐ, श्रीराम, अंबज्ञ.
नाथसंविध्‌, नाथसंविध्‌, नाथसंविध्‌.

कलियुग चालू आहे, बरोबर? अनेक वेळा प्रश्न पडतो - ‘इथे कलियुगामध्ये चांगल्या माणसांना जास्त त्रास होतो, लबाड लोकांचा नेहमी फायदा होताना दिसतो.’ पण ह्याच्यात लबाड लोकांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही. चांगल्या लोकांसाठी आज मला महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. मी गेली अनेक वर्षं बघतोय....प्रवचनातूनही अनेक वेळा सांगितलेलं आहे. आज फक्त त्याच टॉपिकवरून मला बोलायचं आहे. आपल्या बाजूला अनेक माणसं वावरत असतात. आपल्याला प्रत्येकाला माहिती असतं की प्रत्येकाचा स्वत:चा काहीतरी Interest असतो, स्वार्थ असतो. परंतु तो स्वार्थ असण्यामागे फारसं काही चूकही नाही, हे पण आपण बघितलेलं आहे. पण आपण रामदासस्वामींच एक जे वचन आहे, ‘ऐकावं जनाचं, करावं मनाचं’, त्यानुसार सगळ्यांचं ऐकून घ्यावं, त्यातून आपल्याला जे योग्य ते निवडावं.

अनेक चांगली माणस फसतात का? चांगल्या माणसांना त्रास का होतो? तर ती लबाड लोकांच्या खोट्या बोलण्याला फसतात म्हणून. लबाड माणसं एक तर गोड बोलून, गयावया करून, ‘आपण किती गरीब आहोत, आपण किती साधे आहोत, आपण किती दु:खी आहोत, आपण किती दीन आहोत, आपण किती Victim आहोत, म्हणजे आपण कसे अन्यायाचे बळी आहोत’ अशा विविध प्रकारे, ‘आपले हितचिंतक आहेत’ अशा तऱ्हेने आपल्या समोर येत राहतात आणि आपल्या मनामध्ये एक एक बीज पेरत राहतात; आणि आपण आपल्या वैयक्तिक भावनांच्यामध्ये वाहत जाऊन ह्या लोकांची खोटी बोलणी accept करत राहतो, स्वीकारत राहतो आणि हीच चांगल्या माणसाच्या दुर्दैवाची खरी कहाणी आहे. चांगल्या माणसांना कळतच नाही की खरं कोण बोलतंय, खोटं कोण बोलतंय, कोण कधी खरं बोलतंय, कोण कधी खोटं बोलतंय? आणि हे कळणं नामुनकीन आहे, इम्पॉसिबल आहे, अशक्य आहे....कळतच नाही; आणि खोटं बोलणारी माणसं बेमालूमपणे खोटं बोलतात. तर चांगली माणसं खोटं बोलताना अशा प्रकारे बोलतात की बावळटपणे पकडली जातात ताबडतोब. ताबडतोब त्यांचं खोटं बोलणं सगळे पकडतात. पण जे खरे खोटं बोलतात ते एवढे हुशार असतात की त्यांचं खोटं बोलणं आपल्याला खर्‍यापेक्षाही खरं वाटतं आणि हाच कलियुगातला सगळ्यात मोठा एक प्रश्न आहे. हाच मोठा प्रॉब्लेम आहे की चांगल्या लोकांना त्रास का होतो? कारण खरं आणि खोटं ह्यांच्यामधला फरक कळत नाही म्हणून.

अगदी recently घडलेली एक घटना सांगतो. एक पति-पत्नी खरोखरच गणपतीचे चांगले भक्त. आणि ह्यांचा मुलगा आणि सून. सून पूर्णपणे नास्तिक, मुलगाही नास्तिकतेकडे झुकणारा; आणि बायको आल्यानंतर (तर काय, बघायलाच नको). देवबीव काही नाहीच. आणि मुख्य म्हणजे सूनेला, गणपतीचे दहा दिवस आपण नॉनव्हेज खायचं नाही हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता. ह्याच्या घरात धार्मिक वातावरण, गणपतीची भक्ती....त्यामुळे दर संकष्टी चतुर्थीला नॉनव्हेज खायचं नाही, गणपतीचे दहा दिवस नॉनव्हेज खायचं नाही, गणपतीचा एवढा मोठा उत्सव करायचा. त्याचा तिला कंटाळा होता. तिने हळूहळू, पहिल्यांदा काही बोलली नाही....स्मार्ट होती. ‘नाही, आम्ही नास्तिक असलो म्हणून काय झालं? आई, तुम्ही मानता ना! मग आम्ही सगळं करू.’ ह्यांना वाटलं चांगली गोष्ट आहे. हळूहळू एक दोन वर्षांनी दाखवायला लागली की “मला ना, थोडंसं प्रेम वाटायला लागलंय गणपतीबद्दल! नाही, खरंच मजा येते, चांगलं वाटतं, खूप चांगली व्हायब्रेशन्स आहेत.” ‘व्हायब्रेशन’ शब्द वापरायला खूप सोपा असतो, ‘चांगली व्हायब्रेशन्स येतात’ म्हणजे असं posh पण दिसतं आणि परत मनातलं खरं-खोटं काय ते पण कळत नाही.

आणि मग तिसर्‍या वर्षी तिने काय केलं? बरोबर अशी व्यवस्था केली की सासूला पाडली तिने. बरोबर सासू जिथून वळणार, त्या ठिकाणी तिने हळूच बाजूने एक चमचाभर तेल टाकून दिलं. त्याच्यावरून सासू घसरली, पडली आणि सासूला पहिल्या दिवशी फ्रॅक्चर झालं. ‘हे काय झालं विघ्न, विघ्नहर्ता घरात आणलात आणि विघ्न झालं!’ आणि सून परत सासूच्या जवळ बसून सारखी काय म्हणते? “काय बघा ना, एवढं तुम्ही गणपतीचं मनापासून करताय, ते गणपतीच्या पहिल्याच दिवशी फ्रॅक्चर झालं, काय देव असतो, काय कळत नाही, देव चांगल्या लोकांच्याच मागे लागतो.” ‘देव चांगल्या लोकांच्याच मागे लागतो’ हे वाक्य तिने सासूला अनेक वेळा ऐकवलं. ‘असं नाही गं....काहीतरी माझं नशिब असेल. झालं....बरं झालं ना ताबडतोब डॉक्टर भेटले, गणपतीच्या दिवशी कुठे कोण भेटतं?’ तिने सांभाळून घेतलं. हिच्या लक्षात आलं की इथे काहीच फरक पडलेला नाही आहे. मग पुढच्या वर्षी तिने गणपतीच्या पहिल्याच दिवशीच सासर्‍याला गोळ्या खायला घातल्या आणि त्याला डायरिया सुरू. दोन तासामध्ये आठ-नऊ वेळा लूजमोशन्स झाले, ऍडमिट करायची वेळ आली.

“बघा, मी तुम्हाला सांगते ना, गणपती आपल्याला धारत नाही.” काय म्हणाली? “गणपती आपल्याला ‘धारत’ नाही” म्हणजे ‘गणपती आपल्या बाजूने नाही आहे. गणपती आपला हितचिंतक नाही आहे, हे दैवत आपल्याला बदलायला हवं.’ तरीदेखील ह्यांचं मन दोलायमान झालं थोडसं - “पण नाही नाही, आपण आणायचा गणपती! काही असेना.”

तर हिने काय करावं? हिने पुढच्या वर्षी सांगितलं, “आपण एक करूया, सकाळीच एवढ्या भानगडी झाल्यात ना, आपण थोडा उशीरा गणपती बसवूया, दुपारी चार नंतर बसवूया.” ते म्हणाले, “चल तुझं ऐकू आपण.” चार वाजल्यानंतर गणपती बसवल्यानंतर हिने स्वत:च नाटक केलं की हिला भूतबाधा झाल्याचं. हे तर हिच्याच हातात होतं आणि डॉक्टर? हिचाच भाऊ. तो म्हणतो, “हो, हिला काहीतरी मोठा ऍटक आलाय नक्कीच वेडेपणाचा. कसा आला? चांगली होती आमची बहीण.” आणि सासू-सासर्‍यांनाही माहितीये, ‘सून चांगली आहे आपली, व्यवस्थित नॉर्मल आहे. नोकरी करते. नोकरीवरचे लोक सांगताहेत.’ Blame कोणाला? गणपतीला. गणपती बंद केला. आलं लक्षामध्ये? कसं खोटं बोलून लबाडीने त्यांच्या घरातली चांगली भक्ती दूर केली. गणपती बाप्पा काय गप्प बसणार नाहीये. तो आपल्या भक्तांसाठी काय करायचं ते करणारच आहे.

चौथ्या वर्षी हिने सांगितलं, “गणपती घरात बसवायचा नाही. आई-बाबा, मी तुमचं काही ऐकणार नाही. घरात गणपती बसवायचा नाही.” आणि गणपती आणला नाही, आलं लक्षामध्ये? आणि त्यामध्ये हिची भूतबाधा वगैरे गेली. ज्योतिष्याकडे वगैरे जाऊन आली. त्या नाटकात पार असतात ही मंडळी. तर असा चौथ्या वर्षी गणपती आला नाही आणि ही जी ह्या सगळ्या कारस्थानाची हिरॉईन आहे, vamp आहे, ही मस्तपैकी सकाळी उशिरा वगैरे उठली व्यवस्थित. आता घरात गणपती नाही. कारण हिला नॉनवेजचा मोठा प्रॉब्लेम होता आणि गणपतीला आणायचा कंटाळा होता - लोकं येतात एवढी, अमूक-तमूक वगैरे. ही मार्केटमध्ये फिश आणायला म्हणून गेली - गणपतीच्या काळात फिश, चिकन सगळं स्वस्त असतं ना - तर आणायला म्हणून गेली. आता तिथे आतमध्ये किती ओलेपणा असतो तुम्हाला माहितीये. तर ही त्या फिश मार्केटमध्ये अशी जोरात आपटली! आणि एवढंच नाही, तेवढ्यात मागून दहा-बारा कोळणी धावत आल्या. आता विचार करा, ही आपटलीये आणि मागून दहा-बारा कोळणी सामान घेऊन धावत येतात, काय झालं असेल! काय व्हायचं ते ‘व्यवस्थित’ झालं, बरोबर?
घरी आली. सासू म्हणाली, ‘गणपती आणला नाही ना, त्याच्यामुळे हे झालं.’ हिला बोलताही येत नाहीय. जेव्हा सासूला फ्रॅक्चर झालं होतं, सासू दोन दिवस हॉस्पिटलमध्ये होती. सासर्‍याला लूज मोशन झाले होते, तरी दोनच दिवस हॉस्पिटलमध्ये होते. ही सहा महिने हॉस्पिटलमध्ये होती. आता गणपती आणायचा की नाही आणायचा? आणि ही नंतर घरी आल्यानंतर, सासूने सांगितलं की “बघ, डॉक्टरांनी तुला सांगितलं होतं की तू कधीच बरी होणार नाहीस. आपण ह्यावर्षी गणपती आणला नव्हता म्हणून आम्ही अमूक-अमूक ठिकाणी गेलो, त्यांना विचारलं. त्यांनी सांगितलं, ‘तुम्ही अशी-अशी गणपतीची पूजा करा, असा गणेशयाग करा. मग बघा, सगळं नीट होईल.’ बघ गणपतीचं नाव घेतलं, गणपतीचाच याग केला. त्या दिवशीचं तुझं ऑपरेशन successful झालं बघ. गणपती आपण आणायलाच पाहिजे.”
देव देवाचं काम करण्यात चुकत नाही, हे मला तुम्हाला सांगायचंय. फक्त चांगल्या माणसांनी आपला विश्वास डगमगू द्यायचा नसतो. अशा रितीने हितचिंतकाचं रूप घेऊनसुद्धा, खोटं बोलणारी माणसं तुमचा बुद्धिभेद करत राहतात. प्रत्येक बाबतीत, फ़क्त देवाच्याच बाबतीत म्हणत नाही मी, तर साध्या-साध्या गोष्टीच्या बाबतीतसुद्धा करत राहतात त्यांच्या फायद्यासाठी किंवा त्यांची एखादी चुकीची गोष्ट लपवण्यासाठी; आणि ह्याच एका गोष्टीमुळे चांगली माणसं suffer होतात.

अगदी तुमच्या आयुष्याकडे वळून बघितलं तर लक्षात येईल, तुम्हाला जेव्हा-जेव्हा त्रास झालेला आहे, तो कशामुळे झालेला आहे? कोणाच्या तरी खोट्या बोलण्यामुळे किंवा कोणाच्या तरी खोटं वागण्यामुळे किंवा कोणाच्या तरी खोटं सांगण्यामुळे किंवा काहीतरी चुकीची गोष्ट करण्यामुळे किंवा त्याच्यात तुम्ही विरोध केल्यामुळे.

पण लक्षात ठेवायचं, ह्या सगळ्याच्या वर उठतो, तो आपला मंत्रगजर! कोणी तुमच्याशी किती खोटं बोलू दे, कितीही खोटं वागू देत, काही करू देत. जर आमचा मंत्रगजर आमच्या बरोबर असेल - आणि प्रत्येकाला सोळा माळा करायला जमतीलच असं मुळीच नाही. मी आधीच सांगितलं. - पण आमची श्रद्धा असेल, तर त्या खोटं बोलणाऱ्या माणसाचं, त्याच्या मनातलं मनोगत, त्याचं वाक्य, त्याचा अर्थ आमच्याकडे बदलूनच येतो आपोआप....अगदी आपोआपच बदलून येतो. कोणाचं काहीच चालत नाही. आपण त्याच्यानुसार काही निर्णय घ्यायला गेलो, तर निर्णयाची परिस्थितीच अशी विचित्र निर्माण होते की त्याचं खोटं बोलणं सगळं मायनस होत जातं. त्याचा परिणाम मायनस होत जातो, हे लक्षात ठेवा.
त्यामुळे आपल्याला जे प्रत्येकाला वाटतं, चांगल्या मनुष्याच्याच नशिबात का प्रॉब्लेम्स? तर त्याच्या प्रॉब्लेम्सचं कारण असतं, चांगल्या माणसाला, खर्‍या चांगल्या माणसाला खोटं नीट बोलता येत नाही, इतरांचं खोटं ओळखता येत नाही. पण ज्याच्याकडे भक्तिभावचैतन्य आहे, त्याला काळजी करण्याचं कारण नाही, आलं लक्षामध्ये?

मग लक्षात ठेवा, कोणाचंही खोटं बोलणं तुम्हाला थोडसं जरी त्रासदायक वाटलं, तरी ते तुमचा नाश करू शकणार नाही, तुमचा घात करू शकणार नाही; कारण त्रिविक्रमाने काय वचन दिलेलं आहे? ‘होऊ न देई घात।’ आलं लक्षामध्ये? आठवतंय का? किती जणांना पाठ आहेत अठरा वचनं? [थोडे हात वर] very bad. अठरा वचनं त्रिविक्रमाची पाठ असायला पाहिजेत.

लक्षात ठेवायचं, ‘रामा रामा आत्मारामा त्रिविक्रमा सद्‍गुरु समर्था।’ This is our prayer to him. ही आपली प्रार्थना आहे त्याला.
तर ‘सद्‍गुरु समर्था त्रिविक्रमा आत्माराम रामा रामा।’ This is his bounty to us. हे त्याचं वरदान आहे आपल्यासाठी.

त्याच्यामुळे हा एकमेव मंत्र असा आहे, जो पूर्ण आहे. प्रार्थना आणि प्रार्थनेचं उत्तर हे एकत्र असलेला हा जगातला एकमेव विलक्षण मंत्र आहे, लक्षात ठेवा. ओ.के.? नक्की लक्षात आलं? तर ह्यापुढे, ‘आम्हाला लोकं छळतात, त्रास देतात’ असं म्हणत बसायचं नाही. मंत्रगजर करायचा, तो रामबाण काम करणारच आहे.

आणि....लक्षात ठेवा, तो जो स्वयंभगवान आहे नं, जो कोणी, तो एवढा हुशार आहे की कोणी मनातल्या मनात तुमच्याशी खोटं बोलत असेल, चोरून तुमच्या नकळत वाईट वागत असेल तुमच्याशी आणि तुम्हाला कळत नसेल, तरी त्याला कळत असतं आणि तो मध्ये हात टाकणारच! लक्षात ठेवा. तो कोणाचं काहीही चालू देणार नाही. त्यामुळे बिनधास्त जगा, बिनधास्तपणे रहा आणि मंत्रगजर करत रहा, ओ.के.? ह्याच्यापुढे complaint करत बसणार नाही? [नाही] मग हा माझ्याशी वाईट वागला, तो वाईट वागला, ह्याच्यामुळे मी चूक केली, त्याच्यामुळे चूक केली, त्याच्यामुळे असं झालं....नाही. मनात विचार येऊ शकतो, पण त्याच्यात अडकायचं नाही. Just go ahead.

म्हणायचं Yes, आमचा स्वयंभगवान आमच्या बरोबर आहेच, मंत्रगजर आमच्याकडे आहेच, आम्ही कोणाच्या बापाला भीत नाही. ओ.के.? [ओ.के.]

॥हरि: ॐ॥ श्रीराम ॥ अंबज्ञ॥
नाथसंविध्‌॥ नाथसंविध्‌॥ नाथसंविध्‌॥

प्रतिक्रिया व्यक्त करा

Scroll to top