सदगुरु श्री अनिरुद्ध पितृवचन

( गुरुवार, दिनांक २२ ऑगस्ट २०१९)

हरि ॐ, श्रीराम, अंबज्ञ.
नाथसंविध्‌, नाथसंविध्‌, नाथसंविध्‌.

कुठला महिना चालू आहे? [श्रावण] कशाचा महिना असतो हा? श्रावणबाळाचा? श्रवण भक्तीचा महिना. नऊ प्रकारच्या भक्ती येतात ह्या नवविधा भक्तींमध्ये. पण ‘श्रवण’ ही पहिली भक्ती, तिच्यासाठी पूर्ण एक अख्खा महिना ठेवलेला आहे. पण जुन्या काळामध्ये म्हणजे आम्ही लहान असताना आणि त्याच्या आधी, चातुर्मासातल्या ह्या महिन्यामध्ये घरोघरी ग्रंथ लावला जायचा. म्हटणायचे - ‘ग्रंथ लावला’. म्हणजे ग्रंथाचं वाचन केलं जायचं आणि सगळी मंडळी एकत्र येऊन ऐकायची. आता काळानुसार माणसाला मिळणारा वेळ कमी झालाय, वाहतुकीच्या दरम्यान, जिकडे अर्धा तास लागायचा तिकडे दीड तास, दोन तास लागायला लागले. कामाची वेळ पण वाढत चाललीय. पहिल्यांदा आठ तासांपैकी पाच तास काम करून पळालं तरी चालायचं, तिथेच आता तर चौदा-चौदा तास काम करावं लागतंय; आणि परत गॅरंटी नाही - आज काम आहे, उद्या सकाळी असेलच ह्याची गॅरंटी कोणाला उरलेली नाही.

हे जे सगळे बदल होत असतात, ते बदल आपल्याला वाटतं....म्हणजे प्रत्येक पिढीला - आजच्या पिढीला नवीन पिढीची प्रत्येक गोष्ट वेगळी वाटते, चुकीची वाटते. नवीन पिढीला जुन्या पिढीची प्रत्येक गोष्ट चुकीची वाटते, वेगळी वाटते. एवढंच नाही, आमच्या काळात जे होतं ती स्थिती आणि परिस्थिती....म्हणजे माझ्या लहानपणी मुंबई शांत होती. मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलंय - दादर टी.टी च्या सिग्नलला पाच गाड्या जमल्या, तर माझी आजी म्हणायची, ‘बापरे! केवढा ट्रॅफिक आहे आज?’ आज केवढ्या गाड्या असतात, आपण विचार करतो. ही जी परिस्थिती होती, ती वेगळी होती. तेव्हा परळगाव ‘गाव’ होतं. आज ते ‘गाव’ नाही उरलं. तिथेही प्रचंड मोठ्या मोठ्या इमारती उभ्या राहिल्या. दादरची परिस्थिती आपण बघतो, सगळीकडे आपण बघतो.

पण ह्या गोष्टी बाह्य जरी बदलल्या, तरी एक सांगतो, मानवी जीवन बदलत नाही. फक्त जो कोणी बाहेरच्या बदलांमूळे स्वत:ला आक्रसून घेतो, बाहेरच्या बदलांमूळे स्वत:च्या मनावर काहीतरी परिणाम करून घेतो, त्यालाच त्याचा त्रास होतो. परंतु मानवाला, प्रत्येक मानवाला जन्माला घालतानाच, त्याच्या आयुष्यापर्यंतचा काळ कसा असणार आहे त्याची जाणीव त्या जगदंबेला आणि त्या स्वयंभगवान त्रिविक्रमाला असते. त्यामुळे त्याच्या मनामध्ये म्हणजे तुमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये असं एक केंद्र तयार केलेलं असतं की ते येईल त्या परिस्थितीशी जमवून घेऊ शकतं, adapt करू शकतं; आणि ते केंद्र प्रत्येक व्यक्तीमध्ये असतंच असतं. म्हणजे तुमच्या जीवनकाळामध्ये जे काही बदल घडून येतील, त्या सगळ्याच्या सगळ्या बदलांना न भिण्याचं, त्या बदलांना सामोर जाण्याचं, त्या बदलांशी आपल्याला जमवून घेण्याचं, त्या बदलांनुसार, त्या काळाच्या गरजेनुसार स्वत:मध्ये बदल घडवून आणण्याचं जे कार्य आहे, जी capacity आहे, जी क्षमता आहे, जी ताकद आहे, जे विचार आहेत, जी बुद्धिमत्ता आहे, एवढी प्रत्येक मनुष्याकडे असतेच असते. मग असं का होतं आपल्याला? की काळ बदलला, जागा बदलली की आपल्याला वाटतं - सगळं बदललं. चुकल्या-चुकल्या सारखं वाटतं. वाटेल....पहिल्या वेळेस वाटू शकेल. माणूस आहोत आपण. आपल्याला मन आहे. परंतु आपल्याला माहित पाहिजे, की कितीही जीवनात बदल घडले तरी तो स्वयंभगवान सदैव आमच्या मनामध्ये जागरूक असतो, आमच्या मनामध्येसुद्धा.

तो एकच, तो एकच असा आहे कि जो तुम्हाला जराही न घाबरता, तुमची इच्छा असो वा नसो, तुमच्या मनामध्ये शिरतच असतो. आलं लक्षामध्ये? एवढंच की तुमची इच्छा असेल तर तो ठाण मांडून बसतो, तुमची इच्छा नसेल तर तो येतो आणि जातो. मग असं होतं - ‘सकाळी आला उपाशी गेला, दुपारी आला उपाशी गेला, रात्री आला उपाशी झोपला.’ बरोबर की नाही? हे आमच्यावर अवलंबून आहे. परंतु आम्हाला पण ही गोष्ट नीट माहीत पाहिजे की जीवनात कितीही मोठे बदल झाले तरी त्या बदलांची जाणीव त्या स्वयंभगवानाला असतेच. त्यामुळे त्यानुसार तो तुमच्या मनाला शेप देण्याचं काम करत राहतो, फक्त आम्हाला ते कळू शकत नाही, कळणं शक्य नाही.

ती जगदंबा काय आहे आणि तिचा पुत्र काय आहे, हे कळण्यासाठी ब्रम्हर्षिसुद्धा अनेक वर्ष, अनेक म्हणजे युगांपेक्षा (जास्त काळ) तपश्चर्या करत राहतात; तेव्हा कुठे त्यांना एका विशिष्ट प्रकारचा दृष्टांत किंवा दर्शन होतं, मग तिच्या रूपाचं आणि तिच्या मूळ रूपाचं; तर आमच्यासारख्या सामान्य मानवाला काय दर्शन होणार आहे! तर दर्शन होण्याची, दृष्टांत होण्याची काही आवश्यकता नाही. कारण आम्हाला माहीत पाहिजे की जर आमचं ‘त्या’च्यावर प्रेम असेल, जर आमचा ‘त्या’च्यावर विश्वास असेल तर ‘हा’ आमच्या मनामध्ये, म्हणजे आमच्या जीवनामध्ये हस्तक्षेप करत असतो. जीवनात कितीही बदल घडून देत - म्हणजे (समजा) एकेकाळी मी अत्यंत गरीब होतो, आज श्रीमंत झालो किंवा एकेकाळी मी अत्यंत श्रीमंत होतो, आज गरीब झालो....एकेकाळी माझ्याभोवती शंभर माणसं होती, आता माझ्याभोवती फक्त पाच माणसं आहेत....काही परिस्थिती असेल. पहिल्यांदा मी शाळेमध्ये होतो, मग कॉलेजमध्ये गेलो, मग नोकरीला लागलो, मग बिझनेस करायला लागलो, बिझनेस डुबला-बिझनेस वाढला....जे काही झालं असेल ते असेल. तरीदेखील प्रत्येक परिस्थितीमध्ये, प्रत्येक परिस्थितीला अनुसरून, त्या प्रत्येक परिस्थितीच्या अनुषंगाने जे बदल घडवणं आवश्यक आहे, ते बदल - माझ्यामधले बदल आणि माझ्या आजुबाजूच्या वातावरणातले बदलसुद्धा ‘तो’ घडवून आणत असतो, हे लक्षात ठेवा.

अनेकवेळा तुम्ही अनुभव घेतला असेल, पण आजकालची ट्रेनची गर्दी मी नुसती बघतो, मी हल्ली काय ट्रेनने जात नाही जास्त. लोकल ट्रेनमध्ये चढणं किती Difficult आहे? अत्यंत Difficult. मी फक्त टी.व्ही. वरचे व्हिडियो बघूनच माझी छाती धडकते, अरे बापरे! माणसं कशी चढत असतील. स्त्रियासुद्धा....बापरे! रणरागिणी कशा असतात तिकडे दिसतात. पण नाईलाज आहे त्यांचा. त्यांना ते करणं आवश्यकच आहे दररोज जायचं म्हटल्यावर. पण ह्याच्यामध्येसुद्धा लक्षात ठेवा की चाळीस वर्षांपूर्वीं, पन्नास वर्षांपूर्वी जी होती, ती त्याकाळातल्या स्त्रियांना गर्दीच वाटत होती, पुरुषांना गर्दीच वाटत होती, बरोबर? ती आजच्या गर्दीला अधिक जास्त गर्दी म्हणताहेत. Difficult आहे, पण शेवटी Adjust होतातच आहेत. नाहीतर दुसरा काहीतरी मार्ग निघतोच आहे. पण एक माहीत पाहिजे की ‘एक मार्ग बंद झाला म्हणजे आता सगळं संपलं’ हा विचार मात्र कायमचा संपवायला पाहिजे आणि आज मी ते सांगायला उभा आहे.

मी अनेकांना तुम्हाला बघतो की एक मार्ग जो तुम्हाला हवा असतो, तो बंद झाला की आम्ही निराशेच्या गर्तेत जातो. आम्हाला वाटतं, ‘आता सगळं संपलं, आता काही उरलं नाही.’ असं असू शकत नाही. तुमच्या जीवनातला मार्ग - तुमच्या प्रारब्धामुळे असेल, तुमच्या चुकीमुळे असेल, तुमच्या पापामुळे असेल किंवा इतर लोकांच्या वाईट वागण्यामुळे, योगायोगाने असेल....कश्याहीमुळे असेल - तो बंद झाला तरीदेखील ‘तो’ तुम्हाला टाकत नाही. ‘तो’ कमीतकमी तीन दरवाजे आणखीन उघडून देतो. मात्र ह्याच्यामुळे लक्षात ठेवा, जर माझा विश्वास असा असेल हा दरवाजा ‘त्याने’च बंद केलाय, तर मग ‘तो’ नऊ दरवाजे उघडतो. जेव्हा आम्ही स्वत:च्या नशिबाला दोष देत, एक दरवाजा बंद झाल्यावर दु:ख करत राहतो, तरीदेखील ‘तो’ तीन दरवाजे उघडतो; पण जर तुमचा विश्वास आहे, ‘बंद झाला ना, हरकत नाही, ‘त्या’च्या इच्छेने बंद झाला’ की मग ‘तो’ नऊ दरवाजे उघडतो आणि वेळ पडल्यास जास्त उघडतो; आणि तुम्ही त्या रस्त्याकडे वळत नाही असं ‘त्याला’ वाटलं की सरळ खेचून घेतो किंवा वेळ पडल्यास एक अशी लाथ पेकाटात मारतो की त्या रस्त्यावर जाणं भागच पडतं, मग तुमची इच्छा असो वा नसो!

ह्याचं सगळ्यात महत्वाचं Example म्हणजे आजच्या काळात ट्रान्सफर होतात बघा. लोक रडत राहतात, ‘दादा, आमची ट्रानस्फर झाली, काय करायचं?’ कशाला रडता? ‘त्या’ला सांगा. तुमच्यासाठी उचित असेल तर तो ट्रान्सफर घडवून आणेल, तुमच्यासाठी अनुचित असेल तर ट्रान्सफर घडवून आणणार नाही.

तुम्हाला खरंच सांगतो जवळवी गोष्ट, अगदी जवळच्या व्यक्तीची गोष्ट. त्या व्यक्तीला मी सांगितलं, ‘बाबा, भारतात राहू नकोस, भारतात राहणं तुझ्यासाठी धोक्याचं आहे, भारताच्या बाहेर जा.’ ती व्यक्ती गेली एका वर्षासाठी. मग ‘थंडी आहे, झेपत नाही, अमुक नाही, तमुक नाही’ म्हणून परत आली. मी जातानाच सांगितलं होतं, ‘इथे राहिलीस तर खूप घोटाळा होईल, तू चोर ठरशील.’ पण माणूस स्वत:च्याच बुद्धीचा वापर करतो. माणसं चांगली आहेत, अतिशय चांगली आहेत, प्रश्नच नाही. स्वभावाला चांगली आहेत, त्यांची भक्ती पण चांगली आहे, पण त्या थंडीला तिकडच्या घाबरले आणि अनेक गोष्टींचा विचार केला आणि परत आले. आणि एक वेळ अशी आली, कुठल्याही क्षणी पोलिस कस्टडीची हवा खावी लागेल. काहीही चूक स्वत:ची नसताना ही वेळ आली. त्यातून ती व्यक्ती वाचली. त्या व्यक्तीने खरंच काही चूक केलेली नव्हती, कुठलंही पाप केलेलं नव्हतं. परंतु त्यांना सांगितलं होतं, ते जर पाळलं असतं तर ती वेळच आली नसती. जी भीती आठ दिवस मनामध्ये घर करून बसली, चार दिवस जे अतोनात टेन्शन सहन करावं लागलं ते सहन करायची वेळच आली नसती. परंतु ‘तो’ जो बसलेला असतो, ‘तो’ काय करतो? ‘तो’ मात्र व्यवस्थित तुम्हाला बरोबर ज्या ठिकाणी ढकलायचं, तिकडेच ढकलतो. तुमच्या बाजूला त्या क्षणाला जी व्यक्ती आवश्यक आहे, त्या व्यक्तीलाच उभं करतो, हे लक्षात ठेवा.

फक्त तुमचं मनच बदलत नाही तो, तर तुमच्या आजूबाजूची माणसं पण बदलतो. जी योग्य व्यक्ती, जरूर असेल ती व्यक्ती तुमच्या बाजूला आणून उभी करतो. तुमचं त्या व्यक्तीकडे लक्ष जात नसेल, तर तुमचं त्या व्यक्तीशी भांडण घडवून आणेल, काहीही करेल, पण तुमचे त्या व्यक्तीशी संबंध जुळवून आणणार म्हणजे आणणारच. कारण ते तुमच्या फायद्याचं आहे.

पण ह्यासाठी विश्वास असावा लागतो - ‘एक विश्वास असावा पुरता । कर्ता हर्ता गुरु ऐसा॥’
म्हणजे एखादा दरवाजा बंद झाला नं आयुष्याचा, तर समजायचं की ‘हा दरवाजा माझ्यासाठी चुकीचा होता. ह्या दरवाज्यातून पुढे गेल्यावर मला तात्पुरतं यश मिळालं असतं, पण आयुष्याची वाट लागू शकली असती, म्हणून माझ्या स्वयंभगवानाने हा रस्ता माझ्यासाठी कायमचा सील करून टाकलाय आणि दुसरा रस्ता माझ्यासाठी भरपूर उघडलेला आहे. मला फक्त नीट रस्ता शोधायचा आहे. नाही शोधता आला मला, तर ‘तो’ मला ढकलणारच आहे त्या रस्त्यावरती', ही गॅरन्टी बाळगायची.

आणि ह्यासाठी काय, मोठ्या-मोठ्या तपश्चर्या करण्याची आवश्यकता नसते. जर त्याची इच्छा अशी असती कि प्रत्येकाने तपश्चर्या करावी, तर तुम्हाला संसारात कशाला टाकलं असतं? आणि तुम्ही सगळेच्या सगळे पृथ्वीवरचे लोक संन्यासी झाले, तर मग खायला कोण घालणार? सगळेच उपाशी मरतील ना! एका दिवसात मोक्ष अख्ख्या पृथ्वीला, बरोबर? संन्यासांना स्वत:ला स्वयंपाक करता येत नाही. मग जेवण वाढणार कोण? अन्न पिकवणार कोण? म्हणजे गृहस्थाश्रम आवश्यकच आहे, हे ‘तो’ जाणतो. म्हणूनच ‘त्या’ने कधीच उपदेश केला नाही, वेदांमध्ये किंवा पुराणांमध्ये कुठेही उपदेश केलेला नाही स्वयंभगवानाने की ‘संसार सोडा, कुठे नोकरी करू नका, पैसा कमवू नका, लग्न करू नका, प्रेम करू नका, मुलं उत्पन्न करू नका’ असं काहीही सांगितलेलं नाही.

म्हणून मग वेदांमधल्या प्रार्थना काय, तर ‘परमेश्वराने दिलेल्या मार्गाने शंभर वर्षाचं आयुष्य सुंदरपणे जगता यावं अशी स्थिती भगवंता आम्हाला दे, परमेश्वरा आम्हाला दे. मला भरपूर सुपुत्र आणि सुकन्या दे.’

आजच्या काळात तुम्ही हे मागणार नाही, हे मला माहिती आहे. बायकांची तर ताबडतोब इकडे-तिकडे बघायला सुरुवात झाली. हल्ली तर तो आशीर्वाद ऐकूच येत नाही - ‘अष्टपुत्रा सौभाग्यवती भव’. कोणी दिला तर ती सूनच ताबडतोब येऊन सासूच्या कानाखाली मारेल, ‘म्हातारे, पहिल्याच दिवशी अपशकुन केलास’. मग झालं problem. असं कोणी करणार नाही. पण लोकं घाबरतात ह्या आशीर्वादाला. आमच्या लहानपणी हा आशीर्वाद सहजपणे तोंडातून निघायचा - ‘अष्टपुत्रा सौभाग्यवती भव’. हा ऐकल्यावर बाईलासुद्धा खूप बरं वाटायचं, आनंद व्हायचा. वेळ बदलला, आज आठ-आठ मुलं कोणाला असणं शक्य नाही कारण त्यांना सांभाळणंही शक्य नाही. तो काळ वेगळा होता.

परंतु, त्या काळात आठ-आठ मुलं, सात-सात, नऊ-नऊ मुलं असूनसुद्धा ‘चाईल्ड सायकॉलॉजी’ची मदत घ्यायची कोणाला आवश्यकता भासली नाही. आज मात्र एक-एक बाळ असलं तरीही सायकॉलॉजीच्या दृष्टीने विचार करतात - ‘चाईल्ड सायकॉलॉजी’ - ओरडू की नको ओरडू? फटका मारू की नको मारू? अरे! आपलं बाळ आहे, आपण प्रेम करतो. द्यायचे दोन फटके बिनधास्त....काय बिघडलं? प्रश्नच नाही, आलं लक्षामध्ये? कारण लहान बाळाला कळत नसतं. गरम भांड्याला लहान बाळ जर हात लावतंय आणि तुम्ही समजावून सांगायला गेलात सायकॉलॉजीच्या दृष्टीने बसून. अडीच वर्षाचं बाळ आहे, कबूल. त्याला तुमचं बोललेलं कळतंय, कबूल. तुम्ही समजावून सांगायला गेलात, ‘बाळा, बस इकडे. बाळा, हे भांडं गरम आहे. ह्याचं टेम्परेचर अमुक डिग्रीच्या वर असल्यामुळे ह्याला तू टच केल्यानंतर तुझ्या हाताला भाजेल, तुझ्या हाताला फोड येईल.’ हे सगळं उचित आहे का? नाही. तुम्ही सांगितलंत, ‘हात लावून नकोस’ आणि निघून गेलात; तर बाळ काय करणार आहे? त्या भांड्यात हात घालणारच आहे. त्याच्याऐवजी जोरदार फटका दिलात आणि सांगितलंत, ‘हात घातलास तर खबरदार....दोन फटके देईन’, तर काय होईल? ते बाळ त्याला हात लावणार नाही. फालतू चाईल्ड सायकॉलॉजीचे चाळे उगीचच्या उगीच वाढत चालले हे पालकांच्या फालतूपणामुळे. त्यात बाकी कोणाची चूक नाही. मुलांना जिकडे ओरडायचं तिकडे ओरडायलाच पाहिजे. जिकडे ठोकायचं तिकडे ठोकायलाच पाहिजे. मात्र तेसुद्धा प्रेमातूनच व्हायला पाहिजे.
मी हल्ली बघतो काय? लोकांना हल्ली भांडणाची भीती वाटते. ह्याचा अर्थ, ‘भांडण करा’ असं माझं म्हणणं नाहीये. भांडणाची भीती का वाटते? कारण भांडण झालं नं कोणाशी की आम्ही एकमेकांचे शत्रू बनतो. This is wrong, घरामध्ये आपल्या माणसाशी भांडणं झालं तर ती व्यक्ती तुमची शत्रू बनत नाही हे नवरा-बायको पण हल्ली विसरत चाललेत. काका-मामांची गोष्ट तर लांबच राहिली.
पण ‘भांडण झालं म्हणजे ती व्यक्ती आमची शत्रू झाली’ ही भावना खरंच आमच्या वेळेला आम्ही कधी बघितली नाही. हल्ली माझ्या बॅचच्या लोकांमध्ये सुद्धा मी बघतो - भांडण झालं म्हणजे ती व्यक्ती शत्रू. अरे शेजारी-पाजारी सुद्धा एवढी भांडणं व्हायची, अवघ्या दोन दिवसांमध्ये परत गोडी झालेली असायची. नवरा-बायकोच्यात पण दहा वेळा भांडणं व्हायचीत, शंभर वेळा गोडी आलेली असायची.

पण हल्ली लोकं घाबरतात, का? ह्या घाबरण्यामागे खरं कारण प्रत्येक जणच आहे. जो आपल्याशी भांडला, ज्याच्यावर मी रागावलो, जो आपल्यावर रागावला ती व्यक्ती आपली शत्रू बनते. कशासाठी? काय कारण आहे? विचार करा.
तुम्हाला भांडायचं नं, तुम्ही तेवढ्याच जोराने भांडा; पण भांडताना जर प्रेम असेल पोटामध्ये आणि मग भांडण झाल नं, तर भांडण संपतं. पण सूडाची भावना एकदा का आली, धडा शिकवण्याची भावना एकदा मनामध्ये आली की समजायचं, भांडण आता त्या व्यक्तीशी सुरू नाहीये. आता आपलं भांडण स्वत:चंच, स्वत:च्या मनाशी सुरू झालंय.

तुम्हाला हजार वेळा सांगितलंय - तुमचे शत्रू जे नुकसान करतात, त्याच्या हजारो पट तुमचं स्वत:चं नुकसान राग, क्रोध ही गोष्ट करते, लक्षात ठेवा; आणि सूडाच्या भावनेसारखी दुसरी चुकीची भावना नाही.
रामायण बघा कसं आहे. रामायणामध्ये कोणीही कोणाचा सूड घेताना दिसत नाही. तर महाभारत म्हणजे फक्त सूडाचा प्रवास आहे. अगदी सत्यवती-मत्स्यगंधेपासून शेवटपर्यंत प्रत्येक जण सूडच घेतोय. म्हणून महाभारत कसं आहे? सतत दु:खमय आहे, दु:खाने भरलेलं आहे. तर रामायणामध्ये कितीही कष्ट असले, तरी दु:ख क्षणिक आहे, तेसुद्धा नाममात्र आहे आणि आधार, आनंद मात्र संपूर्ण रामायणामध्ये पसरलेला आहे. रामायणामध्ये कोणीही कोणाचा सूड घेत नाही.

विचार करा, बघा सत्यवती-मत्स्यगंधेचा विवाह पहिला पराशर ऋषीबरोबर झाला. तो तिला सोडून गेला. तेव्हा तिने सूड राजा शंतनूवर घेतला. बरोबर? त्याला अट घातली की तुझा पहिला राजपुत्र आहे, त्याने लग्न करायचं नाही, त्याने ब्रह्मचारी राहायचं. तो राजा बनणार नाही. जो लायक होता खराखुरा, जो खराखुरा ऑफिशिअल- अधिकृत वारस होता, त्याचाच हक्क नाकारला, म्हातार्‍याशी लग्न करायचं होतं म्हणून.

तिला मुलं झाली. ती मुलं कशी झालीत? पहिला एक मुलगा मारला गेला लढाईमध्ये. दुसरा मुलगा रोगग्रस्त होता, तोही गेला. त्याच्या दोन बायका होत्या. अंबिका आणि अंबालिका. त्यांना मुलं कशामुळे झाली पुढे? नियोगपद्धतीने झाली. त्या मुलांतला धृतराष्ट्र कसा निघाला? जन्मांध. पंडुराजा जन्मापासून ऍनिमिक. विदूर दासीपुत्र, त्यामुळे त्याला स्थान नाही, तो राजा बनू शकत नाही. पुढे काय झालं? धृतराष्ट्र मोठा असला तरी अशक्त असल्यामुळे राज्य कोणाला मिळालं? पंडुला. त्याच्यावर कारवाया झाल्या. पंडुला शाप मिळाला. पंडु रानात गेला. तो तिकडे मेला. इकडे धृतराष्ट्राला राजा बनवणं भाग पडलं कारण विदुर राजा बनू शकत नाही दासीपुत्र असल्यामुळे, त्या काळानुसार. पुढे कौरव-पांडवाची भांडणंच-भांडणं सुरू झाली. सगळ्यांचेच हाल झाले. कोण सुखी झालं मला सांगा.

चौथी पिढी सुद्धा म्हणजे, पांडवांची तिसरी पिढीसुद्धा त्याच तापात जळली. स्वत: पांडव, पांडवांचे सर्वच्या सर्व पुत्र मारले गेले. म्हणजे बघा, द्रौपदीचे पाचही पुत्र मारले गेले. सुभद्रेचा अभिमन्यु मारला गेला. हिडिंबेचा घटोत्कचही मारला गेला. उलुपीचा पुत्रही मारला गेला. सगळेच मारले गेलेत. उरला फक्त एकच - तोसुद्धा कसा? श्रीकृष्णाने त्याला जिवंत केला म्हणून. दु:ख! दु:ख! आणि दु:ख!

म्हणून राजांनो, सूडाची भावना मनामध्ये कधी ठेवायची नाही आणि ॠण, वैर आणि हत्या कधी चुकत नाही म्हणून वैराची भावना कधी ठेवायची नाही. मुख्य म्हणजे घरातल्या घरात कोणाशी भांडण झालं, आपल्या कॉलेजमधल्या मित्राशी किंवा आपल्या कलिगशी - सहकार्‍याशी भांडण झालं, तर तो आपला शत्रुच झाला, अशी भावना मनात धरू नका.

खरंच सांगतो, भांडण भांडणापुरतंच टिकू द्या. बोलाचाली झाली तर तेवढ्यापुरतीच ठेवून द्या. आपल्याकडनं आपण चांगलं वागायचं. नंतर जर वाटलं, नाही तो मनुष्यच भांडण ठेवून आहे, तर दोन-तीन प्रयत्न करून सोडून द्या. पण तेदेखील मनात वैर आणि द्वेष ठेवू नका.

कारण क्रोध, वैर आणि द्वेष ह्या तीन गोष्टी मनात जमा झाल्या की त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. शरीरातल्या अनेक ग्रंथी आपल्या, अनेक हार्मोन्सच्या लेवल बदलतात. ग्रंथींचं कामकाज बदलतं आणि त्यामुळे मग अनेक विकृति उत्पन्न होतात. म्हणून कधीही जास्त क्रोध, जास्त द्वेष, जास्त वैर करायचं नाही, धरायचं नाही. कारण तुम्हाला जसं कळतंय की कोण तुमच्याशी वाईट वागतंय, तसं आपल्या भगवंतालाही कळतंय, स्वयंभगवान त्रिविक्रमालाही कळतंय, आई जगदंबेलाही कळतंय हे लक्षात ठेवायचं.

पण ह्याचा अर्थ अन्याय सहन करायचा असाही नाही. पण बरेच जण मी बघतो काय? तर Victim Card play करतात - ‘माझ्यावर अन्याय झाला, माझ्यावर अन्याय झाला.’ अरे असे किती वेळा बोलता तुम्ही? त्या बोलण्याने काय होणार आहे? दोन लोकांची सिम्पथी दोन दिवस मिळेल. जास्त काही बदल होत नाही लक्षात ठेवा.
तुम्हाला तुमच्या पायावर उभं रहावं लागतं. कारण तुमच्या रांगेत फक्त तुम्ही एकटे असता. तुमच्या रांगेत दुसरं कोणीही येऊ शकत नाही चोरण्यासाठी किंवा मदत करण्यासाठी सुद्धा. तुम्हाला कोणी काही देऊही शकत नाही आणि कोणी काही घेऊही शकत नाही. पण देऊ शकतो ‘तो’ एकच आणि काढून घेऊ शकतो तोही ‘तो’ एकच. लक्षात आलं?

तर श्रावण महिना आहे, श्रवण करतो आहोत, तर पहिल्यांदा काय ऐकायला शिका? स्वत:च्याच मनाला एकच वाक्य ऐकवत रहा - कुठलं वाक्य? साधं वाक्य आहे मगाशी बोललो मी - ‘एक विश्वास असावा पुरता। कर्ता हर्ता गुरु ऐसा।’ आणि गुरु एकच आहे लक्षात ठेवा. हा विश्वास घेऊन पुढे जा आणि ह्या महिन्यामध्ये दररोज स्वत:च्या मनाला हे एकच वाक्य ऐकवायचं - ‘एक विश्वास असावा पुरता। कर्ता हर्ता गुरु ऐसा।’

नक्की? [नक्की]

हरि ॐ, श्रीराम, अंबज्ञ.
नाथसंविध्‌, नाथसंविध्‌, नाथसंविध्‌.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Scroll to top